Tuesday, 24 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशाचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक गुरु, श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक संवादाच्या शतकपूर्ती सोहळ्याला आज संबोधित केलं. दोन महान नेत्यांमधील हा संवाद १२ मार्च १९२५ ला शिवगिरी मठात झाला होता. हा संवाद धर्मांतर, हिंसा, अस्पृष्यता निर्मूलन, मोक्षप्राप्ती आणि दलितांचा उद्धार अशा विषयांवर केंद्रित होता. श्री नारायण गुरुंनी महिला सक्षमीकरणाला चालना दिली. हेच धोरण राबवत सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं, ते म्हणाले...

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्याने संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने जबाबदारीचे पालन करावे असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. मुंबईत अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. देशावरील कर्जाचा भार पाहता जन कल्याणासाठी अधिक जबाबदारीनं खर्च करण्याची गरज आहे, त्यात या समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं राज्यपाल म्हणाले.

****

पश्चिम आशियातल्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत इराणहून दोन हजार दोनशे पंचाण्णव भारतीय नागरिकांना स्वदेशी परत आणण्यात आलं आहे. तर इस्रायलमधून एकशे पासष्ट नागरिकांना आज सकाळी भारतात आणण्यात आलं. गरज पडल्यास देशात किंवा जगभरातही मदतीसाठी जाण्यास प्रतिबद्ध असल्याचं भारतीय वायुसेनेनं म्हटलं आहे. भारतीयांना आणि मित्र देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी वायुसेनेनं जॉर्डन आणि इजिप्तमधूनही मोहिमा सुरू केल्या आहेत.

****

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण,हे शासनाचे तीन प्रमुख स्तंभ विकसित भारताच्या दिशेनं नेतील, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते आज तेराव्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त बोलत होते. पासपोर्ट जारी करण्याच्या प्रणालीत उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पासपोर्ट सेवा कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती देशभरात लागू करण्यात आली असून, यात उच्चस्तरीय तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. एम पासपोर्ट पोलिस ॲप सुरू झाल्यामुळे पंचवीस राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलिस पडताळणीला लागणारा वेळ कमी होऊन, तो पाच ते सात दिवसापर्यंत आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं.

****

त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावरील सर्व पर्यांयासाठी समग्र सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घ्यावा असंही या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

****

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढून धरण ६१ पूर्णांक ८७ टक्के भरल्याने विसर्गात सोमवारी दुपारी दोन वाजता दुपटीनं वाढ करण्यात आली. ६ हजार १६० क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत करण्यात आल्यामुळे गोदावरीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरीत कालपासून वादळी वाऱ्यांसह अत्यंत जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धाराशीव जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५, या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. यात जिल्ह्यातल्या ६२२ ग्रामपंचायतीतल्या ७२० गावांमध्ये गावांमध्ये स्वच्छता विषयक तपासणी होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी ही माहिती दिली आहे. या सर्वेक्षणात गावांतल्या स्वच्छतेची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असून, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्थांचा प्रतिसाद आणि मानसिकतेतील बदल, स्वच्छता सुविधांचा वापर, अशा निकषांनुसार ग्रामपंचायतींचं मूल्यांकन केलं जाणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात युसूफ वडगाव हद्दीत माळेगाव शिवारात पोलिसांनी कारवाई करत ३ लाख ९४ हजाराचा अवैध गांजा जप्त केला आहे.यासंदर्भात सिद्धेश्वर ठोंबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment