Sunday, 6 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज ब्राझीलमधील रिओ दि जानेरो इथं पोहोचले. भारत आणि ब्राझीलमधील अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी चर्चा करण्यास आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी संदेशात म्हटलं आहे.

****

जम्मु-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी आज सकाळी सात हजार दोनशे आठ यात्रेकरुंचा पाचवा जत्था जम्मूच्या भगवती नगर यात्री-निवास शिबीरातून रवाना झाला. यात्रेकरु आजच पहलगाम आधार शिबीर इथं पोहोचून तिथून पवित्र अमरनाथ शिवलिंगाच्या यात्रेस सुरुवात करणार आहेत.

****

दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रेच्या भाविकांचा पहिला जत्था काल उत्तराखंडच्या पिथोरागढ इथं पोहोचला. यात्रा मार्गाच्या भारतीय क्षेत्रातील सर्व व्यवस्था कुमाऊ मंडळ विकास निगम मार्फत करण्यात आली आहे. भारत-तिबेट सीमा पोलिस दल यात्रेकरुंसोबत सुरक्षेसाठी लिपुलेकपर्यंत सोबत असणार आहे. या १८ दिवसीय यात्रेत पहिला जत्था ४५ यात्रेकरुंचा असून पहिल्यांदाच एक डॉक्टर आणि एक आचारी असलेलं पाच जणांचं पथकही सोबत आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त, जालना शहराचं आराध्य दैवत असलेल्या जुना जालन्यातील प्रति पंढरपूर, आनंदी स्वामी महाराज मंदीर परिसरात मोठी यात्रा भरली आहे, लाकडी साहित्याची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री हे या यात्रेचे वैशिष्ट्यं आहे. श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणूक सोहळ्याला आज सकाळी प्रारंभ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परंपरेनुसार बाजार चौकी भागात मुस्लीम समाजबांधवांकडूनही पालखीचं स्वागत करण्यात आलं. स्वामींची ही पालखी प्रचलित मार्गावरून नगरप्रक्षिणा करून रात्री मंदिरात पोहचणार आहे.

****

प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी संत नामदेवांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्या वारकऱ्यांना प्रत्यक्ष दिंडीत सहभागी होता येत नाही, असे सर्व वारकरी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं दर्शनासाठी गर्दी करतात. आज पहाटे शासकीय पूजा संपन्न झाली. जवळपास दीड लाख भाविकांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक उपक्रम राबविले आहेत.

****

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानतर्फे आषाढी एकादशीचा उत्सव आज साजरा करण्यात येत आहे, यानिमित्त साईबाबा मंदिर आणि परिसर फुलांनी आकर्षक सजवण्यात आला आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी अकोल्याहून भाविक पंढरपूरला जात असून  आज सकाळी ११ वाजता अकोला-मिरज गाडी अकोला रेल्वे स्थानकावरुन रवाना झाली. यावेळी वारकऱ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज दुपारी दीड वाजता नागपूर-मिरज, सायंकाळी चार वाजता अमरावती-मिरज आणि सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कोल्हापूर एक्सप्रेस पंढरपूरसाठी निघणार आहे.

****

आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे. प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिनाचा उद्देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे पाच हजार सातशे लोक रेबीजमुळे मरतात, तर देशात प्राण्यांच्या चाव्याच्या ९१ लाखांहून अधिक घटना घडतात, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- आयसीएमआरनं म्हटलं आहे. २०३० पर्यंत कुत्र्यांचा रेबीज नष्ट करण्यासाठी जलद कृती करण्याची आवश्यकता असल्याचंही आयसीएमआरच्या संशोधनातून व्यक्त झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर जलाशयाचा साठा आता पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे. जलाशयात सध्या १६ हजार २९५ क्यूसेक -घनफुट प्रत सकंद वेगानं पाणी दाखल होत असल्यानं पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

****

अकोट तालुक्यातील धामणा येथे पटकी उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कुठेही साथरोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करुन प्रत्येक गावातल्या जलस्त्रोतांची तपासणी करून आगामी तीन दिवसांत तत्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

****

इंग्लंडच्या लंडनमध्ये आयोजित विंबल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी विभागात भारताचा युकी भांबरी आणि त्याचा अमेरीकन जोडीदार रॉबर्ट गैलोवे हे तीसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. मिश्र दुहेरी विभागातही युकी भांबरी यानं चीनच्या  जियांग झिन्यू हिच्यासोबत दुसरी फेरी गाठली आहे. तर, भारताचा रुत्विक बोल्लीपल्ली आणि कोलंबियाचा निकोलस बैरिएंटोस ही पुरुष दुहेरीतील जोडी पराभूत झाली आहे.

****

भारताचा महिला फुटबॉल संघ २२ वर्षांनंतर एएफसी महिला आशियाई कपसाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघानं काल थायलंडच्या चियांग माई इथं झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या एएफसी महिला आशियाई कप पात्रता सामन्यात यजमान थायलंडचा २ विरुद्ध १ गोलने पराभव करुन हे यश मिळवलं. संगीता बासफोरनं २९ आणि ७४ व्या मिनिटाला दोन गोल करून भारताला विजय मिळवून दिला.

****

No comments:

Post a Comment