Friday, 20 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जून २०२ दुपारी १.०० वा.

****

११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. योग दिनाची यंदाची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’, ही असून, जी वैयक्तिक आरोग्य आणि जागतिक शाश्वततेला जोडते. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध संस्था संघटनाही सामूहिक योग प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या योग दिनी पुण्यात मुक्कामी आहेत. यानिमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, योग अभ्यासक असे साधारण दहा लाख लोक योगसाधना करणार आहेत.

सांगलीमध्येही उद्या सकाळी भक्तियोग, हा अनोखा उपक्रम साजरा होणार आहे. यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकाच वेळेस एकाच तालावरती म्हणजे वारकरी तालावरती योगासनं करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही योगदिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग जनजागृती सत्राचं आयोजन केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बिबी का मकबरा परिसरात होणार आहे.

लातूर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी साडे सहा वाजता होणार आहे. नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर, धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन हॉलमध्ये, तर बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. सकाळच्या सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

केंद्रीय संचार ब्‍यूरो आणि परभणी सायकलर्सच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. या वारीचं उद्घाटन आज परभणी इथं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते झालं. परभणी सायकलर्स वारीचं हे सातवं वर्ष असून, या वारीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व आणि जनजागृती करण्यात येणार आहे. ही वारी परभणी ते पंढरपूर हे ३०० किलोमीटरचं अंतर दोन दिवसात पार करणार आहे. वारी विठोबाची, साथ आरोग्याची या उपक्रमांतर्गत परभणीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या वारीत आरोग्यसेवा पुरवण्यात आली आहे.

****

जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. या पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातले विविध २६ रस्ते वेगवेगळ्या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील.

आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज सकाळी बेलापूरहून राहुरीकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात ६० हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.

मुक्ताईनगर इथल्या संत श्री मुक्ताबाईंची पालखी बीड जिल्ह्यात असून, आज गढी इथल्या भवानी मंदिर परिसरात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे.

****

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. कांकेर जिल्ह्यात आमाटोला आणि कालपर परिसरात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव रक्षक दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून, आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात वृक्षाच्छादन वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने १९ जुलै रोजी हरित धाराशिव अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जनजागृती आणि लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना १ जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी दिले आहेत. या ग्रामसभेत वृक्ष लागवड उपक्रमाची माहिती, गावातील संभाव्य लागवड स्थळांच्या नियोजनासह, प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावण्याचं आवाहन करण्यात येणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाकी इथला लघु बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, निळवंडे धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. तर कळसुबाई शिखरावरील मुसळधार पावसाने कृष्णावंती नदी दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यातल्या पिंपळगाव खांड आणि आंबित धरणनानंतर आता वाकी धरणही भरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment