Tuesday, 20 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कृषी कर्जासाठी सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

·      खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पूर्ण मदतीची कृषीमंत्र्यांची ग्वाही, अवकाळी पावसामुळे राज्यात एकूण २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान

·      शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरु होणार

·      मराठवाड्यात काल झालेल्या विविध अपघातांत १२ जणांचा मृत्यू

आणि

·      मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर, पुढील दोन दिवस पाऊस राहणार- हवामान खात्याचा अंदाज

****

कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहेत. ते काल मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६७ व्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला. कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदा दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

यंदा चांगला पावसाळा होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे, त्यामुळं खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते काल नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा कोकाटे यांनी दिला, तसंच खरीप पीकासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज द्यावं, असं आवाहन केलं.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यात एकूण २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहितीही कोकाटे यांनी दिली. यासंदर्भात लवकर पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

खताच्या लिंकिंगबाबत कायदा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाचं चित्र बदलण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरु असलेल्या कामांचाही पवार यांनी आढावा घेतला. या कामासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असून, निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. या विकास आराखड्यात २८६ कोटी ६८ लाख रूपयांच्या ९२ विकास कामांना मान्यता दिल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.

परळी औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आवश्यक सोयीसुविधांचा, तसंच अहिल्यानगर - बीड - परळी रेल्वेमार्गाचाही पवार यांनी आढावा घेतला.

****

शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरु होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या ७२३ जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात येणार असून, सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे ६५ हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देईल, असं चौहान यांनी सांगितलं….

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. आज सकाळी त्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. भुजबळ यांच्याकडे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचा कार्यभार सोपवण्याची शक्यता आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल. २० मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. प्रवेशासाठी अंतिम अर्ज २१ मे ते २८ मे या कालावधीत भरता येणार आहेत.

****

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. नांदेड शहरात आयटीआय रस्त्यावरील तिरंगा ध्वजापासून जोरदार पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, यांच्यासह माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. या यात्रेत सहभागी झालेले सीमा सुरक्षा दलाचे माजी सैनिक राघोजी मोळके म्हणाले,

बाईट - माजी सैनिक राघोजी मोळके

****

छत्रपती संभाजीनगर इथले पर्यटन व्यावसायिक जसवंतसिंह यांनी, ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने बोलतांना, दहशतवादाविरोधातल्या या कारवाईत पाकिस्तानच्या बाजूने उभ्या असलेल्या तुर्कीए आणि अजहरबैजान च्या बहिष्काराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले..

बाईट - पर्यटन व्यावसायिक जसवंतसिंह

****

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी काल देगलूर तालुक्यातल्या तमलूर इथले हुतात्मा सचिन वनजे यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट घेतली. यावेळी शासनातर्फे योग्य ती मदत करण्याचं तसंच घरकुल योजनेतून पक्कं घर देण्याचं आश्वासन सावे यांनी दिलं. यावेळी त्यांनी त्यांचा एक महिन्याचा पगाराचा धनादेश वनजे यांच्या कुटूंबियांना सुर्पूद केला.

****

मराठवाड्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. लातूर- नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातल्या घरणी गावाजवळ दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार झाले. काल दुपारी झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. मृतांमध्ये घरणी इथल्या विठ्ठल शिंदे, यशोदा शिंदे आणि लालासाहेब पवार यांचा समावेश आहे. चाकूर तालुक्यात आष्टामोड पथकर नाक्याजवळ झालेल्या अन्य एका अपघातात कार आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.

लातूर - बार्शी महामार्गावर ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टरच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून, चालक फरार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या सौंदलगाव शिवारात कारच्या धडकेत पायी जात असलेल्या माय - लेकीचा मृत्यू झाला. काल सकाळी हा अपघात झाला. रोहिणी चव्हाण आणि नुरवी चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले कारचालक अमरदीप चव्हाण हे बीडकडे जात असताना त्यांचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं पोलीसांनी सांगितलं.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळपूर इथं हायवा चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाचनवेल इथं पिकअपच्या धडकेत विठ्ठल घुले या तरुणाचा मृत्यू झाला.

****

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई इथं वीज पडून शेतात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालही पाऊस झाला. वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द परिसरातल्या नायगव्हाण इथं जोरदार वादळी वाऱ्यामुळे लिंबाचं झाड पडून गाय दगावली. जिल्ह्यात पैठण, खुलताबाद, वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. गंगापूर तालुक्यात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment