Tuesday, 3 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 June 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जून २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      पिकं आणि कीडरोग मुक्त रोपं निर्मिती करून उत्पन्न आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी देशभरात क्लीन प्लांट कार्यक्रम राबवण्यात येणार-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

·      महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

·      इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा 

आणि

·      जालना जिल्ह्यात शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

****

पिकं आणि कीडरोग मुक्त रोपं निर्मिती करून उत्पन्न आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी तसंच नागरिकांना रोगमुक्त आणि स्वच्छ अन्न मिळावं, यासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम म्हणजे क्लीन प्लांट प्रोग्राम संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात कृषी हॅकेथॉन या उपक्रमाचा समारोप आज केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. स्वच्छ वनस्पती कार्यक्रमांतर्गत देशात नऊ प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, त्यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या नऊ प्रयोगशाळांपैकी तीन महाराष्ट्रात असतील, असं त्यांनी सांगितलं. द्राक्षासाठी पुणे इथं, संत्र्यासाठी नागपूर इथं आणि डाळिंबासाठी सोलापूर इथं या प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले

बाईट – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. शेतीत उत्पादकता वाढवण्यासाठी तत्रज्ञानांचा वापर करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतीचं क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तीत होत असल्याचं ते म्हणाले.

कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, यातूनच सर्वसमावेशक आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं कृषी धोरण राबवण्याचा विचार कृषी विभाग करत असल्याचं, अजित पवार यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, नारायणगांव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन चौहान यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषिक्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगताचा त्यांनी, बनावट बियाणं आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

****

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषंगिक खर्चालाही यावेळी मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.

राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे करोडी इथली सहा हेक्टर गायरान जमीन देण्याचा निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पुण्यातल्या बिबवेवाडी, अहिल्यानगर, सांगली, अमरावती, चंद्रपूरमधल्या बल्लारपूर, नाशिक मधल्या सिन्नर, बारामती, सातारा आणि पनवेल इथल्या रुग्णालयांना जमीन देण्यालाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला. या पावसामुळे कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानासाठीही शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

****

राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईत एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. हा निर्णय या महिन्यापासून लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. 

****

राज्य सरकारनं कोविड प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. इन्फ्लुएन्झासदृश ताप आणि गंभीर श्वसन आजारानं संक्रमित असलेल्या रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं नगर परिषद, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनांतर्गत असलेल्या सर्व आरोग्य सेवा केंद्रांना दिल्या आहेत. हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेचं आरोग्य, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन, याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

****

राज्यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज केली. शाळेतले क्रीडा शिक्षक, एनसीसीचे सदस्य, स्काऊट्स आणि गाईड्स यांच्यासोबतच निवृत्त सैनिकही या प्रशिक्षणात महत्वाची भूमिका बजावतील, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांमधलं देशप्रेम वाढीस लागावं, याकरता, तसंच त्यांना व्यायामाची कायमची सवय आणि शिस्त लागावी, या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं भुसे यांनी सांगितलं. या निर्णयाची अंमलबजावणी करणं शक्य व्हावं, यासाठी सरकार सुमारे अडीच लाख निवृत्त सैनिकांना या उपक्रमात सामावून घेणार आहे.

****

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं त्याला दिलेलं उत्तर, यावर संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीतल्या सदस्य पक्षांनी केली आहे. या युतीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. सोळा राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहिलं असल्याची माहिती, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

****

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड यानं न्यायालयात केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर येत्या सतरा तारखेला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी, देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्‍चिती बाबत पुरेसे पुरावे असून, आरोप निश्‍चिती करून घ्यावी, असा अर्ज सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. या दोन्ही बाबतीत सतरा तारखेला युक्तिवाद होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार मतदारसंघातल्या विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्यासोबत आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासह अन्य कामांबाबत यावेळी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातल्या वरुड बुद्रुक इथं एका कुटुंबातल्या सात ते चौदा वर्षं वयोगटातल्या तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यश अनिल जोशी, दिपाली रमण जोशी आणि रोहन रमण जोशी अशी या मृत भावंडांची नावं आहेत. हे तिघं काल सकाळी या परिसरातल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी म्हणून गेले होते, ते न परतल्यामुळे शोध घेतला असता आज सकाळी शेततळ्यात तिघांचे मृतदेह मिळाले. या प्रकरणी जाफ्राबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****

माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार प्रितम मुंडे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांनी गोपिनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.

****

जागतिक सायकल दिन आज साजरा केला जात आहे. अहिल्यानगर इथं शेवगाव सायकल क्लबतर्फे सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. काळेगाव ते सुसरे अशा चौतीस किलोमीटरच्या या सायकल राईडमध्ये शेवगाव आणि पाथर्डी मधल्या सायकल स्वरांनी सहभाग नोंदवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आजतागायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही.

****

No comments:

Post a Comment