Saturday, 7 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

आज जागतिक अन्न सुरक्षा दिन... दरवर्षी ७ जून रोजी हा दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त  मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, इथं मुख्य कार्यक्रम  आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अन्न सुरक्षा : कृती विज्ञान -फूड सेफ्टी सायन्स इन अॅक्शन या संकल्पनेवर आधारित विविध सत्र, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात १८९ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रं दिली जाणार आहेत.

दरम्यान पंढरपूर आषाढी वारीच्या अनुषंगानं वारी मार्गावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं विशेष सेवा देण्यात येणार आहे. वारी मार्गावर औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी आरोग्य विभाग आणि औषध पुरवठादार यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यात येत असून वारी मार्गावर असणाऱ्या अन्न छत्रांमध्ये स्वच्छ तसंच निर्भेळ अन्न मिळेल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच आषाढी वारी मार्गावर अन्न सुरक्षा वाहन ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

****

इयत्ता अकरावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही,  आपला प्रवेश अर्ज भाग- एक भरलेला नाही किंवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आज सात जून रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अर्जाचा भाग -दोन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग -एक आणि भाग-दोन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचं काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी असं आवाहन शालेय शिक्षण विभागाने केलं आहे.

****

१५ जूनला होणारी नीट पीजी प्रवेश परीक्षा आता तीन ऑगस्ट रोजी एकाच सत्रात होणार आहे, यासंदर्भात सात उमेदवारांनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत राष्ट्रीय परीक्षा मंडळाला नीट पीजी प्रवेश परीक्षा घेण्यास वेळ वाढवून देत परवानगी दिली आहे.

****

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या न्यायालयीन कोठडीत नऊ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून राणा याला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी काल हे आदेश दिले. राणा याची न्यायालयीन कोठडीची मुदत काल संपली होती.

****

बंगळुरू इथं चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ गेल्या तीन तारखेला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या विपणन विभागाचा प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह आणखी दोघांना काल अटक केली. त्यात डीएनए एंटरनेटमेंटचा सुनिल मॅथ्यू आणि किरण कुमारचा समावेश आहे. याप्रकरणी राज्यशासनानं बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे तसंच कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांचा समावेश असलेला चौकशी आयोग नेमला असून तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरुने मिळवलेला आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरु इथल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती, यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक आणि बस आगार परिसराच्या जागांचा विकास करून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. बसस्थानकांच्या विकास कामांमध्ये सुधारणा करून तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी यावेळी दिले.

****

ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, जिल्हा परिषद बीड तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने परळी आणि अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीनं परळी वैद्यनाथ इथं काल 'दिवाळी नवीन घरकुलात' या अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यावेळी उपस्थित होते. विविध योजनेतल्या पात्र घरकुल लाभार्थींना यंदाची दिवाळी आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरकुलात दिवा लावून साजरी करता यावी, या अनुषंगाने मिशन मोडवर घरकुलांचं काम पूर्ण करावेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

****

No comments:

Post a Comment