Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
छतीसगडमधील नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा इथं सुरक्षा दलांशी
झालेल्या चकमकीत २० नक्षलवादी ठार तर एक जवान हुतात्मा झाल्याचं
वृत्त आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चकमकीत
नक्षलवाद्यांचा आघाडीचा नेता ठार झाल्याचं वृत्त आहे. डीआरजी जवानांसोबत नक्षलवाद्यांची
चकमक अजूनही सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रघान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १०३ रेल्वे
स्थानकांच्या पुनर्विकास कामांचं उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात
येणार आहे. पुनर्विकसित कामांमध्ये सुखकर विश्रामगृह, स्वच्छ स्वच्छता गृह प्रवाशांना उपलब्ध
होणार आहेत. तसंच गाड्यांच्या थांब्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या स्थानकांमध्ये राज्यातल्या आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे,
केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन,
माटुंगा, मुर्तिजापूर, इतवारी,
परेल, सावदा, शहाड,
वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे.
****
पाकिस्तानप्रणीत दहशतवादाच्या विरोधातली
भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी पाठवण्यात येणारी शिष्टमंडळं आजपासून
रवाना होत आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ प्रथम
संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर रवाना होत आहे. हे शिष्टमंडळ त्यानंतर २४ मे रोजी
कांगो, २८
मे रोजी सिएरा लिओन आणि ३१ मे रोजी लाइबेरिया इथं जाणार आहे.
****
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाबमध्ये
अमृतसर इथं पाकिस्तानी घुसखोराला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी
त्याला स्थानिक पोलिसांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे.
****
ऑपरेशन सिंदूर संदर्भात काँग्रेस
अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाचा भारतीय जनता पक्षानं निषेध केला आहे. खरगे
यांचं विधान सैन्यदलाचा अपमान असल्याचं आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलताना
प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पूर्वी
अशीच विधानं केल्याचं त्रिवेदी म्हणाले. काल कर्नाटक इथं झालेल्या कार्यक्रमात खरगे
यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात वक्तव्य केलं होतं.
****
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्यदलांच्या
जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसनं
आज ‘तिरंगा
यात्रा’ काढली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त
भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर भारत माता चौक ते शहीद चौक दरम्यान
ही 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. तिरंगा
यात्रेत काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी, सेवा दल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
सहभागी झाले होते. वाशिममध्येही काँग्रेसनं आज तिरंगा यात्रा काढली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे इथल्या ‘आयुका’ संस्थेत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ
डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच डॉ नारळीकर यांच्या कुटुंबियांची
सांत्वनपर भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या. डॉ नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
कैलास मानसरोवर यात्रेसाठीची पहिली
सोडत आज जाहीर करण्यात आली. परराष्ट्र व्यवहारमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी दिल्ली
इथं ऑनलाईन संगणकीकृत सोडत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७५० यात्रेकरुंची निवड करण्यात
आली आहे. ३० जून रोजी हे यात्रेकरु कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना होतील.
****
२९ मे ते २ जून दरम्यान तापमान ५५
अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं हाय अलर्ट जारी केला
आहे, असा
दावा समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे. सरकारकडून पत्र सूचना कार्यालयानं हा दावा फेटाळला
आहे. सरकारनं अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही. नागरिकांनी हवामानाच्या सूचनांसाठी
हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा
तयार झाल्यानं राज्यभरात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांना
ऑरेंज अलर्ट तर जालना, परभणी, हिंगोली आणि
नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, काल दुपारपासून पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात
गेल्या २४ तासांत सरासरी ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मच्छिमारांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला असून पुढचे दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये आज मुंबई
इथं मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्ली आणि मुंबई संघांना
प्लेऑफ फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या सामन्यावर पावसाचं
सावट आहे. दरम्यान, बीसीसीआयनं साखळी फेरीतील उर्वरीत सामन्यांची
वेळ दोन तासांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment