Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24 May 2025
Time 18.10 to 18.20 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२५ दुपारी १८.०० वा.
****
· भविष्यासाठी तयार शहरांचं नियोजन ही काळाची गरज - नीति आयोगाच्या
प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन
· केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र
दौऱ्यावर; नागपूर, नांदेड
तसंच मुंबईत विविध कार्यक्रम
· रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी
नागरिकांचं शिक्षेनंतर मायदेशी प्रत्यार्पण
· पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर
शहरात कापडी बॅग वेंडिंग मशीन कार्यान्वित
आणि
· नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल
****
भारताचं शहरीकरण झपाट्याने होत असून, भविष्यासाठी तयार शहरांचं नियोजन ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज नीति आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय
परिषदेची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी
ते बोलत होते. ‘विकसित भारतासाठी विकसित राज्ये - २०४७’, अशी
या बैठकीची संकल्पना होती. विकास, नवोन्मेष आणि शाश्वतता ही आपल्या
शहरांच्या विकासाची मुख्य सूत्रं असली पाहिजेत, असं पंतप्रधान
म्हणाले. प्रत्येक राज्यानं, सर्व पायाभूत सुविधा असणारं,
जागतिक मानकं पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं,
असं आवाहन त्यांनी केलं. या बैठकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे
मुख्यमंत्री, लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रीय
मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी
अधिकारी उपस्थित होते.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी
उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय
प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. याअंतर्गत भाजपाचे खासदार बैजयंत
पांडा, काँग्रेस खासदार शशी थरुर आणि राष्ट्रवादी
काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातली तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळं
आज रवाना झाली. बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातलं भारताचं शिष्टमंडळ बाहरेन इथं पोहोचलं.
या प्रतिनिधीमंडळात एमआयएमचे खासदर असदुद्दीन ओवेसी, काश्मीरचे
माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर प्रतिनिधींचाही समावेश आहे. हे प्रतिनिधीमंडळ
सौदी अरेबिया, कुवैत आणि अल्जेरिया या देशांनाही भेट देणार आहे.
शशी थरूर यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ सुरुवातीला गयानाला भेट देऊन भारताची भूमिका
मांडेल. त्यानंतर ते अमेरिका, पनामा, ब्राझील
आणि कोलंबियाला भेट देणार आहेत.
****
द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळानं
आज रशियात मॉस्को इथं भारतीय दूतावासात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पहलगाम दहशतवादी
हल्ला हा पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दहशतवादी संघटनेला संयुक्त
राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने संरक्षण दिलं होतं, असं
त्या म्हणाल्या. भारताने या हल्ल्याला जबाबदारीने प्रत्युत्तर दिलं आणि कोणत्याही नागरिकांवर
परिणाम होणार नाही आणि लष्करी तळांना कोणतीही हानी पोहोचणार नाही याची खात्री केली,
असंही त्यांनी सांगितलं. कनिमोळी यांच्या नेतृत्वातलं हे शिष्टमंडळ रशियानंतर
आता स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया,
लाटवियाला भेट देईल.
****
दरम्यान, संयुक्त जनता
दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखाली भारताचं जपानमधलं शिष्टमंडळ दक्षिण कोरियाला
रवाना झालं. आज जपानमधल्या दूतावासात माध्यमांशी साधताना झा यांनी, २२ एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका
स्पष्ट केली. ऑपरेशन सिंदूरबद्दलही त्यांनी माहिती दिली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र
दौऱ्यावर येत आहेत. उद्या नागपूर, परवा २६ तारखेला
नांदेड, तर २७ तारखेला मुंबईत त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
होणार आहेत. खासदार अशोक चव्हाण यांनी आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन शहा
यांच्या हस्ते होणार असून, ‘शंखनाद’ या
जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत.
****
पंतप्रधान आदिवासी न्याय महा मोहिमेअंतर्गत राज्यातल्या अतिदुर्गम
आदिवासी भागांमध्ये ३८ नव्या अंगणवाडी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. मुलांना
आणि गर्भवती महिलांना पोषणयुक्त आहार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याआधी या भागात अशा सुविधा नव्हत्या.
लोकसंख्येच्या अटीशिवाय अंगणवाडी केंद्र उघडण्याचा निर्णय महिलांचा विकास साधण्यासाठी
महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती
तटकरे यांनी सांगितलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी
नागरिकांचं शिक्षेनंतर मायदेशी प्रत्यार्पण करण्यात आलं. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या
हद्दीत राहणाऱ्या या नागरिकांची सहा महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत
पाठवण्यात आलं. भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी पारपत्र अधिनियम आणि परदेशी
व्यक्ती अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व १३ जणांची
मायदेशी प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आल्याचं रत्नागिरी पोलिसांनी
सांगितलं.
****
ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात बीड शहरात सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस प्रारंभ झाला. सीमारेषेवर
मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली. भारतीय सैन्याला अभिवादन करण्याकरता भर पावसात बीडमधून प्रतिष्ठित नागरिक तथा
असंख्य तरुण राष्ट्रीय ध्वज हाती घेऊन मोटारसायकलवर स्वार झाले होते. सोलापुरातही आज
तिरंगा रॅली काढण्यात आली.
****
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातले हुतात्मा जवान संदीप
गायकर यांच्या पार्थिवावर आज ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले. गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरोधात
लढताना त्यांना वीरमरण आलं. या वीर सैनिकाला शेवटची मानवंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी
झाली होती.
****
प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन
देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहरात विविध ठिकाणी पाच कापडी बॅग वेंडिंग
मशीन कार्यान्वित केल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणून नागरिकांना
सहज आणि स्वस्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘प्लास्टिकला
नाही, कापडी बॅगला होय’ या घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत आहे. या वेंडिंग मशिनमधून
केवळ पाच रुपयांत पर्यावरणपूरक, पुन्हा वापरता येण्याजोगी कापडी
बॅग सहज मिळू शकते. हा उपक्रम स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत राबवण्यात येत असून,
नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या सुखापुरी फाट्यावर आज पहाटे
मिनी ट्रॅव्हल्स आणि टेंपोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तिच्या
१४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अंजना सापनार आणि अनुसया सापनार, अशी मृतांची नावं असून, त्या हिंगोली जिल्ह्यातल्या
धानोरा इथल्या रहिवासी आहे. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून, सात प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात
झाल्याचं, महामार्ग पोलिसांनी सांगितलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी
१८ सदस्यीय कसोटी क्रिकेट संघ आज जाहीर केला. संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात
आलं असून, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची
जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय कसोटी संघात यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू
ईस्वरन, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी,
रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्षदीप
सिंग आणि कुलदीप यादव या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. भारताचे दिग्गज कसोटीपटू रोहित
शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही पहिलीच
कसोटी मालिका होत आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्सचा
सामना दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आज संध्याकाळी
साडे सात वाजता या सामन्याला सुरूवात होईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल
झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या
लवकर सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा,
मध्य महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड
ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment