Tuesday, 6 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०६ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सीबीआय संचालकांच्या नियुक्ती समितीची बैठक घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या बैठकीला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. बैठकीत पुढील सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर चर्चा झाली. निवृत्त सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ या महिन्याच्या २५ तारखेला संपत आहे. सीबीआय संचालकाची नियुक्ती केंद्र सरकार तीन सदस्यीय समितीच्या शिफारशीवरून करते. पंतप्रधान हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यात विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश आहे.

****

बीड इथं शहराला मागील महिनाभरापासून पाणीपुरवठा नसल्याच्या निषेधार्थ  शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिलांनी काल पाण्याचे माठ फोडून आंदोलन केलं. नगरपालिके बाहेर माठ फोडून पालिका प्रवेशद्वाराला छोट्या घागरींचे तोरण बांधण्यात आलं. पालिकेने भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम हाती घेतल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, टँकर चालकांकडून देखील नागरिकांची पिळवणूक सुरू असल्याचं संतप्त महिलांनी सांगितलं.

****

सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३ मे रोजी एका महिलेचं तीन दिवसांचं पुरुष जातीचं हरवलेलं बाळ काल सापडलं. एक महिला या बाळाला घेऊन गेली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत गहाळ झालेलं नवजात शिशू शोधून काढलं असून बाळ नेणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा आणि मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणे, मोटार वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या.

****

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार देऊ नये तर शेतकऱ्यांनी येत्या ७ दिवसांत अपेक्षा मांडण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात काल पुण्यात सात गावातील शेतकऱ्यांसोबत बावनकुळे यांनी काल चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल, तसेच या भागातील तरुणांच्या  हाताला काम मिळेल असं सांगून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य आहे, अशी ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी दिली.

****

लातूर तालुक्यात शेत रस्ते आणि पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत लातूर तहसील कार्यालयात 'सस्ती अदालत'चं आयोजन करण्यात आलं आहे. या अदालतीद्वारे शेतकऱ्यांचे रस्ते समुपदेशनाने मोकळे करण्यात येतील, सामान्य शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी लातूर तहसील कार्यालय प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे.

****

भंडारा जिल्हातल्या लाखनी शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यावर ही टोळी सट्टा लावत होती.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. काल पावसामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. सनरायझर्स हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

****

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल नवीन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये ऑस्ट्रेलियानं कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. या क्रमवारीत भारत एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानी घसरला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

****

सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिनं सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कास्य अशी सात पदकं मिळवली. तिरंदाजीसह मल्लखांब प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाकडे वाटचाल कायम राखली आहे. तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी भिडणार असून, यातील सहा पदके, निश्चित आहेत. मल्ल्खांबमध्येही सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे. खोखोमध्ये पंजाबचा ५८ विरुद्ध ९ अशा गुणांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली.

****

तेलंगणात होत असलेल्या मिस वर्ल्ड-२०२५ स्पर्धेचे आयोजन दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. येत्या १० ते ३१ मे दरम्यान हैद्राबाद इथं ही स्पर्धा होणार आहे. या सौंदर्य स्पर्धेत ११६ देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार असून जवळपास ३,००० माध्यम प्रतिनिधी हैदराबादला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment