Wednesday, 2 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी-राष्ट्रीय क्रीडा धोरणही जाहीर

·      बीड लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      राज्यात प्रदूषण करणाऱ्या ३०४ उद्योगांवर दंडात्मक कारवाई तर ३१८ उद्योगांना टाळे

·      आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांच्या विम्यासाठी 'विठ्ठल रखुमाई वारकरी योजना' लागू

आणि

·      मराठवाड्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीला सरासरी ३५ टक्के तर जायकवाडी धरणात ४५ टक्के जलसाठा

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला‘ मंजुरी दिली आहे. या योजनेतून, ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२७, या काळात नोकरी देणाऱ्यांना तसंच पहिल्या वेळेस नोकरी करणाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या योजनेसाठी नव्व्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट – अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

 

याशिवाय, संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.

राष्ट्रीय क्रीडा धोरणालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रीडा क्षेत्रात जगातल्या पहिल्या पाच देशात भारताचा समावेश व्हावा, तसंच तंदुरुस्ती ही लोकचळवळ व्हावी, हा या राष्ट्रीय क्रीडा धोरणाचा उद्देश असल्याचं वैष्णव यांनी सांगितल. ते म्हणाले...

बाईट – अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

****

बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल विधानसभेत सदस्य चेतन तुपे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या प्रकरणातल्या दोषींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले...

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यात प्रदूषण करणाऱ्या ३०४ उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, ३१८ उद्योग बंद करण्यात आले आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा....

‘‘पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचा मुद्दा काल विधान परिषदेत चर्चेला आला. या दुर्घटनेसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमलेली असून, त्या समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात केली जाईल, असं आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं.

याच अनुषंगानं बोलताना चित्रा वाघ यांनी, धोकादायक पर्यटनस्थळी नो सेल्फी झोन संदर्भात माहिती फलक लावण्याचा मुद्दा मांडला, तर आमदार प्रज्ञा सातव यांनी हिंगोली शहराजवळ कयाधु नदीवरच्या जीर्ण पुलाला पर्यायी नवीन पूल उभारण्याची मागणी केली.

 

पीक विम्याबाबत दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला. अशा कंपन्यांना शासनाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असं कोकाटे यांनी काल विधान परिषदेत चर्चेदरम्यान सांगितलं.

शिक्षण खात्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी आतापर्यंत १९ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधान सभेत दिली. आमदार प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, रुग्णांच्या संख्येत २७ टक्क्यांनी घट झाली आहे. मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली. राज्यातल्या सात हजार ४०२ ग्रामपंचायती क्षयमुक्त म्हणून जाहीर झाल्या असून, संभाव्य रुग्णांना तसंच त्यांच्या कुटुंबीयांना क्षयरोगाची अतिरिक्त प्रतिबंधक मात्रा दिली जात असल्याचं, बोर्डीकर यांनी सांगितलं.

दरम्यान, काल विधानसभेत अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. याचं निषेध म्हणून विरोधी पक्षांनी सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार घातला.’’

****

आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी शासनाने 'विठ्ठल रखुमाई वारकरी योजना' लागू केली आहे. या योजनेनुसार, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याचा अपघाती अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास चार लाख रुपये, तर ६० टक्यापेक्षा अधिकचे अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाईल. आषाढी वारीच्या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे.

दरम्यान, वारी काळात पंढरपूर बससेवेवर नियुक्त एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एसटीच्या सुमारे तेरा हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

****

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं काल सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं प्रवेश केला. पालखीचं पहिले गोल रिंगणही अकलूज इथं पार पडलं.

संत एकनाथ महाराजांची पालखी आज कुर्डू इथून प्रस्थान ठेवून लऊळ इथं पोहोचेल, पालखीचा आजचा मुक्काम अरण इथं होणार आहे.

****

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूर जिल्ह्यात ढोकी इथं शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला. तर, हिंगोली जिल्ह्यात भाटेगाव इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात ३१ गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात काल रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

****

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नशाबंदीबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण आयोजित करण्याच्या उद्देशानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे, असं या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात "संजय गांधी निराधार अनुदान योजना" तसंच "श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत" पात्र लाभार्थींची घरोघरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबाबत प्रशासनाला सूचना केली होती.

****

जालना जिल्ह्यातल्या नऊ हजार २७७ शेतकऱ्यांना येत्या येत्या दोन दिवसांत शासनाकडून नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईपोटी पंधरा कोटी नव्वद लक्ष नव्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव रुपये इतका निधी डी.बी.टी. पोर्टलद्वारे वितरित होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी ही माहिती दिली.

****

लातूर इथं जिल्हास्तर आणि महानगरपालिकास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढच्या आठवड्यात आठ ते ११ जुलैदरम्यान वर्ल्ड पीस स्कूल इथं ही स्पर्धा होणार आहे. १५ वर्षांखालील तसंच १७ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात या स्पर्धा होणार आहेत.

****

हवामान

परभणी जिल्ह्यात काल झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं. छत्रपती संभाजीनगर शहरास जिल्ह्यात फुलंब्रीसह अनेक भागात काल दुपारी जोरदार पाऊस झाला.

मराठवाड्यातल्या लहान मोठ्या सर्व धरणांमध्ये सद्यस्थितीला सरासरी ३५ टक्के जलसाठा तर जायकवाडी धरणात ४५ टक्के जलसाठा असल्याचं, जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment