Saturday, 7 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधानांच्या हस्ते चिनाब नदीवरील जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या रेल्वे पुलाचं लोकार्पण

·      रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात

·      गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

·      छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

·      आज ईद उल - अजहा अर्थात बकरी ईद; बकरी ईदचा सण त्याग, आस्था आणि मानवी मुल्यांचं प्रतिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

आणि

·      ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन, व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला-मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

****

जम्मू काश्मीरमध्ये सुरू होणारा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प हा भारताच्या नव्या सामर्थ्याचा जयघोष आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल जम्मू आणि कश्मीरमध्ये ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी त्यांनी उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पण केलं. तसंच या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आणि जगातला सर्वात उंच कमानीवरचा रेल्वे पूल असलेल्या चिनाब आणि देशातला सर्वात उंच केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी-श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली असून, आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. मुंबईत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. समितीनं फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली असून, या कालावधीत रेपो दर एकूण एक टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के पर्यंत आटोक्यात राहील असा सुधारित अंदाज पत धोरण समितीनं आढाव्यात व्यक्त केला आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल गडचिरोली पोलिस मुख्यालयात १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांचे बक्षीस होतं. यावेळी आत्मसमर्पण केलेल्या १३ नक्षलवाद्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. नक्षलवादाच्या विरोधात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला असून, नक्षलवादाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपून जाईल, असं सांगतानाच त्यांनी नक्षलग्रस्त भागाच्या विकासावर सरकार लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन घडून आणलं आहे. कृषी क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात येत आहे. पीएम किसान ते पीक विमा योजना, सिंचन योजनांपासून कृषी पायाभूत निधीमध्ये भरघोस वाढ करण्यासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या मालाची थेट विक्री करण्याची सुविधा निर्माण करुन दिली आहे. सरकार केवळ शेतकऱ्यांसाठी योजना राबवत नाही तर देशातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करत आहे.

****

ईद उल - अजहा अर्थात बकरी ईद आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण म्हणजे त्याग, आस्था आणि मानवी मुल्यांचं प्रतिक असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी आणि बंधुभाव घेऊन येवो, असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा काल किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जयजयकारानं यावेळी किल्ले रायगड दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी सादर केलेल्या लोककला आणि पोवाड्यांमुळे रायगडावरचं वातावरण शिवमय झालं होतं. छत्रपती संभाजी राजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांना यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली.

**

राज्यात इतरत्रही यानिमित्त विविध कार्यक्रम झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. शहरात जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

वेरूळ इथल्या मालोजीराजे भोसले गढीवर शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

**

परभणी जिल्हा परिषदेत शिवराज्यभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. 

नांदेड जिल्हा परिषदेत शिवराज्यभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे सहभागी झाले होते. शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी असल्याचं ते म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित कृषि संकल्प अभियानाला शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे. कृषी शास्त्रज्ञ, कृषि विभागातले अधिकारी, कर्मचारी शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहेत. या अभियानात शास्त्रज्ञांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन, पशुधन व्यवस्थापन, शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर, अशा विविध विषयावर सविस्तर माहिती दिली.

****

येत्या २१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला १४ दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया, योग शिक्षिका अंजली आयाचीत यांनी दिलेली, मंडुकासनाविषयी माहिती.

बाईट – अंजली आयाचीत

****

ज्येष्ठ विचारवंत नरहरी विष्णूशास्री ऊर्फ दाजी पणशीकर यांचं काल संध्याकाळी ठाणे इथं राहत्या घरी निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. रामायण-महाभारताचे व्यासंगी तसंच संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजी पणशीकरांनी ५० वर्षाहून अधिक काळ आपली व्याख्यानं आणि साहित्यातून समाजप्रबोधन केलं. अनेक वृत्तपत्रातील लेखमालांबरोबरच त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा आहे. आज सकाळी ठाणे इथं दाजी पणशीकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाजी पणशीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment