Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान महत्त्वपूर्ण-मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांचं प्रतिपादन
· सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या
माध्यमातून गेल्या ११ वर्षात अल्पसंख्याक समुदायाचं सक्षमीकरण
· एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध-महामंडळाला चार वर्षात फायद्यात
आणण्याचा प्रयत्न करू-परिवहन मंत्र्यांची ग्वाही
· बनावट सातबारा उताऱ्यांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यात दहा जणांविरुध्द
गुन्हा दाखल
आणि
· इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताला उपाहारापर्यंत
१५९ धावांची आघाडी
****
लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण
असल्याचं, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. अंदाज समितीच्या माध्यमातून
सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिषदेत बोलतांना, विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत
पोहचला पाहिजे, संसदेच्या अंदाज समितीचं काम
यासंदर्भात खूप परिणामकारक ठरते असं मत व्यक्त केलं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या
या परिषदेत अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. उद्या या परिषदेचा समारोप होत आहे.
****
सेवा, सुशासन
आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन
घडून आलं आहे. आकाशवाणी तुमच्यासाठी गेल्या ११ वर्षात सरकारने प्रमुख क्षेत्रांत केलेल्या
कामकाजाची माहिती घेऊन येत आहे. आजच्या भागात केंद्र सरकारने अल्पसंख्याक समुदायाचे
सक्षमीकरण, संधी आणि सुधारणांबाबत केलेल्या
कामाबाबत जाणून घेऊया.
गेल्या
दशकात, सरकारनं अल्पसंख्यांक समुदायाचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक निर्णय घेतले
आहेत. यात शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री
जन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार ४०० कोटी रुपयांचे विविध प्रकल्प
राबवले आहेत. तसंच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि आर्थिक महामंडळाच्या
माध्यमातून सुमारे पावणेदोन कोटी लाभार्थ्यांना ७५२ कोटी रुपये हस्तांतरीत केले
आहेत.
सरकारनं
सांस्कृतिक आणि समुदाय-विशेष कार्यक्रमांवर भर दिला आहे. हज यात्रेकरुंसाठी हज
सुविधा ऍपच्या माध्यमातून सुलभता प्रदान केली. पारदर्शकता आणि सुशासनासाठी
ऐतिहासिक वक्फ कायदा-२०२५ लागू केला. तसंच उम्मीद पोर्टलच्या माध्यमातून वक्फ
संपत्तीच्या डिजीटल व्यवस्थापनाची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय
सरकारनं बुद्धीस्ट विकास योजना, जियो पारसी तसंच विविध समुदायांच्या संस्कृती जतनासाठी आणि सामुदायिक
कल्याणासाठी विविध निर्णय घेतले आहेत.
****
गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला
येत्या चार वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका
प्रसिद्ध करताना बोलत होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अखेर एसटी महामंडळाचा संचित
तोटा १० हजार कोटींपेक्षा अधिक झाल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. या तोट्यामागे बसची
कमतरता, अनियमित भाडेवाढ, अवैध वाहतूक यासारखी कारणे श्वेतपत्रिकेत नमूद आहेत. दरवर्षी
५ हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक
तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत आहे.
****
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज जालना इथल्या जिल्हा
परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीला भेट देत, निवासी क्रीडा प्रबोधिनीची आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. क्रीडा
प्रबोधिनीची वाटचाल निर्विवादपणे चालू ठेवण्यासाठी निधी देण्याचं आश्वास भुसे यांनी
यावेळी दिलं.
****
साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ
साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सत्कार
करण्यात आला. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सावंत यांना त्यांच्या निवासस्थानी
शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. मनपाचे अनेक अधिकारी तसंच पदाधिकारी
यावेळी उपस्थित होते
****
नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाच्या
वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या
एक हजार ५३२ गावातल्या स्वच्छतेची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. त्या आज नांदेड इथं बोलत होत्या.
या सर्वेक्षणात गावांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून वैयक्तिक आणि
सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृष्यमान
स्वच्छता, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यासह अन्य घटकांची पाहणी करण्यात
येणार आहे. सरपंच, ग्रामपंचायत
सदस्य, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समित्या आणि ग्रामस्थांनी एकजुटीने तयारीला लागावं, असं आवाहन मेघना कावली यांनी केलं आहे.
****
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान
अर्थात उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी हिरकणी महिला खरेदी विक्री
उत्पादक गटाची स्थापना केली आहे. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या व्यवसायातून साडे
बारा लाख रुपयांची उलाढाल होऊन बारा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. या उत्पादक
गटाच्या महिलांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.
बाईट – अर्चना राऊत
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या
पालखी दिंडीचं आज बीड जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं. शिरूर कासार इथं ग्रामस्थांनी
पालखी दिंडीचं फटाके आणि ढोल वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत केलं. दुपारपर्यंत ही पालखी
शिरूर इथल्या हनुमान मंदिरामध्ये ठेवण्यात आली, त्यानंतर नागरिकांनी या पालखीतील नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतलं. त्यानंतर नाथांची
पालखी राक्षसभुवन इथं नेण्यात आली.
****
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी बीड जिल्ह्यातून
१५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी
माहिती विभागीय नियंत्रक अनुजा दुसाने यांनी दिली. गतवर्षी बीड विभागातून १२७ बस पाठवण्यात
आल्या होत्या, त्यातून बीड विभागाला १ कोटी
४७ लाख रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाल्याचं दुसाने यांनी सांगितलं.
****
लातूर इथं केंद्रीय राखीव पोलिस दल- सीआरपीएफच्या प्रशिक्षण
केंद्रात आज पोलिस शिपायांच्या ३१व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला. या तुकडीत
एकूण ८९ प्रशिक्षणार्थी आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या देशभरात विविध ठिकाणी रुजू
होणार आहेत. सीआरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक तथा प्राचार्य अमिरुल हसन अन्सारी यांनी प्रशिक्षार्थी
शिपायांचं अभिनंदन केलं.
****
जालना जिल्ह्यात बनावट सातबारा उताऱ्यांच्या आधारे शासनाची फसवणूक
केल्याचा प्रकार उघड झाला आहे. भोकरदन तालुक्यात जानेफळ गायकवाड इथं खोटा सोयाबीन पीकपेरा
दाखवून शासनाची सुमारे एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दहा
जणांविरुध्द फसवणूक आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या
चौथ्या दिवशी भारतीय संघाने उपाहारापर्यंत ३ गड्यांच्या बदल्यात १५३ धावा केल्या आहेत.
आता भारतीय संघाकडे १५९ धावांची आघाडी
झाली आहे. के एल राहूल ७२ तर ऋषभ
पंत ३१ धावांवर खेळत आहेत.
****
गुजरात मध्ये भूज इथं होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल
स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सायली वैभव किरगत यांची महाराष्ट्राच्या संघात
निवड झाली आहे. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत भूज इथं २८ जून ते ३ जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
****
हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये उद्या न्यायिक अधिकारी, वकील, कर्मचारी
आणि पक्षकार यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी
केलं आहे.
****
पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित
अंतर राखावं, असं आवाहन महावितरण बीड विभागाचे
कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांनी केलं आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीज
यंत्रणेशी संबंधित खबरदारी घ्यावी, असं
डोंगरे यांनी म्हटलं आहे
****
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात १०० मिलीमिटर पेक्षा जास्त
पाऊस झाला नसल्याने, अद्याप
पेरणीची घाई करु नये, असं
आवाहन नांदेडचे जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.नीलकुमार ऐतवडे यांनी केलं आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत सरासरी ६९ मिलीमीटर पावसाची
नोंद झाली आहे
****
No comments:
Post a Comment