Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 May 2025
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील
दाहोद दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांचं वडोदरा इथं आगमन झाल्यानंतर नागरिकांनी हाती तिरंगा
ध्वज फडकावत जल्लोषात स्वागत केलं. दाहोद इथं पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे २४,००० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार
आहे. यात रेल्वे प्रकल्प आणि गुजरात सरकारच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान
वेरावल आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आणि वलसाड आणि दाहोद स्थानकांदरम्यान
एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचं नागपूरमध्ये
आगमन झालं. आज सकाळी अमित शहा यांच्या हस्ते जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत
स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक
विद्यापीठाची पायाभरणी करणार आहे. यानंतर अमित शहा नांदेडला रवाना होणार आहेत. नांदेड
इथं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहा यांच्या
हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर ते शंखनाद या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. उद्या, मंगळवारी अमित शहा दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या
वर्धापनदिन महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. मंदिराला दीडशे वर्षं पूर्ण झाल्याबद्दल
याठिकाणी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
****
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका
स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या
शिष्टमंडळानं कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि
इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूरबद्दल
माहिती दिली आणि दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे
शिष्टमंडळ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि
इजिप्तला भेट देणार आहे.
खासदार बैजयंत पांडा यांच्या
नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने बहरीनच्या शूरा कौन्सिलचे अध्यक्ष आणि उपपंतप्रधानांची
भेट घेतली. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दक्षिण कोरियाला
भेट दिली. खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं, न्यूयॉर्क इथं ९/११ स्मारकाला भेट देऊन दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना
त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या
खासदार कनिमोळी यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण
केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे रवाना झाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे
यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण
केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत.
****
अवकाळी पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या
भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पुरात
अडकलेल्या तीन पुरूष, दोन महिला आणि एका बालकाला
सुरक्षा दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात पूर
आल्याने मंदिरात अडकलेल्या तीन साधूंना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीनं बाहेर
काढण्यात येत आहे.
मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण
निर्माण झाले असून शहर आणि उपनगरात काही भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं
अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस झाला. चिपळूण
इथं आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी तब्बल ४८ तासांच्या मदत आणि बचावकार्यानंतर चौघांना
सुखरुप बाहेर काढलं.
****
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार
पाऊससुरू असून प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिले आहे. शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या
परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी
चर्चा केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत
होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले.
या परिस्थितीवर शासनाचे लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात
येत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल.
****
खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची
काल दीवच्या समुद्र किनाऱ्यावर सांगता झाली. या पहिल्याच बीच स्पर्धेत महाराष्ट्राने
पाच सुवर्ण पदकांसह, पाच रौप्य, आणि दहा कास्य अशी एकूण वीस पदकं जिंकत उपविजेतेपद पटकावलं. मणिपूर संघाला विजेतेपद
मिळालं. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उपविजेतेपदाचा करंडक
प्रदान करण्यात आला.
****
आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री सनरायझर्स हैदराबादने
कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात
हैदराबादनं दिलेल्या २७९ धावांचा पठलाग करताना कोलकाता संघ १६८ धावांवर सर्वबाद झाला.
****
No comments:
Post a Comment