Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 July 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०३ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांना घानाचा सर्वोच्च
नागरी पुरस्कार Companion of the Order of the Star of Ghana या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान ६ आणि
७ तारखेला रिओ दी जिनेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून ब्राझीलचे
अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर
येत आहेत. एनडीए परिसरात श्रीमंत बाजीराव पेशवा प्रथम यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण
यासह त्यांचे विविध कार्यक्रम उद्या, शुक्रवारी नियोजित आहेत.
****
आज सकाळी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून
अमरनाथ यात्रेकरूंचा दुसरा गट काश्मीरला रवाना झाला. यात ५ हजार २४६ यात्रेकरूंचा समावेश
आहे. २६८ वाहनांमधून हे यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी १ हजार ९९३ यात्रेकरू बालटालला
आणि ३ हजार २५३ यात्रेकरू पहलगामला रवाना झाले आहेत.
****
कैलास मानसरोवर इथं सुरू असलेल्या यात्रेतील यात्रेकरूंची
पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची यात्रा पूर्ण करून काल काल दुपारी गंगटोक इथं
परतली.
****
राज्यात मोठ्या उद्योग गुंतवणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या
19 प्रस्तावांपैकी 17 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर
करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात मंत्रिमंडळ
उपसमितीची 12वी बैठक काल पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या
प्रकल्पांमधून 1 लाख 35 हजार 371 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार
असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळं राज्यात तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला गती मिळणार आहे.
सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, लिथियम आयन बॅटरी, वस्त्रोद्योग, ग्रीन स्टील, अवकाश आणि संरक्षण साहित्य यांसारख्या
विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी
कायदे उपयुक्त आहेत. या कायद्यांअंतर्गत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर अपेक्षित असून
न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी
करत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना आणि आदेश जारी करून कार्यवाही
करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच राज्यात नवीन फौजदारी
संहिता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय कामाचं रँकिंग करण्याच्या सूचनाही दिल्या.
विधानभवनात नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते
काल बोलत होते. न्यायवैद्यक विभागानं गुन्हे सिध्दतेसाठी पुराव्यांच्या करण्यात येणाऱ्या
चाचण्या वेळेत कराव्यात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून
देण्यात येत आहेत. रिक्त पदं भरली असून आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास मागणी करावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास
साधता येतो, असं प्रतिपादन राज्यपाल
सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राजभवन येथे राज्यपालांनी काल महिला आणि बालविकास विभागाच्या
विविध योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह
अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती. राज्यपालांनी या बैठकीत ‘वन स्टॉप सेंटर’ आणि
‘मिशन शक्ती’ या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतली.
****
प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं
तीन विशेष एकतर्फी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड आदिलाबाद आणि जालना
अकोला ह्या विशेष गाड्यांच्या चार जून रोजी तर जालना नगरसोल या विशेष गाडीची पाच जून
रोजी फेरी होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती
कळवली आहे.
****
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमांतर्गत गाव
पातळीवर स्वच्छतेविषयक कामांची पाहणी करण्यात येत आहे. यात नागरिकांनी ॲपद्वारे विचारलेल्या
प्रश्नावलीला उत्तरे देऊन सहभागी होण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केलं आहे.
****
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वारीकाळात
व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने
विठ्ठल मंदिर समितीनं दर्शन बारीमध्ये बदल केल्यानं दर्शन रांग जलद गतीने पुढं जात
आहे. भाविकांना आता अवघ्या सहा ते सात तासांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन
होत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
संत श्री गजानन महाराज पालखीचं काल सिद्धेश्वर नगरीत
जल्लोषात स्वागत करण्यात आले. रस्त्यावर रांगोळी आणि फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी
उत्साही वातावरणात स्वागत केलं. यावेळी माचणूर इथं पालखी सोहळा महामार्गावर वारकऱ्यांना
नाश्ता, चहा आणि फळांची व्यवस्था
करण्यात आली होती.
****
काल संध्याकाळी थायलंड इथं झालेल्या ए एफ सी महिला आशियाई
फुटबॉल चषक पात्रता फेरीत भारतानं इराकचा ५-० असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment