Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 June 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०८ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या
११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
गेल्या ११ वर्षांत, विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची
समृद्धी वाढली असून, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. तसंच
मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे
चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांच्या
कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरु राहतील असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.
****
पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादाविरोधी भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं
जगातल्या विविध देशांना भेट देत आहेत. भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या
नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल बर्लिन इथं जर्मन सरकारच्या प्रतिनिधींची भेट
घेतली. यावेळी त्यांनी भारताचं दहशतवादाविरोधातलं शून्य सहिष्णुता धोरण आणि
सीमापार दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती स्पष्ट केली. जर्मन सरकारच्या
प्रतिनिधींनी दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येण्याची तातडीची गरज
असल्याचं मत व्यक्त करत भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
****
छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं काल सुरक्षा दलांच्या कारवाईत
पाच नक्षलवादी मारले गेले. यात दोन महिलांचा समावेश आहे. मृत नक्षलींची ओळख अद्याप
पटली नसून त्यांच्याकडून स्वयंचलीत शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, यासारख्या नक्षलविरोधी कारवायांना मिळत असलेल्या यशाचं केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी कौतुक केलं. नक्षलवादी कारवायांमध्ये जवानांचं शौर्य मोलाची भूमिका
बजावत असतं असं शहा म्हणाले. प्रादेशिक विकासात सहभागी होत असलेल्या शरणार्थींना
केंद्र तसंच राज्य दोन्ही सरकारांकडून संपूर्ण संरक्षण मिळेल असं आश्वासन शाह
यांनी दिलं आहे.
****
शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती
अवलंबून आहे,
असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी
केलं. विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत मध्यप्रदेशातल्या सेहोर इथं आयोजित
कार्यक्रमात ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार
शेतीत सुधारणा करावी असं चौहान म्हणाले. या कार्यक्रमात ५१ कोटी रूपयांच्या
विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं पायाभूत सुविधांची निर्मिती
करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत
असल्याचं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. अहमदपूर नगरपालिकेच्या
अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण काल पाटील यांच्या
हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरपालिकेला राज्य आपत्ती प्रतिसाद
निधीअंतर्गत मिनी रेस्क्यू टेंडर वाहन सुपूर्द करण्यात आलं.
****
बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातली गुंडगिरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी
धाडसी कारवाया सुरू केल्या आहेत. एमपीडीए कायद्याअंतर्गत हातभट्टीच्या दारुचा
चोरटा व्यापार करणाऱ्याला, तात्काळ ताब्यात घेवून
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात त्याची रवानगी केली आहे, तसंच चोरीच्या घटनेतील सराईत गुन्हेगार भगवान भोसले यास, गेवराई परिसरात पोलिसांच्या पथकाने काल अटक केली.
****
काल दिवसभरात विविध ठिकाणी बारा जणांचा पाण्यात बुडून
मृत्यू झाल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यात गोदावरी नदीपात्रात
कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह पुतणीचा बुडून मृत्यू झाला तर अकोला जिल्ह्यात
तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्ह्यातल्या तेलंगणा सीमेवरील गोदावरी
नदीपात्रात काल संध्याकाळी आंघोळीसाठी गेलेल्या सहा मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची
घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सर्वजण बुडाली असल्याचं पोलिसांनी
सांगितलं. ही मुले तेलंगणा राज्यातील असून रात्री उशिरापर्यंत एकाचाही शोध लागला
नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी
मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असल्याचं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल नागपूर इथं आरबीएलच्या
उम्मीद उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल आणि शालेय साहित्याचे वितरण
फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. तसेच धन्वंतरी आरोग्य
शिबिराचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं.
****
राज्यात कोरोनासह इन्फ्लूएंझा म्हणजे एच 1 एन 1,
एच 3 एन 2 आणि श्वसनविकारजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्यानं आरोग्य विभाग सतर्क
झाला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन उपप्रकारातील ‘जेएन 1’ यासह ‘एक्स एफ जी’ आणि ‘एल एफ 7.9’ हे
कोरोनाचे उपप्रकार अधिक संसर्गजन्य असल्याचं निदर्शनास आलं आहे. यामुळे ताप, खोकला,
घसा खवखवणं यासारखे सौम्य आजार होत असून, ते स्वतःहून कमी होतात, अशी माहिती आरोग्य
विभागाद्वारे देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment