Sunday, 8 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 June 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ जून २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      विकसित भारताच्या वाटचालीत महिलांची परिवर्तनकारी भूमिका, पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांत डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

·      काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकांसंदर्भात आयोगाकडं तक्रार करावी, रितसर उत्तर देऊ-निवडणूक आयोगाचं निवेदन

·      विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

आणि

·      मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवसांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

****

विकसित भारताच्या प्रवासात महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सरकारला ११ वर्षे पूर्ण झाले, त्यानिमित्त लिहिलेल्या सामाजिक संदेशात पंतप्रधान म्हणाले की, आपल्या माता-भगिनी आणि कन्या यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. आज, त्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात सक्रियपणे सहभागी आहेत तसंच शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवीन मानदंडही प्रस्थापित करत आहेत. गेल्या ११ वर्षांत, आपल्या नारी शक्तीच्या कामगिरीनं संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे, असं मोदी म्हणाले.

****

गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या ११ वर्षातील प्रमुख क्षेत्रांत झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण मध्यमवर्गाचं सक्षमीकरण करणाऱ्या आर्थिक सुधारणांविषयी जाणून घेऊया

मध्यमवर्गाचे दैनंदिन आयुष्य सुलभ करणे हे गेल्या दहा वर्षांत सरकारी कारभाराच्या केंद्रस्थानी आहे. गृहनिर्माण ते आरोग्य आणि नागरी वाहतूक ते डिजीटलीकरण या माध्यमातून सरकारनं मध्यमवर्गीयांचं जीवनमान सुलभ, अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर केलं आहे.

प्रधानमंत्री नागरी आवास योजनेच्या माध्यमातून १ कोटी १६ लाखांहून अधिक घरं मंजूर केली आहेत, त्यापैकी ९३ लाखांहून अधिक घरं पूर्ण झाली आहेत किंवा लाभार्थ्यांना हस्तांतरीत केली आहेत. स्मार्ट सिटी मोहिमेच्या माध्यमातून ७ हजार ५४५ प्रकल्पांपैकी ९३ टक्के प्रकल्पांचं काम पूर्ण झालं आहे. गेल्या दशकात मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात चौपट वाढ झाली आहे. तर, उडाण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हवाई प्रवास सुलभ झाला आहे.

नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी ४१ कोटी आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जगातली सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य योजना ठरली आहे. जन औषधी केंद्रांमुळं नागरिकांना अत्यावश्यक औषधं ८० टक्क्यांहून स्वस्त किंमतीत मिळत आहेत.

नागरिकांच्या सुलभतेसाठी डिजीलॉकर, उमंग हे डिजीटल प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. कल्याणकारी योजनांची निश्चिती आणि गळती रोखण्यासाठी १४१ कोटी नागरिकांना आधार कार्ड पुरवण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुणे इथं महाऊर्जा कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. शेतीसाठी सौर पंपांचा वापर करणारं महाराष्ट्र अग्रणी राज्य असून लवकरच सरकार हरित शासकीय कार्यालयांचं उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या बूथ पातळीवरील एजंट आणि पोलिंग एजंट यांच्यावर टीका केली असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनूसार निवडणुकीसंदर्भातील कोणत्याही याचिकेसंदर्भात संबंधित मतदान केंद्रावरील सीसीटीवी फुटेजची तपासणी करता येऊ शकते. मात्र, आयोगानं राहुल गांधी यांच्या भूमिकेवर सीसीटीवी फुटेजविषयी सवाल उपस्थित केला आहे. आयोगानं स्पष्ट केले की, राहुल गांधी यांनी आयोगाला पत्र लिहिलं नाही किंवा भेटीची वेळही घेतली नाही. राहुल गांधी यांनी आयोगाला रितसर पत्र लिहिल्यास विहित प्रक्रियेचं पालन करुन त्यांच्या आरोपांना औपचारिकपणे उत्तर देण्यात येईल, असं आयोगानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी खरीप हंगामातल्या पिकांची बी-बियाणे प्रात्यक्षिकं, तसंच पिकांवर पडणाऱ्या रोगकिडींचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती या विषयांवर कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी याविषयी अधिक माहिती दिली.

बाईट – डॉ.सचिन सुर्यवंशी

धाराशिव जिल्ह्यात आठ तालुक्यात मिळून ५० गावांत हे अभियान राबवण्यात येत असून त्यामाध्यमातून कृषी विज्ञान केंद्राची दोन पथकं दररोज सहा गावांना भेट देत आहेत. या उपक्रमाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत. अरुण इंगळे या लाभार्थी शेतकऱ्याने याविषयी प्रतिक्रिया दिली

बाईट – अरूण इंगळे

****

मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटात बाव नदीजवळ मिनीबस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांचा अपघात झाला. यात मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. ही मिनी बस शिक्षकांना घेऊन प्रशिक्षणासाठी रत्नागिरीकडं जात होती. बसमधले ३१ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये १५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश असून, दोन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असल्यामुळं मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये. पाली आणि संगमेश्वर इथून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन रत्नागिरी पोलीसांनी केलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या संकल्प ते सिद्धी अभियानांतर्गत आज जालना इथं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत आमदार बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी संकल्प ते सिद्धी उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित करत आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाची दिशा स्पष्ट केली. या कार्यशाळेमध्ये विकसित भारत - अमृत काळातील सेवा, सुशासन व गरीब कल्याण या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं.

****

येत्या २१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला १४ दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया, योग शिक्षक वैजिनाथ गमे यांनी दिलेली, धनुरासनाविषयीची माहिती.

बाईट – वैजीनाथ गमे, योगशिक्षक

****

हवामान

राज्यात अनेक भागात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा, तर कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज तर धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

****

No comments:

Post a Comment