Wednesday, 4 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे.

****

राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये कोविड आजाराची सौम्य लक्षणं आढळून येत आहेत; आरोग्य विभागानं कोविड तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं कोविड प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. इन्फ्लुएन्झासदृश ताप आणि गंभीर श्वसन आजारानं संक्रमित असलेल्या रुग्णांपैकी, पाच टक्के रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं सर्व आरोग्य सेवा केंद्रांना दिल्या आहेत.

****

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरास इथल्या शेतकऱ्यांची केदार सीड्स या बियाणे कंपनीने फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे. १०० दिवसात निघणारं धानाचं केदार सीड्स कंपनीचं के एस गोल्ड बियाणं पेरणीनंतर १२५ दिवस होऊनही धान निघालं नाही. शेतकऱ्यांनी कंपनीला याची माहिती दिल्यानंतरही कंपनीनं शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला देण्यास नकार दिला. त्यामुळे  शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागात केली असून कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा अहवाल दिला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने आता पुढील कारवाई करण्यात येत आहे.

****

बीड इथं परवा सहा तारखेला “आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचं” आयोजन करण्यात आलं आहे. प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याबाबतचं प्रशिक्षण एनडीआरएफच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आहे. बारा दिवसांचं हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपत्ती व्यवस्थापन किट आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या प्रशिक्षणात नागरिक, विद्यार्थी तसंच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन बीड जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या औचित्यानं बीड जिल्ह्यातल्या आष्टी शहरात, उद्या ५ तारखेला तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. आष्टी शहरातल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून ही रॅली निघणार असून या रॕलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे.या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन आमदार भीमराव धोंडे यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त लातूर इथल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी मार्फत लातूर मधल्या कोयना विद्युत उपकेंद्रात काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात  रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबीरात ६७ जणांनी रक्तदान केलं.

****

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पिट आणि सीक लाईनचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. रेल्वे स्थानकावर पिट लाईन कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वेच्या कोच देखभाल दुरुस्तीची मोठी सुविधा इथं उपलब्ध होणार आहे. तर सीक लाईन ही कोचमधला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी वापरली जाणार आहे.

****

उद्या साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वृक्षाच्छादन वाढवून गावं हरीत करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. प्रत्येक गावात १०० तर नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत २०० वृक्ष लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. ‘सुजाण नागरिक समृद्ध निसर्ग’, हे अभियान १५ जून पर्यंत राबवण्यात येणार असून, उद्या गावागावात वृक्ष दिंडी काढून त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

****

मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि पूर्व भूतानमध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलन, रस्ते अडथळे निर्माण होऊन बहुतांश भागाचा संपर्क तुटला होता. सीमा रस्ते संघटना, बीआरओनं यात तातडीनं मदत आणि बचावकार्य हाती घेतलं. बीआरओच्या पथकांनी मिझोराममधील कचरा साफ केला, सिक्कीममध्ये जनजीवन पूर्वपदावर आणण्यास मदत केली. तसंच अरुणाचलच्या कुरुंग इथं ३० मे नंतर झालेल्या भूस्खलनानंतर बंद झालेला दरंगा-त्राशिगांग महामार्ग पुन्हा सुरु करण्यास पुढाकार घेतला.

****

राज्यात येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 

****

 

No comments:

Post a Comment