Sunday, 18 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १८ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

बांगलादेशातून भारताच्या बंदरांमध्ये आयात होणाऱ्या काही वस्तूंवर परदेशी व्यापार महासंचालनालयानं नवे निर्बंध जाहीर केले आहेत. हे निर्बंध भारतमार्गे नेपाळ आणि भूतानला पाठवण्यात येणाऱ्या वस्तूंना लागू नसतील असंही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. अधिसूचनेद्वारे जारी केलेले नवीन निर्बंध तत्काळ प्रभावानं अंमलात येतील. बांगलादेशातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या जमिनीवरील बंदरांवर आयातीस मनाई असेल. फक्त न्हावाशेवा आणि कोलकाता या दोन समुद्री बंदरांवरच बांगलादेशातून तयार कपड्यांच्या आयातीची मुभा असेल. याशिवाय फळं, फळांच्या स्वादाची शीतपेयं, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कापूस आणि वाया गेलेला कापसाचा धागा, रंग अशा काही वस्तूंच्या आयातीलाही प्रतिबंध करण्यात आला आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोने आज ईओएस - झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं, मात्र ही मोहिम अयशस्वी झाल्याचं, इसरोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. इसरोची ही एकशे एकावी मोहिम होती. आंध्र प्रदेशात श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी 61 या यानाद्वारे आज पहाटे हा उपग्रह अवकाशात झेपावला. या यानाची दुसऱ्या टप्प्यापर्यंत कामगिरी सामान्य होती, अशी माहिती नारायणन यांनी दिली. इसरो या मोहिमेचं विश्लेषण करेल, असंही त्यांनी सांगितलं.

****

लष्करी सामर्थ्यामध्ये भारतानं आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित शस्त्रास्त्रांमुळं पाकिस्तान विरुध्दच्या युध्दात आपण विजयश्री प्राप्त केली. संपूर्ण जगान ही शक्ती बघितली आणि त्यांची मागणी आता भारताकडे होत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर इथं आज सकाळी आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधतांना ते बोलत होते. भारत-पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रति कृतज्ञता आणि देशभक्तीचा संकल्प यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. पाकिस्तानच्या हवाई शस्त्र तळांसह लष्करी तळाला झालेलं नुकसान हे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स यानंही प्रसिद्ध केलं असून पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणला आहे असंही फडणवीस म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीय तीनही दलाच्या सैनिकांसोबत आहेत हा संदेश देण्यासाठी नवी मुंबईतील वाशी इथं काल तिरंगा यात्रा काढण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर इथं आज तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.

****

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘विकसित कृषी’ या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील आणि नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख कृषी विषयक आणि ग्राम विकास योजनांचा आढावा घेतील. आपल्या दौऱ्यात ते राष्ट्रीय मृदा वर्णक्रमीय ग्रंथालयाचं उदघाटन करतील. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

****

सोलापूर नजिक अक्कलकोट मार्गावरच्या औद्योगिक वसाहतीतल्या सेंट्रल टेक्सटाइल मिलला आज पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीमध्ये आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आहेत. मृतांची ओळख अद्याप पटायची आहे.

****

एका आठवड्याच्या अवकाशानंतर काल पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरू इथला नियोजित सामना काल पावसामुळे रद्द झाला. यामुळं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान बाद झालं आहे. आज या स्पर्धेत दुपारी साडेतीन वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना जयपुर इथं, तर संध्याकाळी साडेसात वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध् गुजरात टायटन्स सामना दिल्ली इथं होणार आहे.

दरम्यान, यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे नऊ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित सामन्यांचं नवं वेळापत्रक जाहीर झालं. मोहाली आणि धरमशाला इथं आता सामने होणार नाहीत. २५ मे रोजी अंतिम सामना आता तीन जून रोजी होणार आहे.

****

राज्यात या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, आणि विजांसह पाऊस तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यात २१ मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment