Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
छत्रपती शिवाजी महाराज भारत
गौरव पर्यटन रेल्वे ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
·
राज्यातल्या सर्व वीज
ग्राहकांना टप्प्याटप्यानं सौर ऊर्जेवर आणणार-मुख्यमंत्र्याची माहिती
·
महाराष्ट्र विधानसभा
निवडणुकीसंदर्भात माहितीसाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाशी थेट संपर्क
साधावा-आयोगाचं आवाहन
·
99 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात, महाराष्ट्र
साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आयोजनचा मान
आणि
·
मराठवाड्यासह राज्यात अनेक
भागात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि
समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”
आजपासून सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस इथं हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केलं. IRCTC, रेल्वे मंत्रालय,
आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही रेल्वे चालवली
जाणार आहे. पाच दिवसांच्या या प्रवासात रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लाल
महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांना ही रेल्वे भेट देणार आहे. ७२० प्रवासी
या रेल्वेत प्रवास करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना शुभेच्छा देत, पंतप्रधान
आणि रेल्वेमंत्र्यांचे या विशेष रेल्वेबद्दल आभर मानले.
****
राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजनेशी संलग्न योजना तयार
करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून १०० युनिटपर्यंतच्या वीज ग्राहकांना, सौर
ऊर्जेवर आणणे आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांचा यात समावेश
करण्याचे उद्दिष्ट आहे,
अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल
पुण्यात महाऊर्जा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित
केलं. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात
डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती
मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.
****
निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला 24
डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात पक्षानं केलेल्या
सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार माहिती दिली आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्यानं
आयोगानं खेद व्यक्त केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा त्याच्या नेत्याने
आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, निश्चितच उत्तर देतो आणि
देत आलो आहोत,
असं आयोगानं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये
प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा, असं
आवाहन आयोगानं केलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या लेखाचं उत्तर
लेखानेच दिले असून,
आता तरी राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्ये करणे थांबवतील, असं
मुख्यमंत्री म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या
तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन घडून
आलं आहे. गेल्या ११ वर्षातील प्रमुख क्षेत्रांत झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी
तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण ईशान्येकडील राज्यांच्या विकासगाथेविषयी
जाणून घेणार आहोत.
गेल्या दशकात ईशान्यकडील राज्यांची वाटचाल एकाकीपणापासून एकात्मिकतेकडे झाली
आहे. अॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ईशान्येकडील
प्रदेश दुर्लक्षिततेपासून प्राधान्याकडे आला आहे. शांतता करारांवर स्वाक्षरी
केल्यानं या प्रदेशात शांतता प्रस्थापित होत आहे आणि हिंसाचारात घट झाली आहे. सरकारच्या
प्रयत्नांमुळे या प्रदेशात AFSPA ची
व्याप्ती कमी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशाने
दशकांपासून चालत आलेला सीमा वाद सोडवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
आहे.
दळणवळणात अभूतपूर्व सुधारणा झाल्या आहेत. दहा नवीन ग्रीनफील्ड विमानतळं, मिझोरमसारख्या राज्यांमध्ये नवीन रेल्वे जोडणी आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील रो-रो
फेरी सेवांमुळे गतिशीलता वाढली आहे. बोगीबील पुलासारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे
एकेकाळी दुर्गम असलेले प्रदेश जवळ आले आहेत.
पीएम-डिव्हाईन (PM-DevINE) आणि
उन्नती-२०२४ यांसारख्या योजना नवीन आर्थिक क्षमता प्रस्थापित करत आहेत. पायाभूत
सुविधा आणि उपजीविका वाढविण्यासाठी १ कोटी ३५ लाखांहून अधिक रुपयांचे प्रकल्प सुरु
करण्यात आले आहेत. जलविद्युत विकासात मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली असून १५
हजार मेगावॅट स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेने ईशान्यकेडील राज्यांची वाटचाल
सुरु आहे.आज,
ईशान्येकडील राज्य फक्त सीमावर्ती भाग नाहीत, तर
ते देशाच्या विकासाचे प्रमुख इंजिन आहेत.
****
99 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित
करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि
मावळा फौंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल पुणे इथं
झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती साहित्य
महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली. साताऱ्यात होणारं हे चौथं संमेलन आहे.
****
विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या
५० गावांमध्ये विविध उपयुक्त कार्यक्रम राबवले जात आहेत. तुळजापूरच्या कृषी
विज्ञान केंद्र,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाच्या वतीने,राजुरी
इथं प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय
जनता पक्षाच्या परभणी शाखेच्या वतीनं काल 'संकल्प से सिद्धी तक' ही
कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये “विकसित भारत - अमृत काळातील सेवा, सुशासन
आणि गरीब कल्याण” या संकल्पनेवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. केंद्र
सरकारच्या विविध योजनांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार आणि जनसंपर्क
यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आल्याची माहिती
महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी दिली.
****
११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला १२ दिवस शिल्लक आहेत.
योगासनांविषयीच्या मालिकेत आज जाणून घेऊया, योगशिक्षक उमेश दरक यांनी दंडस्थितील त्रिकोणासान याविषयी दिलेली माहिती.
बाईट
- योगशिक्षक उमेश दरक
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मार्गावरील वाई
फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री
साडे नऊच्या दरम्यान ही घटना घडली. हे मजूर दुचाकीवरून वसमतकडे जात असताना औंढा
नागनाथकडून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
हवामान
धाराशिव जिल्ह्यात लोहारा इथं काल दुपारी गारांसह मुसळधार
पाऊस झाला.
दरम्यान, राज्यात अनेक भागात पुढील दोन ते तीन
दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मध्य महाराष्ट्र,
मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा, तर
कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड
आणि बीड जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं
सलग दुसऱ्या विजेतेपद पटकावलं. त्यानं इटलीच्या जॅनिक सिन्नेरचा पाच सेटमध्ये
पराभव केला. या विजयासह अल्काराझनं पाच ग्रँडस्लॅम जिंकण्याचा मान मिळवला
आहे.
****
No comments:
Post a Comment