Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
July 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
विविध मुद्यांवरुन विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज
आजही बाधित झालं. लोकसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर कारगिल युद्धात प्राण गमावलेल्या
सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. कारगिल विजय दिवस उद्या साजरा होत आहे. अध्यक्ष ओम
बिर्ला यांनी देशाचं रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या
शौर्य आणि पराक्रमाचं स्मरण केलं. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर
विरोधकांनी विविध मागण्या करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. बिर्ला यांनी सदस्यांना
कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन करत, त्यांची वागणूक सभागृहाच्या प्रतिष्ठेला अनुरुप नसल्याचं सांगितलं.
मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ सुरुच ठेवल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित झालं.
राज्यसभेत आज तामिळनाडू मधून नियुक्त झालेल्या नवीन सदस्यांना
शपथ देण्यात आली. त्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी विरोधी पक्षांनी दिलेले स्थगन प्रस्ताव
फेटाळून लावले. त्यावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत
आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
महाराष्ट्र सर्वच महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर
आहे, असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग
तसंच वित्तीय संशोधन क्षेत्रातली ख्यातनाम वित्तीय संस्था - मॉर्गन स्टॅनलेने प्रकाशित
केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद करण्यात
आलं आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध क्षेत्रांतल्या कामगिरीची
दखल यात घेतली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचं आणि त्यातील
निष्कर्षाचं स्वागत केलं असून, हे निष्कर्ष म्हणजे आपल्या राज्याने विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेली
धोरणं आणि त्यानुसार सुरु असलेली त्याची सकारात्मक वाटचाल यांचं द्योतक असल्याचं म्हटलं
आहे.
****
संत साहित्य विविध १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी जे जे
आवश्यक आहे ते करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर इथं आज संतशिरोमणी श्री संत नामदेव महाराज
पुरस्कारानं शिंदे यांना गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ, वारकऱ्यांच्या दिंड्यांना अनुदान, विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी असे अनेक निर्णय सरकारने घेतले असून, ब तिर्थक्षेत्रांचा विकास निधी दोन कोटीवरुन पाच कोटी
केला असल्याचं त्यांनी सांगितलं. संताचे विचार समाजात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला
या परंपरेशी जोडण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहण्याची गरजही शिंदे यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम
देऊ, असं आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान
तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिलं. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या शेलार
यांनी सॅन फ्रान्सिस्को इथल्या बे एरिया इथं मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या
पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेतल्या स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने
शिफारस केली तसंच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला, तर मराठी भाषा शिकवणं, परीक्षा आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणं सुलभ होईल, असं या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून
दिलं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे
यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचं आवश्यक ते सहकार्य आणि शिफारस, अभ्यासक्रम नक्की मिळेल, असं शेलार म्हणाले.
****
ड्रोनद्वारे औषध पुरवण्याची पहिली चाचणी नंदुरबार जिल्हा
आरोग्य विभागातर्फे यशस्वीरित्या घेण्यात आली. धडगाव तालुक्यातल्या अतिदुर्गम भाग असलेल्या
बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत बिलगाव ते सावऱ्यादिगर दरम्यान ड्रोनद्वारे औषधी पुरवण्याची ही चाचणी घेण्यात आली.
सध्या या ड्रोनद्वारे दोन किलो पर्यंत औषध वाहून नेण्यची चाचणी झाली आहे. मात्र कमीत
कमी पंधरा किलो पर्यंतची औषधी आणि लस वाहून नेण्याची आवश्यकता असल्यानं याबाबत पुन्हा
एकदा नंतर चाचणी केली जाणार असल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे यांनी दिली.
****
इजिप्तची राजधानी काहिरा इथं सुरु असलेल्या जागतिक कनिष्ठ
स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अनाहत सिंह उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. या स्पर्धेत
२०१० नंतर उपान्त्य फेरीत पोहोचलेली अनाहत ही पहिली भारतीय ठरली आहे. आज उपान्त्य फेरीत
अनाहतचा सामना इजिप्तच्या खेळाडुसोबत होणार आहे.
****
मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात
ठिकठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर
त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
नदी, नाल्यांना पूर आला असून, पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आज सकाळपासून
भामरागड तालुक्यातल्या ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
हवामान खात्याने आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
केला आहे. मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या
कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment