Monday, 26 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब, पंतप्रधानांचं ‘मन की बात’ मधे प्रतिपादन

·      पंतप्रधानांकडून जालना इथल्या कागदी पिशव्या बनवणाऱ्या स्टार्टअप्सचा गौरव, पर्यावरपूरक पिशव्या वापरण्याचं आवाहन

·      राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक

·      केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये-कृषी विभागाचं आवाहन, आजही बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

****

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या कारवाईनं जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं त्यांनी आकाशवाणीवरच्या `मन की बात` कार्यक्रमात सांगितलं.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

देशाच्या नक्षलग्रस्त भागात मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्याचं सांगून, गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी गावात पहिल्यांदाच बस सेवा पोहचल्याचं उदाहरण पंतप्रधानांनी यावेळी दिलं. नक्षलवाद्यांच्या प्रभावाखालच्या दंतेवाडामधल्या विद्यार्थ्यांनी दहावीत मिळवलेल्या यशाचा त्यांनी उल्लेख केला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एका महिन्यापेक्षाही कमी काळ उरला असून, प्रत्येकानं आता योगाभ्यासाशी जोडून घ्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. यंदाच्या योगदिनासाठी आपण विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कागदाच्या कचर्याचं पुनर्वावर करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून विशेषतः टाकाऊ कागदापासून पुनर्निमीतीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणं देताना त्यांनी, जालना इथल्या स्टार्टअपचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, लहान मुलांचं आरोग्य, मधमाशांचं संरक्षण आणि संवर्धन, ड्रोन दीदींची कामगिरी आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भाष्य केलं.

****

भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक दिवसीय परिषद काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या परिषदेत पंतप्रधानांनी विकासाचा वेग वाढवण्यावर आणि लोकांना डबल इंजिन सरकारचा फायदा मिळावा यावर भर दिला. भाजपच्या सुशासन विभागानं आयोजित केलेल्या या बैठकीत सुशासनाच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी भारतीय संरक्षण दल आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करण्यात आलं. तर केंद्र सरकारच्या जातिय जनगणना करण्याच्या निर्णयाबद्दल ही अभिनंदन करण्यात आलं. भाजपाशासित सर्व २० राज्यांचे २० मुख्यमंत्री आणि १८ उपमुख्यमंत्री या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.

****

केंद्र शासनाच्या 'सबका साथ सबका विकास' तसंच सुशासनाच्या प्रतिज्ञेमागे अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाची प्रेरणा असल्याची भावना, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केली. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम.मध्ये `तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर` या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाल, त्यावेळी त्या बोलत होत्या. राणी अहिल्याबाई होळकर यांनी माळव्याचा राजकारभार चालवतांना तीर्थक्षेत्रांचा विकास यासोबतच आपल्या राज्यात लोकजीवन सुसह्य केलं, असं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला आयआयएम नागपूरचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आयोजक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून, काल रात्री त्यांचं नागपूर इथं आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांचं स्वागत केलं. नागपूरच्या जामठा इथं राष्ट्रीय कर्करोग संसथेच्या स्वस्ति निवासची, तर कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाचीही पायाभरणी समारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर ते नांदेडला रवाना होतील. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार असून, 'शंखनाद' या जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. उद्या अमित शहा मुंबईला जाणार असून, दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापनदिन महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत.

****

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणेच सव्वा आठ टक्के दर जाहीर केला आहे. याचा लाभ देशातल्या सात कोटीपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे. २०२२- २३ मध्ये कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवर आठ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज मिळत होतं. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओ ने सुमारे २ कोटी १६ लाख रुपयेपर्यंतचे दावे निकाली काढले. ही आजवरची सर्वाधिक रक्कम आहे.

****

राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय विभागीय कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात कोकण विभागाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या मोहिमेत दुसरा क्रमांक नाशिक विभागाला तर तिसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर विभागाला मिळाला आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमावर याची माहिती दिली.

****

परभणी इथले वकील मुकुंद आंबेकर यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना, भारतीय सैन्याबद्दल गौरवोद्गार काढले,

बाईट – मुकुंद आंबेकर

****

छत्रपती संभाजीनगर - जालना मार्गावर वाढत्या अपघातांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने १० ते १२ ठिकाणी स्पीड सेन्सर बसवले आहेत. शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाहनचालकांना त्यांचा वेग त्वरित समजेल आणि मर्यादा ओलांडल्यास इशारा मिळणार आहे. अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या गेलेल्या या उपक्रमाला वाहन चालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

****

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार आहे, त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. सध्याच्या अंदाजानुसार उद्या २७ मे पासून राज्यातलं हवामान हळू हळू कोरडं होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान कोरडं होणार असल्यामुळे पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पूर्वनियोजन बैठकीत ते काल बोलत होते. यापूर्वी आपत्ती निर्माण झालेल्या गावांची यादी तयार करून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी त्या गावांची तातडीने पाहणी करावी, या पाहणीअंतर्गत गावातल्या पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजनांची स्थिती, तसंच संभाव्य धोके यांचा आढावा घ्यावा, आदी सूचना त्यांनी केल्या.

****

राज्यात काल मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जालना शहराहस जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यात काल अनेक भागात पाऊस पडला, सिन्नर तालुक्यात मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिन्नर बस स्थानकाच्या पुढील बाजूला असलेल्या शेडचा स्लॅब कोसळल्याने शिवशाही आणि एक मोटर दाबली गेली. बस मधल्या प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आलं, तसंच बस स्थानक तातडीने रिकामं करण्यात आलं. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे. या पावसामुळे सिन्नर तालुक्यातल्या बहुतांश धरणांची पातळी वाढली असून, देव नदीला पूर आला आहे.

मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि दक्षिण गुजरातमध्ये आज बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, जालन्यासह विदर्भ आणि धुळ्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment