Monday, 23 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथल्या योगाभ्यासाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

·      संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

·      बीड जिल्ह्यात पंधरा बालकामगारांची पोलिसांकडून सुटका

आणि

·      इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडं ९६ धावांची आघाडी

****

अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम् इथे तीन लाख १०५ सहभागींसह सर्वात मोठ्या योगाभ्यासाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. योगामुळं लोक पुन्हा एकदा एकत्र आले असून योगांध्र उपक्रम आणि विशाखापट्टणममधील कार्यक्रम हा सहभागी लोकांना चांगले आरोग्य आणि कल्याणासाठी प्रेरित करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. योगाभ्यासाला जीवनशैलीचा भाग करण्याच्या चळवळीला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचं कौतुक केलं आहे.

****

संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला आज मुंबईत विधान भवनात प्रारंभ होत आहे. या परिषदेत "प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका" या विषयावर विचारमंथन होईल. संसदेच्या तसंच सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातले संसद सदस्य देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

****

जम्मू-काश्मीरच्या पहेलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा -एन.आय.ए.नं अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीतून हल्ल्यात सहभागी तीन सशस्र अतिरेकी पाकिस्तानी नागरिक होते आणि ते लष्करे तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं आहे.

****

केंद्र सरकारनं गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या भरीव उपाययोजनांमुळं उर्जा सेवेत आमुलाग्र बदल झाले आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून….

गेल्या दशकात देशाच्या उर्जा क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. वाढती मागणी, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास, आणि पारंपरिक तसंच नवीकरणीय ऊर्जा स्रोतांसाठी धोरणात्मक पाठबळ यामुळं ही वाढ घडून आली आहे.

जून २०२५  पर्यंत देशाची एकूण स्थापित वीज क्षमता ४७६ गिगावॅटपर्यंत पोहोचली असून, यापैकी जवळपास निम्मी क्षमता जीवाश्म इंधनाशिवाय अन्य स्त्रोतांमधून येते. एकट्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे २२६ गिगावॅट वीज निर्मिती होत असून, भारत आता सौरऊर्जा क्षमतेत जगात तिसऱ्या क्रमांकावर आणि पवनऊर्जा क्षमतेत चौथ्या क्रमांकावर आहे.

देशात एप्रिल २०१८ मध्ये १०० टक्के गावं प्रकाशानं उजाळून काढली आहेत, तर २ कोटी ८ लाखांहून अधिक कुटुंबांना वीज जोडणी दिली आहे. २०१४ मध्ये चार टक्क्यांहून अधिक असलेल्या वीजटंचाईचं प्रमाण आज केवळ ०.१ टक्क्यांवर आलं आहे, तर प्रति व्यक्ति वीज वापरामध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पीएम-सूर्य घर योजना देशभरातील घरं उजळवत आहे, तर पीएम-कुसुम योजना शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन सुविधांद्वारे सक्षम करत आहे. पवनऊर्जा क्षेत्राची क्षमता दुपटीनं वाढली आहे, तर जलविद्युत, बायोमास आणि अणुऊर्जा क्षेत्रातली क्षमताही सातत्यानं वाढत आहे. त्याचवेळी, देशाच्या कोळसा क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्यात आलं असून, आत्मनिर्भरतेसह शाश्वततेकडे वाटचाल करत उच्च उत्पादन पातळी गाठली आहे आणि आयातीवरील अवलंबन मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे.

नॅशनल ग्रीन हायड्रोजन अभियानापासून ते आंतरराष्ट्रीय सौर आघाडीपर्यंत, भारत केवळ आपली ऊर्जा गरज भागवत नाहीये, तर स्वच्छ आणि हरित भविष्याकडे वाटचाल करत आहे.

