Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 May 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ मे २०२५ सायंकाळी ६.१०
****
· जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते
सन्मानपूर्वक प्रदान
· ऑपरेशन सिंदूर ही फक्त झलक-संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी असल्याचं
संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन
· छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेणार-मुख्यमंत्र्यांची
माहिती
· नांदेड तसंच छत्रपती संभाजीनगरसाठी प्रत्येकी एक सी ट्रिपलआयटी मंजूर
आणि
· जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची डॉ नीलम गोऱ्हे यांची सूचना
****
५८ वे ज्ञानपीठ पुरस्कार आज नवी दिल्लीत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जगद्गुरू
रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. उत्तरप्रदेशात चित्रकूट
इथल्या तुलसी पीठाचे संस्थापक आणि संस्कृत पंडित असलेले रामभद्राचार्य यांनी आपल्या
विविध रचनांमधून लोकप्रबोधन केलं आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात
रामभद्राचार्य यांनी,
राष्ट्र देवो भव, हा संदेश दिला. ते म्हणाले –
बाईट - जगद्गुरू
रामभद्राचार्य
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर बाबतही रामभद्राचार्य यांनी राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांचं अभिनंदन केलं.
प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांनाही ज्ञानपीठ
पुरस्कार जाहीर झाला,
मात्र ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सोहळ्यात उपस्थित राहून
पुरस्कार स्वीकारू शकले नाहीत, गुलजार यांच्या वतीनं त्यांच्या प्रतिनिधींनी
हा पुरस्कार स्वीकारला.
****
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेली कारवाई ही
फक्त झलक असून,
वेळ पडल्यास अद्याप संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी
असल्याचं प्रतिपादन,
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये
भूज इथं वायूदल स्थानकावर सैनिकांशी बोलत होते. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, असं
राजनाथसिंह यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - संरक्षण
मंत्री राजनाथसिंह
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या
आर्थिक मदतीवर पुनर्विचार व्हावा, असं आवाहनही राजनाथसिंह यांनी केलं आहे.
नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन
सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणानं पहिला क्रमांक पटकावला
आहे, महावितरणनं दुसरा,
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं तिसरा, महाराष्ट्र
ऊर्जा अभिकरणानं चौथा आणि महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ- एमआयडीसीनं पाचवा क्रमांक
मिळवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज घोषणा केली.
****
दरम्यान, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५८ सुवर्णांसह एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी
या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी
तब्बल नऊ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदवणं ही बाब अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
****
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या छत्रपती
संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजने संदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबईत महत्वपूर्ण बैठक
घेणार आहेत,
राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती
दिली. मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून बुलडाणा दौऱ्यावर रवाना झाले, त्यावेळी
सावे यांच्यासह भाजप नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन शहराच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती
दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मुंबईत बैठक घेणार असल्याचं सांगितलं, अशी
माहिती सावे यांनी दिली.
****
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी
प्रत्येकी एक ‘सी ट्रिपलआयटी अर्थात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन
अॅन्ड ट्रेनिंग मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठवलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून
ही दोन प्रशिक्षण केंद्रं मंजूर केल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे. या संस्थेमुळे मराठवाड्यातील
हजारो युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक, तांत्रिक
प्रशिक्षण मिळेल. यातून उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा
विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
****
पावसाळ्यामध्ये विजा कोसळून होणारी जीवित
आणि वित्तहानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची सूचना, विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. त्या आज छत्रपती संभाजीनगर इथं
आढावा बैठकीत बोलत होत्या.
बाईट - डॉ.नीलम
गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेऊन गोऱ्हे
यांनी आवश्यक निर्देश दिले. ऊसतोड कामगारांना विविध विभागांनी समन्वय राखून शासकीय
योजनांचा लाभ द्यावा,
असे निर्देशही गोऱ्हे यांनी दिले.
****
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षातर्फे
देशभरात तिरंगा यात्रा सुरु आहेत. आज नागपूर जिल्ह्यातल्या कामठी शहरात तिरंगा यात्रा
काढण्यात आली. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह
अनेक नागरिक या यात्रेत उत्साहाने सहभागी झाले. सोलापूर इथेही तिरंगा यात्रेला चांगला
प्रतिसाद मिळाला.
****
दरम्यान, ऑपरेश सिंदूरमुळे भारताच्या
स्वयंपूर्णतेबाबत संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला गेला, अशी
भावना ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले –
बाईट – राम भोगले
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत
चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर नियमित परीक्षा सुरु आहेत. परंतु ज्या
पात्र विद्यार्थ्यांना दूरशिक्षण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना
आणि विद्यार्थी विकास विभागाच्या स्पर्धांमुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत, अशा
विद्यार्थ्यांची परीक्षा २१ मे पासून घेण्यात येणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे
संचालक हुशारसिंग साबळे यांनी ही माहिती दिली.
****
नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी जागरूकता
निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. लवकर कारवाई
करा डेंग्यू थांबवा,
अशी यावर्षीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाची संकल्पना आहे. आज
छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून या अनुषंगाने एक जनजागृतीपर प्रदर्शन
भरवण्यात आलं होतं.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान
चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव इथं ३५ अंश, बीड
सुमारे ३६ अंश तर परभणी इथं ३७ पूर्णांक चार दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
सिल्लोड, पैठण, वैजापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. मराठवाड्यात येत्या २० मे पर्यंत ताशी ४०
ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment