Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20 May 2025Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
बाईट – छगन भूजबळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तर, छगन भुजबळ यांच्या अनुभवाचा लाभ राज्याला आणि त्यांना मिळणाऱ्या विभागाला होईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
****
नवीन वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरुवात करताना, याचिकाकर्त्यांनी या कायद्यातल्या तीन मुद्यांवर आक्षेप घेतला असल्यामुळे या तीन मुद्यांवरच चर्चा केंद्रित रहावी, असा युक्तिवाद केला, त्यावर बोलताना कपिल सिब्बल यांनी, याचिकाकर्त्यांचा पूर्ण कायद्यालाच विरोध असल्याचं सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते शहाऐंशी वर्षांचे होते. नारळीकर यांचं खगोल भौतिकी शास्त्रातलं कार्य जगभरात नावाजलं गेलेलं आहे. ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी १९७२ मध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. १९८८ साली त्यांची पुण्यातल्या आयुका या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. नारळीकर यांना खगोलशास्त्रातल्या त्यांच्या कार्यासाठी टायसन मेडल तसंच स्मिथ पुरस्कार असे जागतिक पातळीवरचे सन्मान मिळाले होते. डॉक्टर जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रँव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ हे सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत.
चौऱ्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नारळीकर यांनी भूषवलं होतं. विज्ञानप्रसारासाठी डॉक्टर नारळीकर यांनी अनेक माध्यमांचा वापर केला, त्यात त्यांच्या विज्ञान विषयक लिखाणाचा मोठा भाग आहे. चार नगरांतले माझे विश्व, या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा तर, ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून, याशिवाय देशविदेशातल्या अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.
****
डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे राज्यात विविध क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. देशाची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातला तेजस्वी तारा निखळला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी मातीच्या या सुपुत्रानं खगोलशास्त्रात जागतिक पातळीवर घेतलेली झेप महाराष्ट्रासाठी अभिमानाची होती, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. शासनाला वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे राज्याला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचं स्थान प्राप्त झाल्याचं शिंदे म्हणाले.
****
जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्राकोमा, या सार्वजनिक आरोग्य समस्येचं यशस्वीपणे निर्मूलन केल्याचं प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. जिनीव्हा इथं नुकत्याच झालेल्या अठ्ठ्याहत्तराव्या जागतिक आरोग्य परिषदेत हे प्रमाणपत्र देण्यात आलं. ट्राकोमा, हा जिवाणूंच्या संसर्गामुळे होणारा, दृष्टीवर गंभीर परिणाम करणारा डोळ्यांचा आजार आहे. ट्राकोमा आजाराच्या निर्मूलनाचं ध्येय गाठणारा भारत हा दक्षिण आशियातला तिसरा देश ठरला आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या बुधवार रोजी, तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी आज, मंगळवार रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment