Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 June 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी पार्क इथं वृक्षारोपण
केलं. एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत मोदी यांनी अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा एक भाग
म्हणून हे रोप लावले. आजचे वृक्षारोपण अरवली पर्वतरांगांच्या ७०० किलोमीटरच्या भागात
वनीकरण करण्याचे उद्दिष्ट असलेल्या अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा भाग आहे. या प्रसंगी
पंतप्रधान मोदींनी दिल्ली सरकारच्या शाश्वत वाहतूक उपक्रमांतर्गत २०० इलेक्ट्रिक बसना
हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय
निवासस्थानी आज सिंदूरचं रोपटं लावलं. १९७१ च्या युद्धात साहस आणि पराक्रमाचं अद्भुत
उदाहरण देशासमोर ठेवलेल्या कच्छ इथला वीरांगना माता भगिनींनी नुकतीच पंतप्रधानांची
भेट घेऊन सिंदूरचं हे रोप त्यांना भेट म्हणून दिलं होतं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवीर आज बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भामला
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वातावरण बदलाच्या जनजागृतीसाठी जागतिक प्रचार मोहिमेचा
शुभारंभ करण्यात आला. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू ‘सिंगल यूज प्लास्टिक’ आहे, याचा वापर थांबवणं म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठीचा
सकारात्मक निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या 10 कोटी वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2030 पर्यंतच्या ‘नेट झिरो’ संकल्पनेच्या
दिशेने महाराष्ट्र ठोस पावलं उचलत असून, 2026 पर्यंत कृषी क्षेत्रासाठी
लागणारी 16 हजार मेगावॉट ऊर्जा सौर ऊर्जेच्या माध्यमातून देण्याचे
उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरी ते आमणे 76 किमीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळं
आता संपूर्ण 701 किमी
लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
****
गंगा दशहराच्या अभिजीत मुहुर्तावर, प्रभु श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत
आज रामदरबारासह ८ मंदिरांमध्ये राजाराम आणि अन्य देद्वी देवतांच्या मूर्तींची प्राण
प्रतिष्ठा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आली. अयोध्येच्या
प्रमुख मंदिरात असलेल्या रामदरबारच्या गर्भगृहात आज श्रीरामराजा, माता जानकी, लक्ष्मण, भरत,
शत्रुघ्न आणि हनुमानांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई
विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या ६ तारखेला मुंबई विद्यापीठात ‘विकास २०२५’
या अखिल भारतीय विभागवार एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षण आणि उद्योग
क्षेत्रांमध्ये अधिक सशक्त समन्वय साधणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी
अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंत्री, शिक्षण तज्ज्ञ या परिषदेला मार्गदर्शन
करणार आहेत. या पश्चिम विभागीय ‘विकास २०२५’ परिषदेत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात इथून सुमारे ५०० मान्यवर सहभागी होणार आहेत.
****
देशभरात कोविड ग्रस्त रुग्णांची
संख्या वाढत असून ही रुग्णसंख्या चार हजार आठशे ६६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ५६४ कोविड रुग्ण आढळले तर
७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या ३, तर दिल्ली आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी
२ रुग्णांचा समावेश आहे.
****
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं
राज्यभरात राबवण्यात येणारं आदिशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी १५ दिवसांत ग्रामस्तरीय
समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले
आहेत. आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कारासंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत त्या बोलत
होत्या. या अभियानाअंतर्गत महिलांच्या समस्या निवारणसाठी गाव, तालुका, आणि राज्यस्तरावर
विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजारमधल्या
मातृस्मृती वनमंदिरात आज एकूण १ हजार ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment