Saturday, 5 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठी भाषा आणि मराठी माणूस यावर कदापिही तडजोड होणार नाही, मराठीसाठीची एकजूट कायम रहावी, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात आज मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा विजयी मेळावा मुंबईत वरळी इथं सुरु आहे. या मेळाव्यात ते बोलत होते. 

कोणताही वाद आणि भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत वीस वर्षानंतर हिंदी सक्तीच्या विषयामुळे आपण आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले...

बाईट – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

यावेळी मराठीसाठी न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली.

योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या 'आधार'शी सलग्न बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

केंद्र सरकार २०२६ च्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. नवी दिल्लीत हज यात्रेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. सर्व अर्जदारांना वेळेत अर्ज भरावेत, असं आवाहन त्यांनी केलं. आगामी हज यात्रेसाठी ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंसोबत त्यांची एक काळजीवाहक व्यक्ती असणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुरुष आणि महिलांसाठी निवासाची स्वतंत्र सोय करण्याची विनंती सरकारच्या विचाराधीन असल्याचंही ते म्हणाले.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट यूजी २०२५ च्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. एका प्रश्नासाठी अनेक योग्य उत्तरे असू शकतात, राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेच्या अंतिम उत्तरांत या टप्प्यावर हस्तक्षेप करता येणार नाही असं न्यायाधीश पी. एस. नरसिंहा आणि आर. महादेवन यांच्या पीठानं म्हटलं आहे.

****

यावर्षी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा - CUET चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केला. या परीक्षेत एका विद्यार्थ्यानं चार विषयांमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. देशातली विविध केंद्रीय विद्यापीठं आणि सहभागी संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. १३ मे आणि ४ जून अशा दोन टप्प्यांमध्ये झालेल्या परीक्षेसाठी १३ लाख ५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

*****

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्ताननं वापरलेल्या लष्करी साधन-सामुग्रीतली ८१ टक्के चीनी बनावटीची होती, अशी माहिती भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी दिली. काल नवी दिल्लीत न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घघाटनपर भाषणात सिंह बोलत होते.

****

राज्यातल्या शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळ एसटी बसचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याचप्रमाणे शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" योजनेंतर्गत ३ लाख ६० हजार १५० विद्यार्थिनींना शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य पालखी सोहळ्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत गेली आहे. भाविकांना दर्शनरांगेत येण्यासाठी फार लांब जाता येऊ नये, यासाठी गोपाळपूर हद्दीत मंदिर समितीकडून सुविधा केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

****

आगामी दोन दिवसांत मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment