Friday, 16 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

सैनिकांच्या शक्तीमुळेच देशाची सीमा भक्कम असल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील भूज इथं हवाई दल स्थानकावर हवाई योद्ध्यांशी त्यांनी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय वायु दलाचं कौतूक केलं. भारताच्या तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे, दहशतवाद रुपी अजगराला आपण ठेचण्यात यश मिळवलं, असं सिंह यांनी सांगितलं तसंच भारतीय सशस्त्र बलाचं अभिनंदन करतो, असंही ते म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमध्ये अवंतपोरा आणि त्राल या भागात भारतीय जवानांनी राबवलेल्या दोन मोहिमेत एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं. भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. दोन्ही मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याचंही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. अवंतीपोरा भागातल्या जंगलात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर त्राल भागातही शोध मोहीम राबवून नागरी वसाहतीत लपलेल्या दहशदवाद्यांना लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कंठस्थान घातलं. दहशतवाद्यांच्या कोणत्याही कृत्याला सडेतोड उत्तर देऊ असंही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

जगातील पाचवं सर्वात उंच पर्वतशिखर असणाऱ्या मकालू पर्वताच्या शिखरावर पोहोचल्याबद्दल इंडो-तिबेटी सीमा पोलिस - आयटीबीपीचं गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केलं आहे. आयटीबीपीच्या जवानांनी मकालू पर्वताच्या शिखरावर तिरंगा फडकवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होऊन स्वच्छता मोहीम सुरू केली, सैनिकांच्या धाडसाचं कौतुक करतो, असं शाह यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे.

****

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत झोपडपट्टी पुर्नवसन प्राधीकरणानं १०० पैकी ८२ पूर्णांक १६ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर महावितरणनं दुसरा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं तिसरा, महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणानं चौथा आणि महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ- एमआयडीसीनं पाचवा क्रमांक मिळवला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज घोषणा केली.

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत शासनाच्या सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेतला. महसूली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल आज सायंकाळी जाहीर होणार आहे.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरु आहेत. आज नागपूर जिल्ह्यातल्या कामठी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवलेल्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि देशातील १४० कोटी लोकांचं सैन्याला पाठबळ आहे, हे दाखवण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

****

भारतीय जनता पक्षातर्फे सोलापूर शहरात आज सकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेचा सुरुवात झाली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, महिला, युवक उपस्थित होते.

****

दरम्यान, रत्नागिरीत उद्या १७ मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. राष्ट्रीय एकता दाखवून देण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावं, असं त्यांनी अवाहन केलं आहे.

****

रोमानियातील बुखारेस्ट इथं सुरू असलेल्या सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदानं बरोबरी साधून आघाडी घेतली आहे. त्यानं आठव्या फेरीत फिलिपिनो-अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो याचा पराभव केला. दरम्यान, विश्वविजेत्या डी. गुकेशनं अमेरिकेच्या लेव्हॉन आरोनियनचा पराभव केला. या स्पर्धेत गुकेशचा हा पहिलाच विजय आहे. गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी काळ्या मोहऱ्यांसह डाव जिंकला. प्रज्ञानंद पाच गुणांसह स्पर्धेत आघाडीवर आहे. साडेतीन गुणांसह, गुकेश संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे. नववा आणि शेवटचा सामना आज खेळला जाईल.

****

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत १५८ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर राहिला. यात ५८ सुवर्ण, ४७ रजत आणि ५३ कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत हरियाणा ११७ तर पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

****

No comments:

Post a Comment