Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ दौरा हा नव्या युगाचा
शुभारंभ-पंतप्रधानांचे गौरवोद्गार
·
नागपुरात संविधान उद्देशिका पार्कचं सरन्यायाधीश भूषण
गवई यांच्या उपस्थितीत लोकार्पण
·
बीड जिल्ह्यातले विद्यार्थी गिरवणार जपानी भाषेचे धडे
·
छत्रपती संभाजीनगर इथं जालना रस्त्यावरची सुमारे पाचशे
अतिक्रमणं निष्कासित
आणि
·
महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर
९७ धावांनी विजय
****
कॅप्टन
शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ दौरा हा नव्या युगाचा शुभारंभ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल कॅप्टन शुक्ला यांच्याशी संवाद साधून, शुभेच्छा
देतांना ही भावना व्यक्त केली. शुभांशू शुक्ला हे सध्या देशापासून दूर अंतरावर असले
तरीही प्रत्येक देशवासियाच्या मनाच्या अत्यंत जवळ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं,
शुक्ला यांनी या मोहिमेत देशाचं प्रतिनिधीत्व करता आल्याबद्दल आनंद व्यक्त
केला. पंतप्रधान आणि कॅप्टन शुक्ला यांच्यातल्या संवादाचा हा संपादित अंश..
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅप्टन शुभांशू शुक्ला
दरम्यान, मन की बात
कार्यक्रमातून, पंतप्रधान आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता
या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
मोबाईल
ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. बिहारमध्ये
काल सहा नगर पंचायतींसह इतर ३६ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी
मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्रावर मतदान करण्यासोबतच मतदारांना आपल्या मोबाईलवर
ई-वोटिंग ॲप डाऊनलोड करून, घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
सुमारे ५० हजारावर मतदारांनी या सुविधेसाठी नोंदणी केली, या माध्यमातून
७० टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क हे एक महत्त्वाचं
पाऊल असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. काल नागपुरात राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. भारताच्या
मध्यस्थानी संविधान पार्क साकारून, संविधान हे भारतीयांच्या हृदयात आहे,
हीच बाब अधोरेखित झाल्याची भावना सरन्यायाधीशांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
बाईट
- सरन्यायाधीश भूषण गवई
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते. संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे, या उद्देशिकेतील
मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं.
**
दरम्यान, जागतिक बँक
सहाय्यित महास्ट्राईड प्रकल्पाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात करण्यात
आला. हा उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास
येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी
यावेळी जिल्हा विकास आराखड्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन
केलं. जिल्ह्यात येणाऱ्या खासगी गुंतवणूकदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करण्यात येऊ नयेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना
केली. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्राला
सिंहाचा वाटा उचलायचा असून 'मित्र' संस्थेच्या
माध्यमातून महाराष्ट्राची उभारणी होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त
केला.
****
शिक्षणासारख्या
संवेदनशील विषयावर राजकीय पक्षांनी राजकारण न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असं आवाहन
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केलं
आहे. राज्य सरकारने कुठल्याही भाषेची सक्ती केलेली नाही, सर्वांगीण
विकासासाठी विद्यार्थ्यांना सरकार विविध पर्याय देत असल्याचं सांगत, हेमंत पाटील यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.
****
अमेरिकन
सिनेटनं परदेशात पैसे हस्तांतरण करण्यासाठीचा कर साडे ३ टक्क्यांवरुन १ टक्के केला
आहे. त्यामुळं तिथं राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना कमी शुल्कात भारतातल्या कुटुंबीयांना
पैसे पाठवता येतील. रोख रक्कम, मनी ऑर्डर, कॅशियर
चेक यासारख्या माध्यमातून निधी हस्तांतर केला तर हे शुल्क द्यावे लागेल. येत्या १ जानेवारीपासून
हे नवे दर लागू होतील. बँक खाती आणि अमेरिकेत जारी केलेली डेबिट तसंच क्रेडिट कार्डद्वारे
केलेल्या व्यवहारांवर कुठलेही शुल्क लागणार नाही.
****
शाळेतले
विद्यार्थी एकमेकांशी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत संवाद साधताना
आपल्याला दिसतात, मात्र बीड जिल्ह्यातले विद्यार्थी आता जपानी
भाषेतूनही संवाद साधू शकणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
‘‘शाळेतले
विद्यार्थी एकमेकांशी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी
भाषेत संवाद साधताना आपल्याला दिसतात, मात्र बीड जिल्ह्यातले
विद्यार्थी आता जपानी भाषेतूनही संवाद साधू शकणार आहेत. कॉस्मो इंडिया या
कंपनीच्या सहाय्याने स्वामी विवेकानंद विद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात
आली आहे. यासाठीच्या विशेष कक्षाचं काल उद्घाटन करण्यात आलं. या कक्षात इंटरॲक्टिव
बोर्ड बसवण्यात आला असून, या माध्यमातून थेट जपानमधले
शिक्षक बीडमधल्या विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवणार आहेत. उगवत्या सूर्याचा देश
अशी ओळख असलेल्या जपानची भाषा स्थानिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात नवा
प्रकाश घेऊन येईल, यात दुमत नाही.’’
रवि
उबाळे, आकाशवाणी
बातम्यांसाठी बीड
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल जालना रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी सुमारे पाचशे अतिक्रमणं
निष्कासित करण्यात आली. ३५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने चोख पोलिस बंदोबस्तात
ही कारवाई केली. ही कारवाई आजही सुरू राहणार असून, अतिक्रमण हटवताना
कोणालाही सवलत दिली जाणार नाही, असं महापालिका आयुक्त तथा प्रशासक
जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं.
****
परभणी जिल्ह्यात
खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत, नगदी पीक म्हणून असलेले कापूस आणि हळद
पिकांची लागवड पूर्ण होत आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५ दिवस
विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानात केलेल्या मार्गदर्शनामुळे
यंदा जिल्ह्यात शेती उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विज्ञान
केंद्राचे प्रमुख डॉ प्रशांत भोसले यांनी वर्तवला आहे. ते म्हणाले...
बाईट
- डॉ प्रशांत भोसले
****
जगद्गुरु
संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा काल पुणे जिल्हात
बेलवाडी इथं साजरा झाला. तर, संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा धाराशिव
जिल्ह्यातल्या भूम इथं मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर ही पालखी कुंथलगिरी
मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली.
दरम्यान, राज्य महिला
आयोगातर्फे आरोग्यवारी उपक्रम सुरू आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बाळांना दूध पाजण्यासाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह,
दामिनीपथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
****
भारत-इंग्लंड
महिला संघांदरम्यान क्रिकेट टी-ट्वेंटी मालिकेत कालचा पहिला सामना भारतानं ९७ धावांनी
जिंकला. प्रथम फलंदाजी करत, भारतानं दिलेलं २११ धावांचं लक्ष्य गाठतांना, यजमान इंग्लंडचा संघ, पंधराव्या षटकाचा एक चेंडू शिल्लक
असतांना ११३ धावांवर गारद झाला. ११२ धावा करणारी भारतीय फलंदाज स्मृती मानधना सामनावीर
ठरली. पाच सामन्यांच्या मालिकेतला पुढचा सामना एक जुलैला होणार आहे.
****
जायकवाडी
धरणात गेल्या नऊ दिवसात आलेल्या पाण्यामुळे धरणातला पाणीसाठा सुमारे ४२ टक्के झाला
आहे. सध्या जलाशयात साडे १३ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी दाखल होत आहे.
****
No comments:
Post a Comment