Monday, 19 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.05.2025 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १९ मे २०२ सकाळी.०० वाजता.

****

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला युद्धविराम संपल्याचा दावा भारतीय लष्करानं खोडून काढला आहे. १८ मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी महासंचालक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. १२ मे रोजी महासंचलकांमध्ये दोन्ही देशातील महासंचालक स्तरावर चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती. युद्धविराम सुरु ठेवण्यासाठीची कोणतीही निश्चित अशी तारीख नाही, असंही लष्करानं म्हटलं आहे.

****

दहशतवादाविरोधात भारताची सामूहिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे.

****

भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील पहिला गट सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि डेन्मार्कला भेट देईल. जदयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचा तिसरा गट इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देणार आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा चौथा गट युएई, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देईल.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील पाचवा गट अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देईल. तसंच द्रमुक खासदार कनिमोई  करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील सहावा गट स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशियाला भेट देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सातवा गट इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोनं काल ईओएस - झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं, मात्र उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम अयशस्वी झाल्याचं, इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, दरम्यान, इस्रो यापुढील प्रक्षेपण सुरूच ठेवणार असून, या वर्षी दर महिन्याला एक मोहीम आखली जाणार असल्याची माहितीही नारायणन यांनी दिली.

****

राज्याचे उप मुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज एक दिवसाच्या बीड दौऱ्यावर आले आहेत. प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. सकाळी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर इथं ते त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचा आढावा ते घेणार आहेत. यानंतर अंबाजोगाई इथं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने बीडला जाणार आहेत. दुपारी दीड वाजता ते बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होतील. यानंतर उपमुख्यमंत्री पवार रात्री छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात बीड विभागाने एप्रिल महिन्यात उत्पन्नात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती विभागनियंत्रक अनुजा दुसाणे यांनी दिली. बीड विभागाच्या उत्पन्नात ३ लाख ४७ हजार रूपयांनी वाढ झाली असून सुटीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढली आहे. दरम्यान, बीड विभागातर्फे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, कोल्हापूर या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

****

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं जगबुडी नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास झाला, अपघातात कार चालक बचावला असून त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार शंभरफूट खोल नदीत कोसळली, त्यानंतर क्रेनच्या साहाय्यानं ती वर काढण्यात आली, कारमधील प्रवासी मुंबईहून देवरुख इथं अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात घडला.

****

राज्यात आजपासून २५ मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २१ तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

गेल्या दहा बारा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे तेवीस जिल्ह्यांतल्या २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीजवळ वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे, या काळात मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. लखनऊच्या इकाना स्टेडीयमवर आज सांयकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.

****

No comments:

Post a Comment