Monday, 5 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा राज्याचा निकाल ९१ पूर्णांक ८८ टक्के लागला आहे. मंडळाकडून आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, ९४ पूर्णांक ५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८९ पूर्णांक ५१ टक्के मुलं उत्तीर्ण झाले.

बारावीच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६ पूर्णांक ७४ इतका लागला असून, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९ पूर्णांक ४६ टक्के इतका आहे. पुणे विभागाचा निकाल ९६ पूर्णांक ७४, कोल्हापूर ९३ पूर्णांक ६४, छत्रपती संभाजीनगर ९२ पूर्णांक २४ टक्के, मुंबई ९२ पूर्णांक ९३ टक्के, अमरावती ९१ पूर्णांक ४३ टक्के, नाशिक ९१ पूर्णांक ३१ टक्के, आणि अमरावती विभागाचा निकाल ९१ पूर्णांक ४३ टक्के इतका लागला आहे.

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

****

प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी, “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या सप्ताहाचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन झालं. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या पहिल्या डिजिटल वारी मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा संगम असून, ही वारी मंत्रालयातून सुरू होऊन राज्यभरात तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे.

****

आशियाई विकास बँकेच्या ५८ व्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इटलीतल्या मिलान शहरात दाखल झाल्या. परवा सात मे पर्यंत ही बैठक चालणार आहे. बैठकीदरम्यान सीतारामन इटली, जपान आणि भूतानच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच आशियाई विकास बँक अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल को ऑपरेशनचे गव्हर्नर यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत. सीतारामन मिलान इथं भारतीय समुदायाशी चर्चा करतील, तसंच जागतिक स्तरावरचे अनेक अभ्यासक आणि उद्योजकांचीही भेट घेतील.

****

वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. याआधी १७ एप्रिलला झालेल्या सुनावणीत न्यायालयांनं केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला होता. केंद्र सरकारनं २५ एप्रिलला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन हा कायदा पूर्णपणे संवैधानिक असल्याचं सांगितलं. या कायद्याविरोधात दाखल पाच प्रमुख याचिकांवर ही सुनावणी होत आहे.

****

आज जागतिक हात स्वच्छता दिवस आहे. संसर्ग, संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी हातांची स्वच्छता अत्यंत महत्वपूर्ण आहे. हातांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. श्वसनाचे, पोटाचे अनेक आजार हातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे होतात. संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात, आजारापासून संरक्षण करण्यात साबणानं हात स्वच्छ धुणं हा सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथल्या  देशभरात प्रसिद्ध असलेल्या मदरसा आणि जामिया इस्लामिया ईशातुल उलुम संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांचं काल निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. ते एक भारतीय इस्लामिक विद्वान आणि शिक्षणतज्ञ होते. पारंपारिक इस्लामिक शिक्षणात समकालीन विषयांचा समावेश करण्याच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात. मौलाना वस्तानवी यांनी २०११ मध्ये विख्यात दारुल उलूम देवबंद चे कुलगुरु म्हणून काही काळ काम पाहिलं होतं, तसंच त्यांनी आपल्या शैक्षणिक संकुलातून लाखो विद्यार्थ्यांना आधुनिक व्यावसायिक शिक्षण दिलं आहे. त्यांच्या पार्थिवावर काल अक्कलकुवा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. 

****

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी वाटपासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या १६ मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने १३ एप्रिलपासून पाणी वाटपासंदर्भात आंदोलन सुरु आहे.

****

छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये आज, जालना जिल्ह्यात उद्या, तर सात मे रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ कैलास डाखोरे यांनी केलं आहे.

****

बँकॉक इथं झालेल्या डब्ल्यूटीटी १९ र्षाखालील टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्रधावधी यांनी विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कोरियाच्या जोडीचा तीन - एक असा पराभव केला. महिला दुहेरीत भारताच्या सिंड्रेला दास आणि दिव्यांशी भौमिक यांनी अंतिम फेरी गाठली आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी साडे सात वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. सध्या पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालचा हैदराबादचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

****

No comments:

Post a Comment