Sunday, 4 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०४ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आज पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं वृत्त आहे. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना भारत शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असं जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात, आज बद्रीनाथ धामचे दरवाजे पारंपारिक विधींनंतर उघडण्यात आले. यामुळे आता केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह चारही धामांचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत.

चारधाम यात्रेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे भारत गौरव डिलक्स रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेनं बद्रीनाथ, जोशीमठ, ऋषिकेश, पुरी, कोणार्क, रामेश्वरम आणि द्वारका तसंच काशी विश्वनाथ, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवास करता येणार आहे. ही रेल्वे या महिन्याच्या २७ तारखेला दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटून सतरा दिवसात चार धाम आणि इतर धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करणार आहे.

****

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी - नीट परीक्षा आज होत आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या वतीनं आज देशातल्या पाच हजार केंद्रावर आणि परदेशातील तेरा शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी साडेबावीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यात ३५ शहरांमध्ये दोन लाख ७९ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

****

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी ३१ मे पर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन अकादमी तर्फे करण्यात आलं आहे. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहेत. नोंदणी तसंच अधिक माहितीसाठी अकादमीच्या संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्यातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाने ५ ते ९ मे २०२५ दरम्यान ‘टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे’ आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या उपक्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरातल्या कौठा रोडवर काल टिप्पर आणि रिक्षाच्या धडकेत दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. काल दुपारी परभणीकडून माती घेऊन निघालेल्या भरधाव टिप्परने रस्ता दुभाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभ्या रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते काल झालं. १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचंही भोसले यांनी सांगितलं.

****

सातव्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून बिहार राज्यात सुरुवात होत आहे. या स्पर्धेत पाच हजार खेळाडू सहभागी होणार आहे. यातील नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा दिल्लीत होणार असून उर्वरित स्पर्धा बिहार मधल्या पाच शहरांमध्ये होतील.

****

आयपीएल स्पर्धेत आज पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.

काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दोन धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबी संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. जेकब बेथल, विराट कोहली आणि रोमारिओ शेफर्ड यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरू संघाने २१३ धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने ९४ तर रवींद्र जडेजानं ७७ धावा केल्या. पण त्यांची ही खेळी चेन्नई संघाला विजयश्री मिळवून देऊ शकली नाही.

****

छत्रपती संभाजीनगर इथले दहा विद्यार्थी बंगळूरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोला भेट देण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याची निवड चाचणी म्हणून सातवीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट परीक्षा घेण्यात आली. यातून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेच्या हर्सुल इथल्या शाळेचे कोमल गायकवाड, क्षितिज कांबळे आणि श्रावण लोखंडे या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षिका सविता बांबर्डे यांनी या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

****

No comments:

Post a Comment