Friday, 2 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक ०२ मे २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 May 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ मे २०२५ सायंकाळी ६.१०

**** 

ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात अमरावती इथं ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी 

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा 

येत्या २१ जून रोजी देशभरात एक लाख ठिकाणी अकरावा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन 

आणि

येत्या रविवारी चार मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षेचं आयोजन 

****

ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिक हे भूतकाळाशी संपर्काचा दुवा आणि भविष्यकाळासाठी मार्गदर्शक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या... 

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी. एल. वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत उपयुक्त साहित्याचं वितरण करण्यात आलं.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशात अमरावती इथं ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी केली. सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या विकास कामांमध्ये विधानभवन, उच्च न्यायालय, सचिवालय आणि इतर प्रशासकीय इमारती तसंच रहिवासी इमारती तसंच एकता मॉल यांचा समावेश आहे. 

****

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत, वेव्हज् परिषदेत भारत पेव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी वार्ताहरांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. या दोन स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत सामंजस्य करार केले आहेत. या स्टुडिओंमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले....

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या Nifty Waves Index चं उद्घाटन केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या ४३ कंपन्याच्या समभागांचा या निर्देशांकात समावेश आहे.

वेव्हज परिषदेत आज दुसऱ्या दिवशी जागतिक माध्यम संवाद कार्यक्रम झाला. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात, अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या सत्राच्या उद्घाटनपर भाषणांत व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी बोलतांना, संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करत असल्याचं सांगत, संस्कृतीच्या वैविध्याला पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली. 

****

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासाला गती देणारी कामं प्राधान्याने हाती घेतली जाणार असून, दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं. लातूर इथं आज नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखरेख कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची सद्यस्थिती समजणे सुलभ झालं आहे, असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ राज्यातील एकमेव आहे, असं भोसले यांनी सांगितलं. 

****

आध्यात्मिक वारशासाठी आणि कुंभमेळ्याचं स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात आज ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणनेनिमित्त योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, योग अभ्यासक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ११ वा योग दिवस देशात एक लाख ठिकाणी साजरा होईल, यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून, त्यासाठी योगसंगम ॲप तयार करण्यात आलं असून, त्यात नोंदणी करून योगसाधना करता येईल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, 

बाईट - केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव

****

येत्या रविवारी चार मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी - नीट परीक्षा होणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर इथं ४९ केंद्रांवर नीट चाचणी घेण्यात येणार असून १९ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनाने केलेल्या सज्जत्तेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याने जोडलेलं असून प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाणार असून दुपारची वेळ असल्याने विद्यार्थांसाठी उन्हापासून बचावाची व्यवस्था केली जाईल, प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक वैद्यकीय पथक तैनात असेल, अशी माहिती स्वामी यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यात विविध ५१ उपकेंद्रावर नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ४ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करु या अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी इथं गावकरी महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या अभियानाबद्दल आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. जिंतूरचे तहसीलदार सरोदे, जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, जिंतूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष मानकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि गावकरी यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, आज परभणी जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या अत्याधुनिक कार्यालयाचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतिशा माथुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेंतर्गतच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रांचं वितरण करण्यात आलं.

****

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यात ३५ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प मंजूर झाले असून २३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना १९ कोटी ९४ लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आलं आहे.  जिल्ह्याचा खर्च २५ कोटी ८ लाख झाला असून बीड जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानी आणि विभागातल्या खर्च बाबतीत प्रथमस्थानी असल्याचं जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२४-२५ अंतर्गत केंद्र शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमांतून बीड जिल्ह्यामध्ये ८०० हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणलं जात आहे, यात स्कोप प्रमाणपत्र मिळवण्यात बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

****

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रोहिणी इथल्या जंगलात लपवून ठेवलेला ७० लाख रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी आज हस्तगत केला. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशान साठवणूक ठेवल्याची खात्रीशीर माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांना दोघांना अटक केली. 

****

हवामान 

राज्यात आज सर्वात जास्त ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. परभणीत इथं ४१ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४२, धाराशिव इथं ४२ पूर्णांक चार तर बीड इथं ४२ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments:

Post a Comment