Tuesday, 3 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारत जागतिक विमानवाहतुकीत उदयोन्मुख देश, उडान योजनेचं यश हा देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील सुवर्ण अध्याय - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक - केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

·      नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरच्या ७६ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं पाच जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

·      दहशतवादविरोधी पथकाची ठाणे जिल्ह्यात छापेमारी, १२ संशयितांना अटक

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात विजेतेपदासाठी लढत

****

आजचा भारत हा आत्मविश्वासू, धोरणात्मक नेतृत्व, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकासाचं प्रतीक असून, भारत आता जागतिक विमानवाहतुकीत उदयोन्मुख देश बनत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आय ए टी ए अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या ८१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार आहे. उडान योजनेचे यश हा भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील एक सुवर्ण अध्याय असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जगातल्या आघाडीच्या विमान कंपन्यांसाठी, भारत गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी सादर करतो, असंही त्यांनी सांगितलं.

****

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. ते काल बिहारमधल्या मोतिहारी इथं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून देशभरात १६ हजार शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत असल्याचं, त्यांनी सांगितलं. उत्पादनात वाढ करणं, उत्पादन खर्च कमी करणं, आणि शेतमालासाठी दर निश्चित करणं यावर ते काम करत असल्याचं ते म्हणाले. सरकार डाळी, तेलबिया यांच्या लागवडीला प्रोत्साहन देत असून शेती अधिक फायदेशीर करणं हा सरकारचा उद्देश आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी शक्ती असल्याचंही चौहान यांनी नमूद केलं.

****

देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्रं तयार केली आहेत. केंद्र सरकारनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. या ओळखपत्रांद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, पशुधन, पिकांची माहिती आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नाची नोंद केली जाणार आहे. या ओळखपत्रांचा उपयोग पीकविमा तसंच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी होणार आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक एक कोटी ३० लाख, तर महाराष्ट्रात ९९ लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्रं तयार केली आहेत.

****

नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचं प्रमाण वाढत असून, अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गेल्या काही वर्षात चांगल्या उपचार पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचं जीवनमान वाढलं आहे, साईबाबा हॉस्पिटलच्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरच्या इगरतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण येत्या पाच तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे हा ७६ कीलोमीटर लांबीचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरुन आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

****

राज्यातल्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून, काल ६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात पुण्यात सर्वाधिक २५ रुग्ण असून, मुंबईत २२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या वर्षात आतापर्यंत एकंदर ८१४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील ३०० रुग्ण बारे झाले असून ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने श्वसनविकाराच्या रुग्णांचं सर्वेक्षण करून त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत; पण नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

****

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १५ तारखेला होणार असलेली नीट परीक्षा पुढं ढकलली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं. अधिक परीक्षा केंद्रं आणि पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढे ढकलली असून, नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया - आय सी ए आय नं सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या सनदी लेखापाल - सीए परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा तीन ते २२ सप्टेंबरदरम्यान होणार असल्याचं ICAI ने सांगितलं आहे.

****

राज्य शिक्षण मंडळानं इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत पाच जून पर्यंत वाढवली आहे. ही मुदत आज संपणार होती. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातली जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजी आदेश दिल्यानं ही मुदत वाढवण्यात आली आहे. या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित असतील.

****

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून १२ संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकानं साकिब नाचण, अकिब साकिब नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, शाजील नाचण, फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली. झडती दरम्यान ६ जण त्यांच्या घरात आढळले नाहीत. ए टी एस नं पुढील तपासासाठी १२ जणांना अटक केली.

****

माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शासकीय दुध डेअरी प्रांगणात अभिवादन कार्यक्रम होणार आहे.

****

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी काल विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. टाळ - मृदंग घेऊन अश्व आणि गजासह ७०० जण पायदळवारीमध्ये सहभागी झाले आहेत. पालखीचं हे ५६ वं वर्ष आहे. संत गजानन महाराजांची पालखी ७२५ किलोमीटरचा पायी प्रवास करून 33 दिवसानंतर चार जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औट्रम घाटातली वाहतूक सुलभ करण्यासाठी करावयाचा भुयारी मार्ग, शहरात घरगुती गॅस साठी पाईप लाईन आणि गॅस वितरण, छावणी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अशा विविध विषयांचा आढावा खासदार डॉ. भागवत कराड यांनी काल घेतला. औट्रम घाटातल्या भुयारी मार्गासाठी रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांनी स्वतंत्रपणे प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी सूचना कराड यांनी केली. शहरातल्या दहा झोन पैकी पहिल्या टप्प्यात चार झोन मध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात किमान १० हजार घरांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं नियोजन असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ५३ अनिवासी भूखंडांची ई-लिलाव नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. येत्या सात जुलै रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ई-लिलाव म्हाडच्या अधिकृत संकेतस्थळावर होईल, तर आठ जुलै रोजी निकाल जाहीर होतील.

****

लातूर इथं बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल शांतता समितीची बैठक घेतली. जयंती उत्सव शांततेत साजरे करण्याची जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. ही परंपरा जतन करण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केलं.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

येत्या दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****


No comments:

Post a Comment