Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग तिसऱ्यांदा
व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज ही माहिती
दिली. गेले दोन दिवस आरबीआय पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने कमी करून 5 पूर्णांक 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी फेब्रुवारी
आणि एप्रिलमध्ये रेपो दरात 25 बेसिस पॉइंटची कपात
करण्यात आली होती. आजच्या कपातीमुळे रेपो दर आता 5 पूर्णांक 5 टक्के झाला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीर
दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक हा २७२ किलोमीटर लांबीचा
महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे ४४ हजार कोटी रुपये खर्चाचा
हा प्रकल्प काश्मीर खोऱ्याला सर्व हंगामात देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा महत्त्वाचा
दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गतच्याच चिनाब या जगातल्या सर्वात उंच कमानी रेल्वे
पूलाचं तसंच तारांच्या सहाय्याने स्थिर केलेल्या अर्थात केबल स्टेड अंजी, या भारतातल्या पहिला
रेल्वे पूलाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच कटरा इथं ४६ हजार
कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पणही पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे.
****
तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या ३८ दिवसांच्या
अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलातर्फे ऑपरेशन
शिवा सुरू करण्यात आलं आहे. या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र दलांच्या सहकार्यानं पहलगाम
आणि बालटाल यात्रा मार्गावर ४२ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार असून, ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि बुलेटप्रूफ वाहनांसह अद्ययावत सुरक्षा यंत्रणेचा वापर
केला जाईल. यावेळी यात्रेकरूंना उत्कृष्ट
वैद्यकीय, वाहतूक आणि निवासी सुविधा पुरवल्या
जाणार आहे.
****
माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी
आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश
केला. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
झालेल्या सोहळ्यात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे
उपस्थित होत्या. विरोधकांनी कितीही टीका केली तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे
यांनी यावेळी केला.
****
महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त
‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’
या संकल्पनेद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी महावितरण तर्फे काल विद्युत
सुरक्षेबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यात
१ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे.
****
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज
रायगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात अखिल भारतीय
शिव महोत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि इतर
शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं लाल महाल इथं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात
आलं आहे. यानिमित्त राज्यातल्या विविध गड किल्ल्यांवर विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम
उत्कर्ष अभियाना’च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील मांडवा
आणि घोगरवाडी इथं काल विशेष शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पात्र लाभार्थ्यांना आधारकार्ड, आरोग्य तपासणी, आयुष्यमन कार्ड वाटप, कृषी विभागामार्फत महाबीज बियाण्याचे
वाटप करण्यात आलं. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला आणि तहसीलदार डॉ. शारदा चौडेकर
उपस्थित होते. या योजनेत जिल्ह्यातल्या १३२ गावांचा समावेश आहे.
****
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशनं नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत आपला चौथा
विजय मिळवला. गुकेशनं क्लासिकल स्पर्धा प्रकाराच्या नवव्या फेरीत चीनच्या खेळाडूचा
पराभव केला. या विजयासह गुकेश आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात केवळ आता अर्ध्या गुणाचे
अंतर आहे. स्पर्धेत आता शेवटची फेरी बाकी आहे.
****
बेंगळूरू इथल्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर
झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूचे
पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
तसंच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ, आयोजक डीएनए एंटरटेनमेंट
कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींना अटक करण्याचे आदेश राज्य
सरकारनं दिले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मायकल
डी. कुन्हा यांच्याकडून न्यायालयीन चौकशी करून तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
देण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment