Saturday, 17 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ऑपरेशन सिंदूर ही फक्त झलक-संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी-संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

·      जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान

·      मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रथम-मराठवाडा विभागात नांदेड तहसील कार्यालय अव्वल

·      नांदेड तसंच छत्रपती संभाजीनगरसाठी प्रत्येकी एक सी ट्रिपलआयटी मंजूर

आणि

·      जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची डॉ नीलम गोऱ्हे यांची सूचना

****

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेली कारवाई ही फक्त झलक असून, वेळ पडल्यास अद्याप संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी असल्याचं प्रतिपादन, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते काल गुजरातमध्ये भूज इथं वायूदल स्थानकावर सैनिकांशी बोलत होते. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, असं राजनाथसिंह यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट - संरक्षण मंत्री राजनाथसिंह

sआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार व्हावा, असं आवाहनही राजनाथसिंह यांनी केलं आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांत दोन संयुक्त मोहिमांमधे सहा दहशतवादी ठार झाले. काल श्रीनगर इथे वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली.

****

५८ वे ज्ञानपीठ पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. उत्तरप्रदेशात चित्रकूट इथल्या तुलसी पीठाचे संस्थापक आणि संस्कृत पंडित असलेले रामभद्राचार्य यांनी, हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात, राष्ट्र देवो भव, हा संदेश दिला. ते म्हणाले...

बाईट - जगद्‌गुरू रामभद्राचार्य

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबतही रामभद्राचार्य यांनी राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांचं अभिनंदन केलं.

प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांना जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कारही त्यांच्या प्रतिनिधींना प्रदान करण्यात आला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुलजार स्वत: या सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाहीत.

****

दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, माणिक वर्मा फाऊंडॅशनतर्फे हे वर्ष ‘माणिक स्वर शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. या अनुषंगाने काल मुंबईत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना 'माणिक रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाचं सन्मानचिन्ह देऊन भिडे यांना सन्मानित करण्यात आलं.

****

मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मराठवाडा विभागात नांदेड तहसील कार्यालयाने अव्वल स्थान मिळवलं आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील ६ कार्यालयांनी प्रथम, पाच कार्यालयांनी द्वितीय तर चार कार्यालयांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

****

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी ट्रिपलआयटी अर्थात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राला टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत, ही दोन प्रशिक्षण केंद्रं मंजूर केली. या संस्थेमुळे मराठवाड्यातील युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षण मिळणार आहे.

****

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजने संदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबईत महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत, राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री काल छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून बुलडाणा दौऱ्यावर रवाना झाले, त्यावेळी सावे यांच्यासह भाजप नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन शहराच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली.

दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर ठाकरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेऊन, पाणी प्रश्नी निवेदन सादर केलं.

****

पावसाळ्यामध्ये विजा कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची सूचना, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत बोलत होत्या.

बाईट - डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

गोऱ्हे यांनी काल महिला मेळाव्यालाही संबोधित केलं. जालना इथंही गोऱ्हे यांनी जिल्ह्यातल्या विविध विषयांचा आढावा घेतला. अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई, ऊसतोड तसंच घरकाम कामगार आदी विषयांवर त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रांचं आयोजन केलं जात आहे. जालना जिल्ह्यात अंबड आणि बदनापूर शहरात भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वात काल तिरंगा रॅली काढण्यात आली. तुळजापुरातही तिरंगा यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. भारत मातेचं पूजन तसंच माजी सैनिकांचा सत्कार करून या रॅलीचा समारोप झाला.

**

दरम्यान, ऑपरेश सिंदूरमुळे भारताच्या स्वयंपूर्णतेबाबत संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला गेला, अशी भावना ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले...

बाईट – राम भोगले

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर नियमित परीक्षा सुरु आहेत. परंतु ज्या पात्र विद्यार्थ्यांना दूरशिक्षण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या स्पर्धांमुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा २१ मे पासून घेण्यात येणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी ही माहिती दिली.

****

बीडहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने नेकनूर तसंच केज इथं अनेक वाहनांना धडक दिली, या अपघातात एक महिला ठार तर २० ते २५ जण जखमी झाले. घटना स्थळाहून फरार झालेला कंटेनर पुढे लोखंडी सावरगाव जवळ उलटला, असं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या अप्पर तहसीलदारासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गर्जे असं या अप्पर तहसीलदाराचं नाव असून, एका भूभागाच्या क्षेत्र दुरुस्तीचे आदेश काढण्यासाठी त्याने लाच मागितली होती. यापैकी एक लाख रुपयांची लाच घेतांना दोन एजंटना लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. मात्र गर्जे पसार झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात ड्रोन तसंच रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट आदीच्या वापराला येत्या तीन जूनपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नांदेड जिल्ह्यातही ३१ मेपर्यंत जमावबंदीसह प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

****

लातूर इथल्या जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा महोत्सव आता २३ आणि २४ मे २०२५ रोजी लातूर इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर होणार आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव इथं ३५ अंश, बीड सुमारे ३६ अंश तर परभणी इथं ३७ पूर्णांक चार दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment