Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 22 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारताच्या
निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे, असं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते आज बिकानेर इथं पुनर्विकसित
देशनोक अमृत स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच पंतप्रधानांच्या उपस्थितीत बिकानेर-मुंबई
दरम्यानच्या नव्या रेल्वेला आजपासून सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून १८ राज्यांमधल्या १०३ अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन केलं. देशातील रस्ते,
विमानतळ, रेल्वे आणि रेल्वेस्थानकं आधुनिक करण्यात
येत आहेत. सरकार एकाच वेळी देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गत
आधुनिक स्वरुप देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
गेल्या ११
वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेनं पायाभूत सुविधांमध्ये
अभूतपूर्व सुधारणा केल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रसंगी
केलं. ते म्हणाले.
बाईट - रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव
पुनर्विकसित
रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्यासह विविध सुविधांचा
समावेश आहे. अमृत भारत रेल्वे स्थानकाच्या या टप्प्यात राज्यातल्या आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली,
धुळे, केडगाव, लासलगाव,
लोणंद जंक्शन, माटुंगा, मुर्तिजापूर,
इतवारी, परेल, सावदा,
शहाड, वडाळा रोड स्थानकांचा पुनर्विकास करण्यात
आला आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या
परळ इथं कार्यक्रमाला उपस्थिती होती.
****
जल संसाधन, नदी विकास
आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं देशातील पहिली झऱ्यांची गणना सुरु करण्याचा निर्णय
घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ मे पासून ही गणना सुरु झाली आहे. नागरिकांनी
भूजल सर्वेक्षण विभागाला आपापल्या भागातील झऱ्यांची माहिती ८०० ७४० १४०८ या क्रमांकावर
कळवावी, असं आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी केलं
आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गणनेत १३ झरे आढळून आले आहेत.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये संगमेश्वर
इथं सर्वाधिक ८२ पूर्णांक ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पूर्वमोसमी पावसामुळे
पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली, तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते आणि किटकनाशके मिळण्यासाठी बाजारात
उपलब्ध होणाऱ्या या उत्पादकांची नियमित तपासणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर
एक आणि तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही
निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये,
अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देश विभागातर्फे देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.
आर. कळसाईत यांनी केलं आहे.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं प्रवेश फेरी १ चे सुधारित वेळापत्रक आज, दुपारी तीन
वाजता जाहीर केलं जाणार आहे. प्रवेशासाठी अंतिम अर्ज २८ मे पर्यंत भरता येतील. विद्यार्थी
कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त १० महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. अधिक
माहितीसाठी Maha fyjc admissions.in या संकेत स्थळाला भेट देण्याचं
आवाहन संचालनालयानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment