Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11
May 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे
२०२५ दुपारी १.०० वा.
****
भारत - पाकिस्तान दरम्यान
तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीतील निवासस्थानी
एक उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्यासह
राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, सैन्यदल प्रमुख
उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाईदल प्रमुख
एअरचीफ मार्शल ए.पी.सिंग या बैठकीला उपस्थित आहेत.
****
जम्मू -काश्मिर, पंजाब, राजस्थान राज्यांच्या
सीमावर्ती भागामध्ये आता शांतता असून परिस्थिती सामान्य आहे. या भागात भारतीय सशस्त्र
दल सतर्क आहे. काल रात्री साडे दहावाजे पासून भारत-पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन
झाल्याची किंवा एकही ड्रोन दिसल्याची नोंद झालेली नाही. तसंच पाकिस्तानकडून कोणतीही
लष्करी कारवाई किंवा घुसखोरीचा प्रयत्न झालेला नाही. जम्मू, पुछ, राजौरी, अखनुर, पठानकोट, तसंच फिरोजपुर, जैसलमेर आणि
अमृतसर भागात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दोन्ही देशांमधील तणावाच्या
परिस्थीतीनंतर काल पाकिस्तानच्या विनंतीवरून भारतानं शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.
पाकिस्तानच्या लष्कर महासंचालकांनी काल दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान, भारतीय समपदस्थांना
दूरध्वनीवरून हल्ले थांबवण्याची विनंती केली. भारतानं आपल्या अटी आणि शर्तींवर या प्रस्तावाला
संमती देत, जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रावरून होणारी सैन्य कारवाई काल सायंकाळी पाच वाजेपासून स्थगित
केली. उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम
मिस्री यांनी सांगितलं. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचं संयुक्त राष्ट्रसंघासह अमेरिका
आणि इंग्लंडनं स्वागत केलं आहे.
****
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त, सामान्य नागरिकांच्या
जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि
तंत्रज्ञांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं आहे. १९९८ मध्ये आजच्याच
दिवशी भारतानं राजस्थानमधील पोखरण इथं अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. या दिवशी देशाच्या
प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं.
****
हवामान विभागानं वर्तवलेल्या
अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य
प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस
पडण्याची शक्यता आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीर, लडाख, तमिळनाडू, बिहार आणि
ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस, मान्सूनचं
यंदा नेहमीपेक्षा चार दिवस आधीच येत्या २७ मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाजही
हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांचं आज सकाळी नांदेड दौऱ्यासाठी विमानतळावर आगमन झालं. ते मुखेड तालुक्यात चव्हाणवाडी
इथं एका कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. देगलूर इथं हुतात्मा सैनिक सचिन
यादवराज वनजे यांच्या कुटुंबीयांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत. उद्योग,सार्वजनिक
बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री
पवार यांचं आगमनावेळी स्वागत केलं.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं
श्रीलंकेविरुद्ध तिरंगी एकदिवसीय मालिकेतील विजेतेपदाच्या लढतीत ४० षटकांत तीन बाद
२५२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेतील कोलंबो इथं सुरू या सामन्यात स्म्रिती मंधनानं १०१
चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकारांसह ११६ धावा केल्या, तर हरलीन देवलनं ४७ धावांची
खेळी केली. भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारत
आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका संघाचा या मालिकेत सहभाग होता.
****
जल जीवन अभियानांतर्गत नांदेड
जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी उद्यापासून
सात जून पर्यंत जल चाचणी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या संदर्भातली माहिती दिली. या मोहिमेत जल चाचणीचा
संच वापराबाबत जनजागृती करून, नियमित पाणी तपासणीस प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध
यांच्या २ हजार ५६९ व्या जयंती निमित्त उद्या बीड तालुक्यात शिवणी इथल्या महाविहार
धम्मभूमी इथं तथागत बुद्ध रुप प्रतिष्ठापना आणि अनावरण सोहळा होणार आहे. प्रियदर्शी
धम्मसंस्कार शिक्षण संस्थेतर्फे मुख्य संयोजक भिक्खू धम्मशिल थेरो यांनी या सोहळ्याला
उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
रविवारी १८ मे रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
****
No comments:
Post a Comment