Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 May 2025
Time 18.10 to 18.20 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०२५ दुपारी १८.०० वा.
****
· ‘ऑपरेशन सिंदूर’ हे बदलत्या भारताचं प्रतिबिंब
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन
· महाराष्ट्रातल्या क्रीडापटुंच्या खेलो इंडीयामधील कामगिरीचा
पंतप्रधानांकडून गौरव
· राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या
बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सशस्त्रदलं, पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव
आणि
· किदंबी श्रीकांतला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद
****
ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं
प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या कारवाईनं
जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी
यांनी आकाशवाणीवरील आपल्या `मन की बात` कार्यक्रमात सांगितलं. आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला.
ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या नक्षलग्रस्त भागात मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्याचं
सांगून गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी गावात पहिल्यांदाच बस सेवा पोहचल्याचं उदाहरण
त्यांनी दिलं. माओवाद्यांच्या प्रभावाखालच्या दंतेवाडामधल्या विद्यार्थ्यांनी दहावीत
मिळवलेल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एका महिन्यापेक्षाही
कमी काळ उरला असून, प्रत्येकानं आता योगाभ्यासाशी जोडून
घ्यावं असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. यंदाच्या योगदिनासाठी आपण विशाखापट्टणममधल्या
कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया
स्पर्धेतील क्रीडापटुंच्या कामगिरीचे कौतुक त्यांनी केलं. त्यांनी खेळाडुंचा आवर्जून
उल्लेख केला. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
लहान मुलांना लहानपणापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी लावण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी केलं. याअनुषंगानं सीबीएसईच्या शाळांमध्ये मुलांना किती प्रमाणात
साखर खावी याबद्दल जागरूक करण्यासाठी विशेष उपक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
अशाच प्रकारच्या उपाययोजना सर्व कार्यालयं, उपहारगृह आणि संस्थांमध्येही राबवला गेला पाहीजे, अशी
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून विशेषतः टाकाऊ कागदापासून
पुनर्निर्मितीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणंही
त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. महाराष्ट्रात जालन्यामधील स्टार्टअपचा त्यांनी गौरवपूर्ण
उल्लेख केला. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातल्या वाढत्या मधाचा गोडवा म्हणजे आत्मनिर्भर भारताचा स्वाद
आहे, असं म्हणत श्रोत्यांनी स्थानिकांकडूनच
मध खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मधमाशांच्या संरक्षण संवर्धनासाठी होत
असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगतांना त्यांनी पुणे इथल्या अमित याच्या प्रयत्नांचा उल्लेखही
केला. वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला
कायमच जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशभरातल्या
ड्रोन दीदींची यशस्वी कामगिरीही पंतप्रधानांनी आजच्या ‘मन की बात’ मधून श्रोत्यांसमोर मांडली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही
आघाडीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक दिवसीय बैठक आज नवी दिल्लीत झाली.
शासनाच्या विविध योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय
सशस्त्र दलं आणि पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन यावेळी घेण्यात आलेल्या ठरावाद्वारे
करण्यात आलं. येत्या जनगणनेदरम्यान जातीनिहाय गणनेचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचं
अभिनंदन दुसऱ्या ठरावात करण्यात आलं. विविध राज्यांतल्या शासनाच्या चांगल्या उपक्रमांची
माहिती यावेळी देण्यात आली. तसंच सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या वर्षपूर्तीचा
कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीचं
आयोजन आणि आणीबाणी लादल्याच्या घटनेच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकतंत्र हत्या’ दिवस पाळण्याची रूपरेषा या महत्वाच्या
मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या २० मुख्यमंत्र्यांसह १८ उपमुख्यमंत्री या बैठकीस
उपस्थित होते.
****
भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या
ठिकाणांवर, त्यांच्या मुख्यालयांवर आणि हालचालींच्या
ठिकाणांवर अचूक आणि संतुलित कारवाई कशी केली याची माहिती काँग्रेस खासदार शशी थरूर
यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं दिली आहे. भारताचा
या संदर्भातला संदेश जगापर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कतारमध्ये पोहोचलं
आहे. द्रविड मुनेत्र कळघम - द्रमुक पक्षाच्या खासदार कनिमोझी यांच्या अध्यक्षतेखाली
सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे
रवाना झाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब
अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले
आहेत. भारताचं एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ २६ आणि २७ मे दरम्यान कुवेतचा दौरा करणार आहे.
खासदार बैजयंत जय पांडा याचं नेतृत्व करत आहेत.
****
मराठवाडा, विदर्भ,
तेलंगणा आणि दक्षिण गुजरातमध्ये आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी हलका ते
मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. छत्रपती
संभाजीनगर शहर परिसरात आज अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. जालना शहराहस जिल्ह्यात
आज दुपारी चार वाजता मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार
पाऊस सुरु असून खामगाव, शेगाव, चिखली सह
अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.
****
राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेच्या
दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय विभागीय कार्यालयांची यादी जाहीर
करण्यात आली असून त्यात कोकण विभागाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या मोहिमेत दुसरा
क्रमांक नाशिक विभागाला तर तिसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर विभागाला मिळाला आहे. राज्याच्या
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमावर याची माहिती दिली आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातील हुतात्मा संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा
गावी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
यावेळी हुतात्मा गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात
आली.
****
केंद्र शासनाच्या ‘सबका साथ सबका विकास’ तसंच सुशासनाच्या प्रतिज्ञेमागं
अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाची प्रेरणा असल्याची भावना केंद्रीय महिला आणि बाल विकास
मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज व्यक्त केली. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या
३०० व्या जयंतीनिमित्त आज नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम.मध्ये ‘तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर’ या विषयावर एक
दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
****
बॅडमिंटनमध्ये, भारताचा किदंबी श्रीकांतनं आज कुआलालंपूर इथं झालेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेचं
उपविजेतेपद पटकवलं. त्याला पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या जागतिक क्रमवारीतल्या
चौथ्या क्रमांकाच्या शी फेंग लीकडून २१-११, २१-९ अशा सरळ गेममध्ये
पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी, २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद
स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या श्रीकांतनं तनाकावर २१-१८, २४-२२
अशा सरळ गेममध्ये विजय मिळवून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्जनं अहमदाबाद इथं सुरू सामन्यात गुजरात टायटन्ससमोर
विजयासाठी २३१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरात टायटन्स संघानं सात षटकांत तीन बाद ४४ धावा केल्या आहेत. त्याआधी चेन्नई
सुपर किंग्जनं डेवाल्ड ग्रेवीसच्या २३ चेंडुंमधील ५७ तर डेव्हन कॉनवेच्या ३५ चेंडुंमधील
५२ धावांमुळं २० षटकांत पाच बाद २३० धावा केल्या आहेत. आजचा दुसरा सामना सनरायझर्स
हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता दिल्लीमध्ये
खेळवला जाणार आहे.
****
दीव दमण समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स
स्पर्धेत काल पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने पेंचक सिलट प्रकारात ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य अशी एकूण १२ पदकांची कमाई करत उपविजेतेपद
पटकावलं. बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघानं कास्यपदक मिळवलं. ५ सुवर्ण,
५ रौप्य, १० कास्य अशी २० पदकं जिंकून महाराष्ट्र
पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात
होत आहे. या स्पर्धेत रोहन बोपण्णा, युकी भांब्री, एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलिपल्ली
हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील.
****
No comments:
Post a Comment