Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 May 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मे २०२५ सायंकाळी ६.१०
****
· कृषी विकासासाठी एक राष्ट्र, एक कृषी, एक संघ धोरणाची केंद्रीय
कृषीमंत्र्यांची घोषणा
· दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी
मंडळांचे दौरे जाहीर
· ‘ऑपरेशन
सिंदूर’च्या सन्मानार्थ ठिकठिकाणी तिरंगा यात्रा उत्साहात
आणि
· आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर पंजाब किंग्जसंघाचं २२० धावांचं आव्हान
****
कृषी विकासासाठी आज आपण महाराष्ट्रातून ‘एक
राष्ट्र, एक कृषी आणि एक संघ’
याची घोषणा करत आहोत, असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री
शिवराजसिंह चौहान यांनी आज नागपूर इथं केलं. विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत कृषी
संवाद कार्यक्रमांमध्ये त्यांनी आज विदर्भातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले,
बाईट – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या धोरणाला राज्य
सरकार पूर्ण सहकार्य करेल,
अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुलाबी
बोंड अळीला आळा घालणाऱ्या स्मार्ट सापळ्याचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. कृषी क्षेत्रासाठी
नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. केंद्रीय
कृषी मंत्र्यांनी नागपूरमधील राष्ट्रीय मृदा वर्णक्रमीय ग्रंथालयाचं उदघाटनही या प्रसंगी
केलं.
****
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत,
सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट
देणार आहेत. या संदर्भात,
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व
करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, शिवसेना
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा गट युएई, लायबेरिया, काँगो
आणि सिएरा लिओनला भेट देईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचा गट इजिप्त, कतार, इथिओपिया
आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देईल. रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन
युनियन, इटली आणि डेन्मार्कला भेट देणाऱ्या गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. काँग्रेसचे शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचा गट
अमेरिका, पनामा,
गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार असून त्यात
शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा समावेश आहे.
****
ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा
यात्रा काढण्यात येत आहेत. राज्यात ठिकठिकाणी आज तिरंगा यात्रा काढण्यात आल्या. भारताच्या
लष्करी सामर्थ्याला जगामध्ये मागणी प्राप्त होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नागपूर जिल्ह्याच्या सावनेर इथं तिरंगा यात्रेत सहभाग
घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजी नगर इथं ऑपरेशन सिंदूरच्या
सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली. क्रांती चौक इथं या यात्रेचा प्रारंभ झाला.
फुलंब्री इथंही आज सकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. जालना इथं माजी केंद्रीय मंत्री
रावसाहेब दानवे,
आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष
दानवे यांनी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. मामा चौकातून सुरु होत बडी सडक इथल्या श्रीराम
मंदिरात महाआरतीने यात्रेचा समारोप झाला. मुंबईत चेंबूर तसंच वाशीम, सांगलीतल्या
मीरज इथं, सिंधुदूर्ग जिल्ह्यात देवगड इथं आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. धुळ्यामध्ये उद्या
‘ऑपरेशन सिंदूर’
च्या यशाबद्दल आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा
काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी आज दिली.
****
भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ आणि दहशतवादाविरुद्ध
आज नागपूरमध्ये सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेचं नेतृत्व भारतीय
जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
ते यावेळी म्हणाले की,
संपूर्ण महाराष्ट्रात १५०० तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत.
माजी सैनिक,
सर्व धर्म आणि समुदायाचे लोक सहभागी होत आहेत, ही
भाजपची राजकीय यात्रा नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथले युवा उद्योजक आणि
क्रीडा प्रशिक्षक नीरज बोरसे यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान वाटत असल्याची भावना
व्यक्त केली आहे. या कारवाईत भारताने मिळवलेल्या यशाबद्दल बोलतांना बोरसे म्हणाले –
बाईट – नीरज बोरसे, युवा उद्योजक आणि क्रीडा प्रशिक्षक
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोने आज
ईओएस - झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं, मात्र
उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे ही मोहिम अयशस्वी झाल्याचं, इसरोचे
अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं.
****
हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार
हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. आगीचं कारण अद्याप समजू शकलं
नाही. दूर्घटनेतल्या जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय कोळसा
मंत्री जी. किशन रेड्डी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट
देऊन मदतकार्याची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र
दुःख व्यक्त केलं असून जखमी झालेल्यांना लौकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान
राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमी झालेल्यांना
प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर झालं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर परिसरात आज दुपारच्या
सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. शहरातील शिवाजीनगर भुयारी बोगद्यामध्ये
आजच्या पावसाचं पाणी साचल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळित
झाली. सिल्लोड तालुक्यातल्या भवन परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जालना शहरासह
जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. भोकरदन
तालुक्यातल्या केदारखेडा इथं अंगावर वीज कोसळून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
तर बदनापूर तालुक्यातल्या कुसळी इथं दोन म्हशी दगावल्या आहेत. या पावसामुळे उन्हाळी मका, बाजरीसह कांदा बियाणं पिकांचं नुकसान झालं
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कर्नाटक किनाऱ्यानजिक कमी दाबाचं क्षेत्र
निर्माण होणार असल्यानं उद्यापासून २५ मे दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा
मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक
ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य
महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २१ तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह
हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं पंजाब
किंग्ज संघानं निर्धारित २० षटकांत २२० धावा काढण्याचं लक्ष्य राजस्थान रॉयल्स संघासमोर
ठेवलं आहे. पंजाब किंग्ज संघातर्फे नेहल वडेरानं ७० धावा तर शशांक सिंहनं नाबाद ५९
धावा केल्या. उत्तरात राजस्थान रॉयल्स संघानं सहा षटकांत एक बाद ८९ धावा केल्या आहेत.
आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपीटल्स आणि गुजरात टायटन्स संघांदरम्यान दिल्लीमध्ये संध्याकाळी
साडे सात वाजता होणार आहे.
****
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबईत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे पाच कोटी दहा लाख रुपये किमतीचे
सोनं जप्त केलं. यावेळी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण पाच किलो ७५ ग्रॅम सोनं जप्त
करण्यात आलं. या प्रकरणांमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.
****
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या
५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे खरीप
पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन आज झालं. परभणीला अन्नप्रक्रिया उद्योगाचे केंद्र म्हणून
विकसित करायचं असून यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडूनच घेतला जाईल, असं
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी या उपक्रमाच्या उदघाटनं प्रसंगी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment