Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 May 2025
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पाकिस्तानने काल रात्री ९ वाजता जम्मू प्रदेशातील बीएसएफच्या
चौक्यांवर प्रचंड गोळीबार केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. भारतीय
जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील पाकिस्तानी
सैन्याच्या काही चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्याचंही बीएसएफने म्हटलं आहे.
****
पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यामुळे भारतातील ७० टक्के
पॉवर ग्रिड विस्कळीत झाल्याचे विविध सोशल मीडिया चॅनेलवरील दावे सरकारने फेटाळून लावले
आहेत. पत्र सूचना कार्यालय पीआयबीने या वृत्तातील तथ्य तपासून ते खोटं असल्याचं स्पष्ट
केलं आहे. नागरिकांनी पडताळणी न केलेले मेसेज शेअर करू नये, असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं
आहे. देशातले एटीएम पुढील दोन - तीन दिवस बंद राहणार असल्याचं वृत्तही निराधार असल्याचं
पीआयबीने स्पष्ट केलं आहे.
****
पाकिस्तानने आज दुपारी १२ वाजेपर्यंत आपलं संपूर्ण हवाईक्षेत्र
बंद ठेवलं आहे. पेशावरला जाणाऱ्या पाकिस्तान
इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाचं या हवाईक्षेत्रातलं शेवटचं उड्डाण होतं. या विमानाला
बलुचिस्तानच्या क्वेटो विमानतळावर नाईलाजाने उतरवण्यात आलं.
****
साहित्य भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ज्येष्ठ
साहित्यिक बळीराम गायकवाड
यांची निवड करण्यात आली आहे. काल मुंबईत या संघटनेच्या
राज्यातील चारही प्रांतांच्या पदाधिकाऱ्यांची
बैठक झाली. या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षपदी शशिकांत घासकडबी, प्रदेशमंत्री म्हणून पृथ्वीराज तौर
आणि संघटनमंत्रीपदी नीतीन केळकर यांची
निवड झाली आहे. साहित्य भारती ही सर्व भारतीय
भाषांत काम करणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेची महाराष्ट्र शाखा आहे.
****
राज्यातील मच्छीमार तसंच मत्स्यसंवर्धकांना कृषी क्षेत्राप्रमाणे
विविध पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा
देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील
मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापन, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक
तसंच यामध्ये प्रतवारी, आवेष्टन, साठवणूक करणारे घटक अशा
व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सोयीसुविधा आणि सवलती उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होईल तसंच स्थानिक पातळीवर
मत्स्य व्यवसायाद्वारे रोजगारनिर्मितीत मोठा हातभार लागेल. या निर्णयामुळे मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प यांना कृषी
दराने सवलतीच्या दरात वीज पुरवठा, मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रानुसार अल्प
दराने विमा संरक्षणाचा लाभही मत्स्य क्षेत्रात देण्यात येणार आहे. तसंच शेतकऱ्यांना
सौर ऊर्जा संदर्भात देण्यात येणारे लाभ यापुढे
मत्स्य व्यवसायिकांना देण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
****
७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज
हैदराबादमधील इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. तीन आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. मिस
वर्ल्डच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा सलग दोन वर्षांपासून एकाच
देशात आयोजित केली जात आहे. याआधीची ७१ वी मिस वर्ल्ड गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईत
आयोजित करण्यात आली होती. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया
मोर्ले यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये तेलंगणामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा
केली होती. ३१ मे या स्पर्धेचा समारोप होईल.
****
हवामान
राज्यातल्या चारही विभागात तुरळक ठिकाणी, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या
वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या
दिवशी जोरदार पाऊस पडला. पुण्यातही दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या सुमारे साडे अकरा लाख लाभार्थ्यांकरिता
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य
योजनेच्या एकत्रित लाभासाठी ई - केवायसी
करण्यात येणार आहे. १ मे ते १५ मे दरम्यान जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबवण्यात येत
आहे. गाव, वाडी, वस्ती, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ही सेवा देण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी
कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी
केलं आहे.
****
No comments:
Post a Comment