Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 11 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
ऑपरेशन सिंदूरनंतरच्या शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून काही
तासांतच उल्लंघन, परराष्ट्र सचिवांची माहिती
·
पाकिस्तानच्या घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारताचं चोख
प्रत्युत्तर
·
आळंदी इथं साडेचारशे एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज
ज्ञानपीठ उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
·
नैऋत्य मोसमी पावसाचं यंदा २७ मे रोजी केरळमध्ये आगमन
होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
आणि
·
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७३ पदकांची कमाई करत
महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर
****
ऑपरेशन
सिंदूरनंतर काल झालेल्या शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं पुन्हा उल्लंघन केलं आहे. भारतीय
सैन्यदल शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत आहेत, अशी माहिती
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. शस्त्रसंधीची पाकिस्ताननं काटेकोर अंमलबजावणी
करावी, असं भारतानं आवाहन केलं आहे. भारतीय सैन्यदल परिस्थितीवर
लक्ष ठेवून आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सैन्याला
देण्यात आल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
बाईट - विक्रम मिसरी, परराष्ट्र सचिव
****
दरम्यान, पाकिस्तानच्या
विनंतीवरून भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या लष्करी संचलन महासंचालकांनी
काल दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान, भारतीय समपदस्थांना दूरध्वनीवरून
हल्ले थांबवण्याची विनंती केली. भारतानं आपल्या अटी आणि शर्तींवर या प्रस्तावाला संमती
देत, जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रावरून
होणारी सैन्य कारवाई काल सायंकाळी पाच वाजेपासून स्थगित केली. उद्या सोमवारी दुपारी
१२ वाजता पुन्हा चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं.
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचं संयुक्त राष्ट्रसंघासह अमेरिका आणि इंग्लंडनं स्वागत केलं
आहे.
****
दरम्यान, दोन्ही देशात
शस्त्रसंधी झालेली असली तरीही, सिंधू पाणी करार मात्र सध्या स्थगितच
राहणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
पाकिस्तानची
घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी
हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की, मुरीद,
चकलाला, रहिमयार खान, सियालकोट
आदी ठिकाणची लष्करी केंद्रं, नियंत्रण केंद्रं, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्धवस्त केली. या कारवाईबाबत माहिती
देतांना कर्नल कुरेशी म्हणाल्या…
बाईट
- कर्नल सोफिया कुरेशी
****
पाकिस्तानचे
अनेक खोटे दावे सैन्यदलाने खोडून काढले. भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्धवस्त
केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, हे केंद्र
पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगत, तिथली ताजी छायाचित्रं यावेळी
दाखवण्यात आली. भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई दलाचे तळ तसंच एस-४०० ही हवाई
सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही विंग कमांडर
व्योमिका सिंग यांनी सांगितलं. तसंच भारताकडून पाकिस्तानातल्या प्रार्थना स्थळांवर
कारवाई झाल्याच्या वृत्ताचंही सैन्य दलाकडून खंडन करण्यात आलं.
भारतीय
सैन्यानं जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि ट्यूब ड्रोन लाँच पॅड उध्वस्त केल्याची
माहिती यावेळी देण्यात आली.
भविष्यात
देशातल्या कोणत्याही दहशतवादी कारवाईला देशाविरोधात युद्ध मानून सडेतोड उत्तर दिलं
जाईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भविष्यात कुरापती काढल्यास
ऑपरेशन सिंदूर सारखं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही
देण्यात आला आहे.
****
महाराष्ट्र
आणि मध्यप्रदेशादरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाचा सामंजस्य करार काल करण्यात
आला. भोपाळ इथं झालेल्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या २८ व्या बैठकीत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या करारावर स्वाक्षरी
केली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला १९ पूर्णांक ३६ शतांश टीएमसी पाणी मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, या प्रकल्पामुळे
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात पाच लाख ७८ हजार एकर क्षेत्राला सिंचन
लाभ होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
बाईट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, आळंदी इथं
साडेचारशे एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल
आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात
ते बोलत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्गमयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा
घेणाऱ्या 'नमो ज्ञानेश्वरा' या ग्रंथाचं
तसंच त्याच्या ऑडियो बुकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आलं.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुखेड तालुक्यात चव्हाणवाडी इथं कार्यकर्ता
मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. देगलूर इथं हुतात्मा सैनिक सचिन यादवराज वनजे
यांच्या कुटुंबीयांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस, मान्सूनचं यंदा नेहमीपेक्षा चार दिवस आधीच येत्या २७ मे रोजी केरळमध्ये
आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. असं झालं तर २००९ नंतर प्रथमच मोसमी
पावसाचं लवकर आगमन होईल, २००९ साली २३ मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये
दाखल झाला होता. या आठवड्यात १३ मेपर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर पोहोचेल
आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने
वर्तवला आहे.
****
खेलो इंडिया
युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ७३ पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे.
यात २७ सुवर्ण, २२ रजत आणि २४ कांस्यपदकांचा समावेश आहे. कर्नाटक ३९ तर राजस्थान
२३ पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
****
हिंगोलीचे
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून 'फाईव्ह स्टार हिंगोलीकर'
हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील तीन नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींमध्ये
या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालय तसंच निवासस्थानांभोवती वृक्षलागवड, जलपुनर्भरण, कचरा विलगीकरण, सोलर
पॅनल आणि कराचा भरणा या कामांच्या आधारे रेटिंग देऊन संबंधितांचा सन्मान केला जाणार
आहे.
याबाबत
अधिक माहिती देणारा हा वृत्तांत...
बाईट – रमेश कदम, (पीटीसी: हिंगोली)
****
प्रसिद्ध
कवी डॉ. दासू वैद्य यांना डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर
झाला आहे. दहा हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्र
साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. येत्या १८ मे रोजी सोलापूर
इथं हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
****
No comments:
Post a Comment