Friday, 2 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पीएम-गतिशक्ती उपक्रमांतर्गत देशात जलमार्ग, रेल्वे, महामार्ग आणि हवाई मार्गांची जोडणी वाढवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असून, व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे बंदरे आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात अधिक गुंतवणूक झाली असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमधल्या तिरुवअनंतपुरममधल्या विळींझम इथं खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते झाल, त्यावेळी ते बोलत होते.

हे बंदर आठ हजार ८०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं असून नजीकच्या भविष्यात त्याची मालहस्तांतरण क्षमता तिप्पट होणार आहे. हे बंदर देशातलं पहिलं अर्धस्वयंचलित तसंच खोल पाण्यातील कंटेनर वाहतूक करणारं बंदर ठरणार आहे. आतापर्यंत, देशात ७५ टक्के मालहस्तांतरण प्रक्रिया परदेशी बंदरांवरून केली जात होती, त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होत होता, आता तो पैसा वाचेल असं पंतप्रधानांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान आज आंध्र प्रदेशच्या दौर्यावरही जाणार असून, अमरावती इथं ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात जागतिक दर्जाची संरचना आणि संपर्क जाळे उभारण्याची वचनपूर्तीचा भाग म्हणून आंध्र प्रदेशातल्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन, तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही ते करतील. चौदाशे कोटी रुपये खर्चाच्या क्षेपणास्त्र चाचणी क्षेत्राची पायाभरणीही यावेळी होणार आहे.

****

जागतिक ऑडियो - व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषद - वेव्ह्ज मध्ये आज जागतिक माध्यम संवादाला सुरुवात झाली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री एम मुरुगन या संवादात सहभागी झाले होते. वैष्णव यांनी यावेळी बोलताना, सर्जनशीलता, संस्कृती आणि सहकार्य हे जागतिक मीडिया सहकार्याचे तीन स्तंभ असल्याचं अधोरेखित केलं.

****

आध्यात्मिक वारशासाठी आणि कुंभमेळ्याचं स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात आज ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणनेनिमित्त योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, योग अभ्यासक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ११वा योग दिवस देशात एक लाख ठिकाणी साजरा होईल, यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून, त्यासाठी योगसंगम ॲप तयार करण्यात आलं असून, त्यात नोंदणी करून योगसाधना करता येईल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले,

बाईट: केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव

योगामधून एकात्मिकता साधली जाते, ही साधना एका दिवसासाठी नसून निरंतर चालणारी चळवळ असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुलं आणि महिलांनी कोणती आसनं करावी, तसंच आजार निहाय कोणत्या प्रकारचे योगासनं उपयुक्त ठरू शकतात याचे पॅकेजेस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं.

****

नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यात एकूण जीएसटी संकलन दोन लाख ३६ हजार कोटी इतकं झालं असून, ते गेल्या एप्रिल महिन्याच्या दोन लाख १० हजार कोटी संकलनाच्या तुलनेत १२ पूर्णांक सहा दशांश टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल २०२५ मध्ये निव्वळ जीएसटी संकलन दोन लाख नऊ हजार कोटींपर्यंत पोहोचलं. ही आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेची दृढता आणि सहकारी संघराज्यवादाची कार्यक्षमता स्पष्ट करते, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. जीएसटीमध्ये योगदान देणाऱ्या करदात्यांचे आणि या यंत्रणेत असलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले.

****

हर हर महादेवच्या जयघोषात आज बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे सकाळी उघडण्यात आले. यावेळी हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यावेळी उपस्थित होते. दरवाजे उघडण्याच्या सोहळ्यासाठी केदारनाथ मंदिर १०८ क्विंटल फुले आणि हारांनी सजवण्यात आलं होतं. दरवाजे उघडल्यानंतर दर्शनासाठी टोकन प्रणाली लागू करण्यात आली.

****

अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. जगताप यांनी तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदं भूषवली. या पदांसह ते दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

****

No comments:

Post a Comment