Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23
June 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून
२०२५ दुपारी १.०० वा.
****
अंदाज समिती वित्तीय तरतूद आणि अर्थसंकल्पीय खर्चावर काटेकोर
लक्ष देते. ही समिती सरकारची धोरणं, योजना आणि कार्याला दिशा देण्याचं काम करते, असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. ते
आज मुंबईत संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
तर, अंदाज समिती सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. या समित्यांच्या
माध्यमातून सरकारला उत्तरदायित्व ठरवलं जातं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ.संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख
अर्जुन खोतकर यांची परिषदेला उपस्थिती आहे.
****
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरात
त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.श्यामाप्रसाद
मुखर्जी यांना आदरांजली वाहिली आहे. देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी डॉ.मुखर्जी यांनी
अमूल्य धाडस दाखवत प्रयत्न केले. राष्ट्र उभारणीतील त्यांचं योगदान देश नेहमीच स्मरणात
ठेवेल, असं मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज डॉ.मुखर्जी
यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात झालेल्या
कार्यक्रमात नड्डा यांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. डॉ.मुखर्जी
हे एक स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते, त्यांनी जम्मू आणि काश्मीरला दिलेल्या विशेष दर्जाला विरोध केला
होता, असं नड्डा म्हणाले.
****
२३ जून १९८५ मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या १८२ कनिष्क
विमान बॉम्बस्फोटाचा आज ४० वा स्मृतिदिन. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या हल्ल्यात
मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना आदरांजली वाहीली आहे. हा दहशतवादी हल्ला सर्वात वाईट
कृत्यांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. आजच्याच दिवशी एअर इंडिया फ्लाइट
१८२ हे विमान कॅनडाच्या मॉन्ट्रियल इथून लंडनमार्गे नवी दिल्लीला येत होतं, आयर्लंडच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागराच्या वरच्या
हवेत भीषण बॉँम्बस्फोट झाल्याने उद्ध्वस्त झालं होतं. कॅनडामधील खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी
हा भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
****
वाशिम जिल्ह्यात आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी
अनुदानित शाळा सकाळी आठ वाजता सुरू झाल्या. राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या पहिल्याच
दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात जिल्हा
परिषदेच्या ७७४ शाळा, ३६६ खासगी शाळा, ३२६ विनाअनुदानित शाळा उघडल्या आहेत, अशी माहिती शिक्षण अधिकारी आकाश आहळे यांनी दिली. दरम्यान, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यातही शाळेच्या पहिल्या दिवशी
विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ आणि पाठ्यपुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं.
****
इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर
बाजारांनी आज सकाळी घसरणीसह सुरुवात केली. सेन्सेक्स सध्या ० पूर्णांक ८१ टक्क्यांनी
घसरून ८१ हजार ७४४ अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टी ० पूर्णांक ७९ टक्क्यांनी घसरून
२४ हजार ९१४ अंकांवर आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील शेअर बाजारांमध्येही सुरुवातीच्या
व्यवहारात घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील एस अँड पी ५०० फ्युचर्स निर्देशांकही
घसरणीमध्ये आहे, तर नॅस्डॅक फ्युचर्स जवळपास १००
अंकांनी खाली आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या दरात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या पाच महिन्यातील हा उच्चांक आहे. आज तेलाची किंमत प्रति बॅलर ७९ डॉलर एवढी झाली.
कच्च्या तेलाच्या किंमतीत सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली.
****
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथं शीळ-देहर्जे मार्गावरच्या देहर्जे नदीवरील पूल, सारशी-शोळशेत मार्गावरील, मोरी पूल तसंच कुरंझे-कंचाड मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने काही रस्ते
वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहेत.
****
No comments:
Post a Comment