Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 June 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १० जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
गेल्या ११ वर्षांत आपल्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या
बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक
मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद होत असल्याचं पंतप्रधान मोदी
यांनी सामाजमिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
ऑपरेशन सिंदूर बाबत जगभरातल्या महत्वाच्या देशांना भेटी देऊन
भारताची भूमिका मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधल्या सदस्यांची आज पंतप्रधान नरेंद्र
मोदी भेट घेणार आहेत. वृत्तसंस्थेच्या बातमीत ही माहिती दिली आहे. या मोहिमेबाबत चर्चा
करण्यासाठी ही भेट होणार असून, संसदीय कामकाज मंत्री किरेन
रिजिजू यांच्या कार्यालयानं या सदस्यांना आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानांच्या
निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं कळवलं आहे. दरम्यान, शशी
थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचं आज मायदेशी आगमन होणार आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर
असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या तीन हजार कोटी रुपयांच्या विविध
विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. कार्यकर्ता संवाद संमेलनाच्या
माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी थेट संवादही साधणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या
पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रारंभ काल पुण्यात हडपसर इथं झाला. बीड जिल्ह्यातल्या डॉक्टर
हनुमंत आणि डॉक्टर स्वाती शेळके या दाम्पत्यानं २०३० पर्यंत रेबीज या रोगाचं निर्मूलन
करण्याचं ध्येय समोर ठेवून हे रुग्णालय सुरू केलं आहे.
****
त्रंबकेश्वर आणि नाशिक इथं पुढील वर्षी सुरु होणाऱ्या कुंभमेळ्याच्या
कायमस्वरूपी कामांसाठी राज्य सरकारनं कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला
होता. काल शासन राजपत्रात प्रसिद्धी करून हे प्राधिकरण स्थापन करण्यात आलं. विभागीय
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हे प्राधिकरण कार्यरत राहणार असून यात सदस्य सचिव म्हणून
सिंहस्थ आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं आहे. हे आयुक्त शासन नियुक्त करणार आहे याशिवाय
या प्राधिकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी
उपाध्यक्ष असतील, विविध
शासकीय खात्याच्या प्रमुखांचा या प्राधिकरणात समावेश असून सदस्य म्हणून अहिल्यानगर
जिल्हाधिकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी
पावसामुळे कळमनुरी आणि वसमत तालुक्यातल्या केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं. या वादळी
पावसानं केळीची झाडं आडवी पडली असून, हाताशी आलेलं उत्पादन वाया
गेलं आहे. या पावसानं अनेक घरांवरचे पत्रे उडाल्याचं, तसंच विजेचे खांब कोसळल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती
दिनी दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरचा एकोणचाळीसावा शाहू पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट
दिग्दर्शक जब्बार पटेल यांना काल जाहीर करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक न्यासाच्यावतीनं
हा पुरस्कार देण्यात येतो. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल पत्रकार
परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह
आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
पु.ल. देशपांडे यांच्या स्मृती शाश्वत ठेवण्यासाठी सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठात पुलंच्या नावानं अध्यासनाची निर्मिती करावी, अशी इच्छा ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात
आयोजित 'ग्लोबल पुलोत्सवा'च्या उद्घाटन सोहळ्यात ते काल बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ
गायिका दिवंगत प्रभा अत्रे यांच्या 'स्वरमयी' संस्थेला विशेष पु.ल. पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीनं
क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट
केलं आहे. या वर्षी हा सन्मान मिळवणा-या सात खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. कठीण
परिस्थितीत असामान्य नेतृत्व करण्याची क्षमता आणि खेळातलं अद्भुत कौशल्य यासाठी धोनीची
निवड या सन्मानासाठी केल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट
होणं, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया महेंद्रसिंह धोनीनं दिली आहे.
****
राज्यात मान्सूनची प्रगती मंदावल्यामुळे तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. येत्या १५ जून पर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरूपात
असल्यामुळं तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, त्यामुळं शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी आज तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात बीड, नांदेड, लातूर
आणि धाराशिव जिल्ह्यांना पुढच्या चार दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment