Saturday, 17 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 May 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ मे २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      पाकिस्तानच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत जगभर सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ पाठवणार

·      आयसीसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना एनआयएकडून मुंबईत अटक

·      ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या विशेष रेल्वेची घोषणा

·      आयपीएल स्पर्धांना आजपासून पुन्हा सुरुवात; कोलकाता आणि बंगळुरु यांच्यात आज सायंकाळी सामना

आणि

·      दोहा इथं झालेल्या डायमंड लिग भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

****

ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्ताननं खोट्या बातम्यांच्या आधारे जगभरात भारताविरोधात, अपप्रचार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भारत आता मुत्सद्देगिरीच्या जोरावर या अप्रचाराचा प्रतिकार करत आहे. या पार्श्वभूमीवर २२ मे पासून दहशतवादाविरोधातल्या भारताच्या संघर्षाचं सत्य जगभर पोहोचवण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळं जगभर पाठवणार आहे. हे प्रतिनिधीमंडळ विविध देशांना भेटी देणार आहेत. देशातील प्रमुख पक्षांचे नेते या प्रतिनिधीमंडळांचं नेतृत्व करतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, द्रमुकच्या कनिमोळी करुणानिधी, संयुक्त जनता दलाचे संजयकुमार झा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे या नेत्यांचा प्रतिनिधी मंडळात समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील मंडळात असतील. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची ठाम भूमिका, दहशतवादाविरोधात भारताचं शून्य सहिष्णुता धोरण जागतिक समुदायासमोर अधिक ठळकपणे मांडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय तपास संस्था-एनआयए नं मुंबई इथं आज आयसीस दहशतवादी संघटनेच्या दोन फरार संशयितांना अटक केली आहे. पुणे इथं २०२३ मध्ये स्फोटक यंत्रे-आयईडी तयार करणं तसंच चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा यंत्रणेनं या दोघांना रोखलं, यानंतर एनआयएच्या पथकानं त्यांना अटक केली. दोन्ही संशयित आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं असून गेल्या दोन वर्षांपासून ते फरार होते. दोघेही पुण्यातील एका भाड्याच्या घरात आयईडी तयार करण्याच्या प्रकरणात गुंतले होते.

****

भारत आपल्या १०१ व्या अंतराळ मोहिमेसह एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचं पीएसएलव्ही -सी ६१ रॉकेट उद्या रविवारी सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह- ईओएस नऊ ला घेऊन प्रक्षेपित होईल.

****

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ, आयआरसीटीसीनं ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव रेल्वे अंतर्गत येत्या ९ जून पासून सुरू होत आहे. पर्यटकांनी या ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. या ५ दिवसांच्या विशेष सहलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत.

****

आज जगभरात जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा केला जात आहे. उच्च रक्तदाबाशी संबंधित धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि ते रोखण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देणं, हे या दिनामागील उद्दिष्ट आहे. तुमचा रक्तदाब योग्यरित्या मोजा, ​​तो नियंत्रित करा आणि दीर्घ आयुष्य जगा अशी यंदाची दिनाची संकल्पना आहे.

उच्च रक्तदाबाची लक्षणं धोकादायक पातळी गाठल्यानंतर दिसून येतात आणि यामुळं हृदयरोगाची शक्यता वाढीस लागते, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सच्या वैद्यकीय विभागाचे प्राध्यापक डॉ. नवल के. विक्रम यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं जनता दरबार भरवत नागपूर आणि विदर्भातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. दर महिन्याला जनता दरबार भरवून आपण लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, आपले प्रश्न सुटतील, या भावनेने लोक आपल्याकडे येतात, असं यावेळी फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

****

भारतीय सैनिकांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सिंदूर यात्रांचं आयोजन केलं जाणार आहे, अशी माहिती महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी दिली. मुंबईत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानं नवभारताची प्रचिती दिली असल्याचं त्या म्हणाल्या.

****

एका आठवड्यानंतर आज पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. आज, यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडीयम इथं संध्याकाळी साडेसात वाजता वाजता खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळं नऊ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

****

दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं. त्यानं ९० पूर्णांक २३ मीटरच्या विक्रमी अंतरापर्यंत भालाफेक करण्यात यश मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ९१ पूर्णांक शुन्य सहा मीटरसह पहिलं स्थान पटकावलं. नीरजनं त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं. ही सर्वोत्तम कामगिरी नीरजच्या अटळ शिस्त आणि समर्पणाचा परिणाम असल्याचं पंतप्रधान मोदींनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या यशानं भारताला अभिमान आणि आनंद होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील जलालपूर इथं किरकोळ भांडणाच्या कारणावरुन एका तरुणास जमावाकडून बेदम मारहाण झाली होती, या प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज पोलिसांनी संशयितांचा शोध घेत सात जणांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर कोणत्याही अफवा पसरवू नये, असं आवाहन पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी केलं, ते म्हणाले

बाईट – नवनीत काँवत, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक

 

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवार, १९ मे रोजी नागरिकांच्या वतीनं परळीत बंद पाळण्यात येणार आहे.

****

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली सुसज्जता जगाला दिसली, असं मत छत्रपती संभाजीनगर इथले प्राचार्य डॉक्टर उल्हास शिऊरकर यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय सैन्याने कोणतीही जीवीत हानी न होऊ देता पाकिस्तानला धडा शिकवल्याचं, डॉ. शिऊरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - प्राचार्य डॉक्टर उल्हास शिऊरकर

****

धाराशिव जिल्ह्याच्या हरित भविष्याचा पाया घालणाऱ्या मिशन धाराशिव - ५० लक्ष वृक्ष लागवड आणि संवर्धन या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ काल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आला. ही मोहीम केवळ वृक्षलागवडीपुरतीच मर्यादित नसून, हवामान बदल, जलस्रोतांचा अभाव आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या संकटांवर मात करणारी हरित चळवळ आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी पुजारी यांनी केलं.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपतर्फे राज्यभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे, हिंगोलीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आलं होतं. या यात्रेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. गोंदिया आणि पालघर इथंही आज तिरंगा यात्रा काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत घर पाडून इतरत्र स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांना नवीन घरबांधण्यासाठी महापालिकेकडून अनुदान वाटपाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेत ६५ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शंकर पंडित दुसाने यांच्या तक्रारीवरुन दोघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

No comments:

Post a Comment