****

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतिवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास तज्ज्ञांच व्याख्यान आणि शौर्य गाथेचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र इथं दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. २३ जून १८५७ रोजी तत्कालीन औरंगाबाद शहराच्या खाम नदीवरील लोखंडी पुलाजवळ भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई सुरू झाली होती. या लढ्यातील हिंदी सैनिक तसंच क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं होतं. या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

****

नाशिक आणि त्रंबकेश्वर इथं २०२७ मधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण तसंच इतर सुविधांसाठी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या सुविधेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं होतं. त्यानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काल नागपूर इथं फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजी नगर, नागपूर, खान्देश तसंच राज्याच्या सहा दिशातून नाशिककडे येणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरण तसंच बळकटीकरण करण्यात येईल, असं गडकरी यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात १५ बालकामगारांची पोलिसांनी सुटका केली आहे. यात नऊ मुली तर सहा मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुणीभांडी आणि अन्य कामं करून घेतली जात होती. यापैकी दोन मुलं स्वत:ची सुटका करून अहिल्यानगर शहरात पोहचल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून हा प्रकार समोर आला. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे या संदर्भात माहिती दिली, ते म्हणाले...

बाईट - अशोक तांगडे

****

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मूल्यांकन कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेण्याचे आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी केलं आहे. ग्रामपंचायतींनी सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत लोकसहभागतून परिसराची स्वच्छता करून घ्यावी, असं माथूर यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी यांना सूचित केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..

प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेल्या घनकचरा तसंच सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचं पथक जिल्ह्यात येणार आहे. या पाहणी दरम्यान प्लास्टिक संकलन आणि वर्गीकरण केंद्राची पाहणी, खत खड्ड्यांचं व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच गृहभेटीतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन केलं जाणार आहे. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२० गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० गुण, गावातील सुविधांच्या वापराबाबत २४० गुण दिले जाणार असून, प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ५४० गुणांची प्रश्नावली असणार आहे. अशा एकूण एक हजार गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे सर्वात स्वच्छ सुंदर गाव आणि ग्रामपंचायत निवडली जाणार आहे. सुदर्शन चापके आकाशवाणी बातम्यांसाठी परभणी

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल पुणे जिल्ह्यातला दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून सासवड मुक्कामी पोहोचली. तर संत श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मांजरीमार्गे लोणी काळभोरच्या मुक्कामी दाखल झाला. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं काल अहिल्यानगर इथं तर संत मुक्ताबाई पालखीचं काल बीड शहरात भक्तीभावाने स्वागत करण्यात आलं.

****

राज्यातल्या ८० शहरांतून चार हजार सायकलस्वारांची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे. या सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणं काल सायकल वरून नगरप्रदक्षिणा घातली. आरोग्यमय भारत या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं

दरम्यान, पंढरपूर इथं स्वच्छता अभियानाला कालपासून सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारीनंतरही अशी मोहीम राबवली जाणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शाखेच्या अध्यक्षपदी बालाजी इबितदार यांची निवड करण्यात आली. २०३० पर्यंत ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे.

****

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडं तिसऱ्या दिवसअखेर ९६ धावांची आघाडी आहे. काल इंग्लंड संघाचा पहिला डाव ४६५ धावांवर संपुष्टात आला.जसप्रीत बुमराहनं पाच तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजनं अनुक्रमे तीन आणि दोन बळी घेतले. भारतानं पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, अवघ्या चार धावांवर बाद झाला. कालचा खेळ थांबला तेव्हा के एल राहुल ४७ धावांवर खेळत होता तर साई सुदर्शन ३० धावांवर बाद झाल्यानं शुभमन गिल मैदानात उतरला होता. भारताच्या दुसऱ्या डावात दोन बाद ९० धावा झाल्या आहेत.

****

हवामान

मराठवाडयात पुरेसा पाऊस अद्यापही पडलेला नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कृषी हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या हिप्परसोगा शिवारात बिबट्याचा वावर असून त्याने शेतातील २ जनावरं मारली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी तसंच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

 

No comments:

Post a Comment