Tuesday, 3 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.

राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन दिली जाणार आहे. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.

****

ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून या राज्यांना शक्य ती सगळी मदत देण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सरमा यांनी आज सकाळी कचर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची पाहणी केली आणि मदतछावणीत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांच्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

****

विकसित शेतकरी आणि शेती झाली तर विकसित भारत होईल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. चौहान यांनी आज पुणे दौऱ्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर शेतीतून अधिक चांगलं उत्पादन मिळेलं, असं ते म्हणाले.

****

पंजाब पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानस्थित खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावला याच्याशी संबंध असलेल्या एका गुप्तहेराला अटक केली आहे. आरोपी गगनदीप सिंग याला काल संध्याकाळी तरनतारन इथून अटक करण्यात आली. गगनदीप सिंगने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी समर्थकांना लष्कराच्या हालचालींबद्दल महत्त्वाची माहिती सामायिक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे गेल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे एक हजार चारशे सोळा रुग्ण केरळमध्ये असून, त्याखालोखाल महाराष्ट्रात चारशे चौऱ्याण्णव सक्रिय रुग्ण असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री अनालेना बेयरबॉक यांची निवड झाली आहे. रशियाच्या मागणीवरून या पदासाठी झालेल्या गुप्त मतदानात १९३ पैकी १६७ सदस्यांनी बेयरबॉक यांना मत दिलं. दरम्यान, रशियानं बेयरबॉक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांच्या निवडीला विरोध केला आहे, तर संयुक्त राष्ट्रांचे महासचीव एंटानिओ गुटरस यांनी बेयरबॉक यांच्या निवडीचं स्वागत केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नागरिकांना आपल्या तक्रारी किंवा सूचना नोंदवताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातल्या सगळ्या तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये तक्रार पेटी शेजारी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. क्यूआर कोड आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करा आणि आपली तक्रार किंवा सूचना नोंदवा, अशी ही अभिनव संकल्पना असून, या क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिक आता आपली तक्रार किंवा सूचना डिजिटल पद्धतीनं थेट नोंदवू शकतील. जिल्ह्यात सध्या १६ ठिकाणी अशा तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत. ज्यांना डिजिटल प्रणालीचा वापर शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच तक्रार किंवा सूचना लिहून पेटीत टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

****

सर्वधर्मीय सण आणि जयंतीउत्सव शांततेत साजरे करण्याची लातूर जिल्ह्याची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सण, उत्सव साजरे करताना नियमांचं पालन करावं, असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जनावरांची वाहतूक करताना नियमांचं पालन करावं, महानगरपालिका आणि नगरपालिका यांनी परवानगी दिलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्याशिवाय इतर कुठेही जनावरांची कत्तल करू नये, तसंच गोवंश हत्या बंदीचं काटेकोरपणे पालन केलं जावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

****

इंडोनेशिया बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत भारताचे पी.व्ही.सिंधु आणि लक्ष्य सेन हे खेळाडू एकेरी तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची जोडी पुरुष दुहेरी प्रकारात आजपासून आपापले सामने खेळणार आहेत. मलेशिया मास्टर्स स्पर्धेतला उपविजेता भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांत या स्पर्धेत सहभागी झालेला नाही.

****

No comments:

Post a Comment