Tuesday, 20 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.05.2025 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०२ सकाळी.०० वाजता.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी उपस्थिती होती.

****

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. नारळीकर यांचं खगोल भौतिकी शास्त्रातलं कार्य जगभरात नावाजलं गेलेलं आहे.ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी १९७२ मध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. १९८८ साली त्यांची पुण्यातल्या आयुका या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. नारळीकर यांना खगोलशास्त्रातल्या त्यांच्या कार्यासाठी टायसन मेडल तसंच स्मिथ पुरस्कार असे जागतिक पातळीवरचे सन्मान मिळाले होते. चौऱ्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नारळीकर यांनी भूषवलं होतं. विज्ञानप्रसारासाठी डॉक्टर नारळीकर यांनी अनेक माध्यमांचा वापर केला, त्यात त्यांच्या विज्ञान विषयक लिखाणाचा मोठा भाग आहे. चार नगरांतले माझे विश्व, या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

****

ऑपरेशन सिंदूर या भारताच्या कारवाईबाबत जगातल्या विविध देशांना माहिती देण्यासाठी जाणार असलेल्या, खासदारांच्या एकूण सात प्रतिनिधी मंडळांपैकी तीन प्रतिनिधी मंडळांशी आज परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री चर्चा करणार आहेत. या प्रतिनिधी मंडळांनी ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका जगासमोर मांडण्याच्या दृष्टीनं ही चर्चा होणार आहे.

****

प्रवासी भारतीयांसाठीच्या ओवरसीझ सिटीझन ऑफ इंडिया म्हणजेच ओसीआय या संकेतस्थळाचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. या पोर्टलमुळे पन्नास लाखांहून अधिक प्रवासी भारतीयांना विविध सुविधा एका संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अनिवासी भारतीय आणि देशपरदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिक कार्यक्षमतेनं काम करणाऱ्या या पोर्टलची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर प्रशंसा केली आहे.

****

शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या २९ मे पासून देशव्यापी ‘विकसित कृषी संकल्प‘ अभियान सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या ७२३ जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात येणार असून, सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. एकंदर ६५ हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देईल. जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज तीन बैठका होतील असं त्यांनी सांगितलं. या अभियानात २ हजार १७० पथकं तयार करण्यात येणार असून प्रत्येक पथकात किमान शास्त्रज्ञांचा समावेश असेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देश-परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे बावीसावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना 1800-11-7800 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा नरेंद्र मोदी अॅप आणि मायजीओव्ही ओपन फोरमवर ऑनलाइन नोंदवता येतील. या सूचना २३ तारखेपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.

****

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेसाठी भाविकांचा मोठा ओघ सुरू आहे. तीस एप्रिलला यात्रा सुरू झाल्यापासून वीस दिवसातच दहा लाखांहून जास्त भाविकांनी  बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचं दर्शन घेतलं आहे. ही यात्रा सुरळीतपणे पार पडावी, यासाठी उत्तराखंड सरकारनं व्यापक व्यवस्था केली असून, भाविकांसाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधांषह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय, यात्रेच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

****

इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज पुण्यतिथी आहे. वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या कार्याला, त्यागाला आणि स्वराज्यप्रेमाला वंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरंजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मल्हारराव होळकर यांना अभिवादन केलं आहे.

****

विजापूर हैदराबाद महामार्गावर बसला झालेल्या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले असून वीस जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींवर हैदराबादच्या उस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या दुर्घटनेमागच्या कारणांचा तपास सुरू आहे.

****

No comments:

Post a Comment