Monday, 19 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कृषी विकासासाठी 'एक राष्ट्र, एक कृषी आणि एक संघ' धोरणाची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

·      'ऑपरेशन सिंदूर' च्या सन्मानार्थ ठिकठिकाणी तिरंगा यात्रा उत्साहात

·      नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी

·      अक्कलकोट इथं कापड कारखान्याला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू

आणि

·      २५ मे पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

****

देशभरात कृषी विकासासाठी 'एक राष्ट्र, एक कृषी आणि एक संघ' अशी घोषणा करण्यात आली आहे. नागपूर इथं काल केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

बाईट – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

या मोहिमेअंतर्गत देशातले दोन हजार कृषी वैज्ञानिक संशोधन करतील आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करतील. विकसित कृषी संकल्प अभियान खरीप पिकांच्या हंगामासाठी २९ मेपासून १२ जून पर्यंत सुरू राहिल असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं. एक राष्ट्र, एक कृषी आणि एक संघ या त्रिसुत्रीमुळे कृषी संशोधन हे प्रयोगशाळेतूनच नाहीत शेतकऱ्यांच्या बांधावरूनचं होईल, याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात होईल असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

एक राष्ट्र, एक कृषी आणि एक संघ या त्रिसुत्रीमुळे देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, संपूर्ण देशाचा कृषी विभाग शेतीपर्यंत नेणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उद्घाटन झालेल्या नॅशनल सॉइल स्पॅक्ट्रल लायब्ररी आणि ए आय स्मार्ट फेरोमेंट्रॅप बाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

****

नौवहन उद्योगात महिलांना अधिक संधी उपलब्ध करुन दिल्यानं, महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करतानाच नौवहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबुतीकरणाला चालना मिळेल, असं केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. नौवहन क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “नौवहन उद्योगातील महिलांचं स्थान: कायापालट आणि शाश्वततेकडे वाटचाल” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला नौवहन क्षेत्रातले आघाडीचे उद्योजक, वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ राज्यात ठिकठिकाणी कालही तिरंगा यात्रा काढण्यात आल्या. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात आपण विजयश्री प्राप्त केली, या शस्त्रास्त्रांसाठी जगातून भारताकडे मागणी होत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर इथंही काल तिरंगा यात्रा काढण्यात आली, क्रांती चौक इथं या यात्रेचा प्रारंभ झाला. फुलंब्री इथंही काल सकाळी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

जालना इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे यांनी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. मामा चौकातून सुरु होत बडी सडक इथल्या श्रीराम मंदिरात महाआरतीने या यात्रेचा समारोप झाला. सेना दलातले सेना पदक प्राप्त माजी कॅप्टन भानुदास शिरसाट यावेळी म्हणाले,

बाईट – माजी कॅप्टन भानुदास शिरसाट

नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली इथं खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या तिरंगा रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, माजी सैनिक यांच्यासह नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आज नांदेड शहरात पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

लातूरमध्येही भाजपतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. गंजगोलाई इथल्या माता जगदंबा देवीच्या मंदिरापासून या यात्रेची सुरुवात झाली. यावेळी माजी सैनिक आपल्या गणवेशात हजर होते. राष्ट्रगीताने या तिरंगा यात्रेची सांगता झाली.

****

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली सुसज्जता जगाला दिसली, असं मत छत्रपती संभाजीनगर इथले प्राचार्य डॉक्टर उल्हास शिऊरकर यांनी व्यक्त केलं. भारतीय सैन्याने कोणतीही जीवीत हानी न होऊ देता पाकिस्तानला धडा शिकवल्याचं, शिऊरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले....

बाईट – डॉक्टर उल्हास शिऊरकर

****

व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पीटर चौकात काल नवे पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी सोहळा झाला. यावेळी कार्डिनल डॉमिनिक माम्बर्टी यांनी पोप लिओ चौदावे यांना विधिवत पॅलियम अर्पण केला आणि ते चर्चचे प्रमुख असल्याची औपचारिकता पूर्ण केली.

****

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं काल एका कापड कारखान्याला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने संध्याकाळच्या सुमाराला ही आग आटोक्यात आणली. मृतांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचं कुटुंब आणि कामगारांचा समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीतून तीन जणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे.

****

हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला काल सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. दूर्घटनेतल्या जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे.

****

परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त, विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. परभणीला अन्नप्रक्रिया उद्योगाचं केंद्र म्हणून विकसित करायचं असून, यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडूनच घेतला जाईल, असं बोर्डीकर यांनी यावेळी सांगितलं.

****

भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन काल धाराशिव इथं पार पडलं. बिहार इथल्या बौद्धगया मधला महाबोधि बुद्ध विहार बौद्ध धर्माच्या ताब्यात द्यावा, यासाठी बी टी कायदा १९४९ रद्द करण्याची मागणी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी यावेळी केली. या अधिवेशनाच्या निमित्ताने धाराशिव शहरातून समता सैनिक दलाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.

****

मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर परिसरात काल दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शहरातल्या शिवाजीनगर भुयारी बोगद्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती. सिल्लोड तालुक्यातल्या भवन परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या केदारखेडा इथं अंगावर वीज कोसळून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर बदनापूर तालुक्यातल्या कुसळी इथं दोन म्हशी दगावल्या. या पावसामुळे उन्हाळी मका, बाजरीसह कांदा बियाण्यांचं नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा पिकांसह इतर फळबागांचं मोठं नुकसान होत आहे.

****

दरम्यान, कर्नाटक किनाऱ्यानजिक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्यानं आजपासून २५ मे पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २१ तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या हलगरा शिवारात मोटार सायकल आणि क्रुझर जीपच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू. मृतांमध्ये निलंगा शहरात राहणारे काशिनाथ कांबळे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment