Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
भविष्यासाठी तयार शहरांचं नियोजन ही काळाची गरज - नीति
आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
विकसित भारत-२०४७ चं लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण
क्षमतेने सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
·
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र
दौऱ्यावर; नागपूर, नांदेड तसंच मुंबईत विविध कार्यक्रम
·
पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती
संभाजीनगर शहरात कापडी बॅग वेंडिंग मशीन कार्यान्वित
आणि
·
नैऋत्य मोसमी पाऊस वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल, राज्यातही
सर्वत्र पावसाचा अंदाज
****
भारताचं
शहरीकरण झपाट्याने होत असून, भविष्यासाठी तयार शहरांचं नियोजन ही काळाची
गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल नीति आयोगाच्या
दहाव्या प्रशासकीय परिषदेची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ‘विकसित भारतासाठी विकसित राज्ये - २०४७’, अशी या बैठकीची संकल्पना होती. विकास, नवोन्मेष आणि शाश्वतता
ही आपल्या शहरांच्या विकासाची मुख्य सूत्रं असली पाहिजेत, असं
पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक राज्यानं, सर्व पायाभूत सुविधा असणारं,
जागतिक मानकं पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं,
असं आवाहन त्यांनी केलं. या बैठकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे
मुख्यमंत्री, लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रीय
मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी
अधिकारी उपस्थित होते.
****
विकसित
भारत-२०४७ चं लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र
‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. तसंच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी
आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी
दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राच्या विविध संकल्प, प्रकल्प आणि योजनांना मिळत असलेल्या पाठबळाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
टीयर-टू आणि टीयर-थ्री शहरांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांतून
आता गडचिरोली ही स्टील सिटी, नागपूर हे संरक्षण हब, अमरावतीत टेक्सटाईल क्लस्टर, छत्रपती संभाजीनगर हे ईव्ही
उत्पादन, ऑरिक सिटी तर रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं स्मार्ट
इंडस्ट्रीयल सिटी निर्माण होत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज नागपूर, उद्या २६
तारखेला नांदेड, तर २७ तारखेला मुंबईत त्यांच्या उपस्थितीत विविध
कार्यक्रम होणार आहेत. खासदार अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं
उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार असून, 'शंखनाद' या जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत.
****
आत्महत्या
केलेल्या शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २०
कोटी रुपये निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय
नुकताच जारी करण्यात आल्याचं, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील
यांनी काल सांगितलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला चार कोटी ९२ लाख रुपये निधी
प्राप्त झाला आहे.
****
आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्रच
लढवल्या जाणार असल्याचं, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते
काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीची घोषणा झाल्यावर महायुतीचे घटक पक्ष
सोबत येउन चर्चा करतील असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्यानुसार,
आपण सर्व जिल्हाधिका-यांची बैठक घेतली असून, संबंधित
सर्वांना मदत मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांचं शिक्षेनंतर मायदेशी
प्रत्यार्पण करण्यात आलं. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या नागरिकांची
सहा महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आलं. भारतात अनधिकृतपणे
प्रवेश केल्याप्रकरणी पारपत्र अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत त्यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व १३ जणांची मायदेशी प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया
नुकतीच पूर्ण करण्यात आल्याचं रत्नागिरी पोलिसांनी सांगितलं.
****
पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित
करण्यात आले आहेत. नागपूर इथं आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट - आय आय एम इथं
“तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार
आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कार्यक्रमाच्या या मुख्य
अतिथी असतील.
****
प्लास्टिकचा
वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं
शहरात विविध ठिकाणी पाच कापडी बॅग वेंडिंग मशीन कार्यान्वित केल्या आहेत. प्लास्टिक
पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणून नागरिकांना सहज आणि स्वस्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध
करून देणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'प्लास्टिकला
नाही, कापडी बॅगला होय' या घोषवाक्याच्या
माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत आहे. या वेंडिंग मशिनमधून केवळ पाच रुपयांत पर्यावरणपूरक,
पुन्हा वापरता येण्याजोगी कापडी बॅग सहज मिळू शकते. हा उपक्रम स्मार्ट
सिटी मिशनअंतर्गत राबवण्यात येत असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं
आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
ऑपरेशन
सिंदूरच्या समर्थनात बीड शहरात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत
काल तिरंगा रॅली काढण्यात आली. सीमारेषेवर मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना
यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणी इथले
वकील मुकुंद आंबेकर यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना, भारतीय सैन्याबद्दल
गौरवोद्गार काढले,
****
अहिल्यानगर
जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातले हुतात्मा सैनिक संदीप गायकर यांच्या पार्थिवावर काल
ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी पहाटे जम्मू-
काश्मीरमधल्या किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण
आलं. या वीर सैनिकाला शेवटची मानवंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
****
पाणी गुणवत्ता
अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातल्या साडे तेराशे गावांमध्ये जलस्त्रोतांची तपासणी मोहिम
राबवण्यात येणार आहे. प्रत्येक गावातल्या पाच महिला आणि जलसुरक्षक हे तपासणी संचाद्वारे
पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत तपासणार आहेत. या मोहिमेसह प्लास्टिक कचरा निर्मूलन
करण्यासाठी श्रमदान करणं या मोहिमांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने
यांच्या हस्ते काल करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात
अंबड तालुक्यातल्या सुखापुरी फाट्यावर काल पहाटे मिनी ट्रॅव्हल्स आणि टेंपोची समोरासमोर
धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तिच्या १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अंजना
सापनार आणि अनुसया सापनार, अशी मृतांची नावं असून, त्या हिंगोली जिल्ह्यातल्या
धानोरा इथल्या रहिवासी आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं,
महामार्ग पोलिसांनी सांगितलं.
****
मराठवाडा
विभागातल्या आठही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते तसंच पाणंद रस्ते मोकळे
करण्यासोबतच प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी विभागात सस्ती अदालत
उपक्रम सुरू आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या
उपक्रमामुळे समूपदेशनातून तब्बल ५६० शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणं सामंजस्याने निकाली
काढण्यात आली. प्रशासन थेट बांधावर पोहोचल्याने शेतरस्ते मोकळे करून देण्यात यश आलं
आहे.
****
जागतिक
पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड रेल्वे विभागात ‘प्लास्टिक प्रदूषण
संपवा’ या विषयावर आधारित १५ दिवसांची जनजागृती मोहिम उत्साहात राबवली जात आहे. याअंतर्गत
प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे
स्थानकांवर काल जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत येत्या पाच जून पर्यंत नांदेड विभागातल्या
रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम होत आहेत.
****
जर्मनीच्या
सुहल इथं कनिष्ठ गट आय.एस.एफ.एफ. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या शांभवी क्षीरसागरनं
मुलिंच्या दहा मिटर एयर राइफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर, याच प्रकारात
ओजस्वी ठाकुर हिनं रौप्य पदक जिंकलं. भारतानं या स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रौप्य, तीन कांस्य पदकांसह एकूण आठ पदकांची कमाई
करत अव्वल स्थान गाठलं आहे.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस काल वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान
विभागानं कळवलं आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर
केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा,
मध्य महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड
ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पहाटेपासून पाऊस सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
दरम्यान, येत्या दोन
दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment