Thursday, 8 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीदरम्यान, सरकारने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना या कारवाईची माहिती दिली. गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, जनता दल युनायटेड आदी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

सर्वपक्षीय नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे आणि दहशतवादाविरुद्ध सशस्त्र दलांच्या कारवाईबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने केलेल्या कोणत्याही कारवाईला विरोधकांनी यापूर्वी पाठिंबा दर्शविला होता.

आपल्या देशाने एक मोठी कारवाई केली असून, परिस्थितीबद्दल सर्व पक्षांना माहिती देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. डोवाल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल जगभरातील त्यांच्या अनेक समकक्षांशी संपर्क साधला होता. भारताचा परिस्थिती चिघळवण्याचा कोणताही हेतू नाही मात्र पाकिस्तानने काही कारवाई केली तर कठोरपणे प्रत्युत्तर देण्यास भारत तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ इथं काल रात्री पाकिस्तानने सीमेपलीकडून केलेल्या गोळीबारात तेरा नागरिकांचा मृत्यू झाला, तर ५९ जण जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेपलीकडे विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार केला, भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं.

****

उत्तराखंडमध्ये उत्तर काशी जिल्ह्यातल्या गंगनानी इथं आज सकाळी भाविकांचं हेलीकॉप्टर कोसळून पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. चारधाम यात्रेदरम्यान हे हेलिकॉप्टर यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जात असताना हा अपघात झाला. मृत भाविकांपैकी चार मुंबईचे तर दोन जण आंध्र प्रदेशातले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलिस, लष्कर तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचावकार्य सुरु आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

****

तेलंगणामध्ये मुलुगु जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रेहाउंन्ड्स या विशेष दलाचे तीन पोलिस हुतात्मा झाले. वाझिडू - पेरुरु जंगल परिसरात पोलिसांच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या शोधमोहिमेदरम्यान आज सकाळी हा स्फोट झाला.

****

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यांत्रिकीकृत स्वच्छतेसाठी राष्ट्रीय कृती योजना - नमस्ते योजनेच्या लाभार्त्यांना आयुष्यमान कार्ड आणि पीपीई किट वाटप त्यांच्या हस्ते होणार असून, ते लाभार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहेत.

****

इयत्ता अकरावीच्या जादा तुकड्या तसंच अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या प्रणालीचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, यांच्यासह शिक्षण संचालक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे आणि विद्यालयांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते.

****

राज्यातल्या तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्यात आला आहे. राज्यात एक लाख ३७ हजार ४५८ शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून, त्यापैकी ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. तूर खरेदीची मुदत १३ मे रोजी संपत आहे.

****

रत्नागिरी शहरासह तालुक्यात आज सकाळी अनेक ठिकाणी जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात लगेच गारवा निर्माण झाला. या पावसामुळे आंबा बागायतदार आणि विक्रेते मात्र धास्तावले असून, हंगामाच्या अखेरीस आंब्याच्या दरांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

****

No comments:

Post a Comment